पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क (कस्टम) विभागाने अंमली पदार्थ तस्करीचा मोठा कट उधळून लावला आहे. बँकॉकहून आलेल्या एका महिलेकडून कॉफीच्या पाकिटांमध्ये लपवलेले तब्बल ५ किलो मेथाक्वालोन नावाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत सुमारे २ कोटी ६१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी मुंबईतील माहिम येथे राहणाऱ्या फहेमिदा मोहम्मद साहिद अली खान (वय ४४) या महिलेला अटक करण्यात आली आहे.
नेमके काय घडले?
गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानातून फहेमिदा खान उतरली. विमानतळाच्या बाहेर पडताना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सीमाशुल्क विभागाच्या पथकाने तिला थांबवले. तिच्या सामानाची तपासणी केली असता, त्यात कपडे, चॉकलेट आणि काही कॉफीची पाकिटे सापडली.
कॉफीच्या पाकिटांवर संशय आल्याने अधिकाऱ्यांनी ती उघडली. आतमध्ये कॉफीऐवजी पांढऱ्या रंगाची पावडर आढळली. तपासणीनंतर ही पावडर मेथाक्वालोन नावाचा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तिला लगेच ताब्यात घेण्यात आले आणि अधिक चौकशीनंतर अटक करण्यात आली.
पुढील तपास सुरू
या कारवाईचे नेतृत्व सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक अजय मलिक आणि मनीषा बिनॉय यांनी केले. निरीक्षक पलक यादव, अभयकुमार गुप्ता आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
अटक करण्यात आलेल्या खानला न्यायालयात हजर केले असता, विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास आवश्यक असल्याचे सांगितले. हे अंमली पदार्थ ती कोणाला देणार होती, याचा तपास करायचा असल्याने तिला पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत तिला पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.