आचल वाघमारेचा प्रथम क्रमांक !
अमरावती : सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन युवा आघाडी, अमरावती शहराच्यावतीने व्याख्यान व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १४ सप्टेंबर रोजी निबंध स्पर्धा घेण्यात आली तर २१ सप्टेंबर रोजी व्याख्यान व बक्षीस वितरणाचा सोहळा यश पॅलेस, अमरावती येथे पार पडला. या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अमरावती व परिसरातील एकूण २३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. पावसाळी वातावरणामुळे १० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून निबंध लिहून सादर केले. स्पर्धेसाठी भय्यासाहेबांचे संघटन कार्य, भय्यासाहेबांची पत्रकारिता, नागपूरची दीक्षाभूमी व भय्यासाहेब आंबेडकर, तसेच आंबेडकरी चळवळ आणि भय्यासाहेबांची जडणघडण हे चार विषय देण्यात आले होते. स्पर्धकांनी यापैकी एका विषयावर १५०० शब्दांमध्ये निबंध लिहिणे आवश्यक होते.
विचारमंथनपर व्याख्यान –
२१ सप्टेंबर रोजी झालेल्या मुख्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख रोशन गजभिये यांनी केले. त्यांनी मागील तीन वर्षांपासून भय्यासाहेबांच्या स्मृतिदिनी असे उपक्रम राबवले जात असल्याचे सांगून आंबेडकर कुटुंबाचे कार्य नवतरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश स्पष्ट केला.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आंबेडकर कुटुंबाच्या समाजावर असलेल्या उपकारांची जाणीव करून दिली आणि आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान अधोरेखित केले. तसेच जिल्हा सरचिटणीस गणपतराव तिडके, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष बाबूलाल धाकडे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
विजेत्यांचा गौरव –
स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
- प्रथम क्रमांक : आचल वाघमारे – १०,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह (जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम व संजय चौरपगार यांचेकडून)
- द्वितीय क्रमांक : निधी देवरे – ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह (इंजी. विनय बांबोळे यांचेकडून)
- तृतीय क्रमांक : प्रतीक्षा वानखडे – ३,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह (रीना प्रशांत गजभिये यांचेकडून)
उत्तेजनार्थ बक्षीस : आशिष मानेकर – १,००० रुपये व स्मृतिचिन्ह (सागर भवते यांचेकडून)
उत्तेजनार्थ बक्षीस : श्रावस्ती खडसे – १,००० रुपये व स्मृतिचिन्ह (इंजी. शैलेश बागडे यांचेकडून)
विजेत्यांचे मनोगत –
प्रथम क्रमांक विजेती आचल वाघमारे हिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “भय्यासाहेबांना सूर्यपुत्र का म्हणतात, हे त्यांच्या कार्याचा अभ्यास करताना समजले.” तर द्वितीय क्रमांक विजेती निधी देवरे हिने मत व्यक्त केले की, “स्पर्धेच्या निमित्ताने मी वाचत गेले तशी भय्यासाहेबांची नवी पैलू उलगडत गेले. आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे आभार.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सचिव अजय रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन अस्मिता बागडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबाराव गायकवाड, प्रमोद राऊत, अलंकार बागडे, विजय डोंगरे, राजेश सोनोने, अजय तायडे, बबलू ढोके, अमोल जवंजाळ, अनिल रामटेके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
भय्यासाहेबांच्या स्मृतिदिनी झालेला हा कार्यक्रम केवळ बक्षीस वितरणापुरता न राहता तरुणांमध्ये वाचन व अभ्यासाची प्रेरणा निर्माण करणारा ठरला, अशी सर्वत्र चर्चा होती.