पुणे : विजेचा आणि विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर टाळून निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने (वय ८५) यांचं शुक्रवारी (१९ सप्टेंबर) निधन झालं. त्या अविवाहित होत्या.
१९४० मध्ये जन्मलेल्या डॉ. साने यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली होती. तसेच, त्यांनी भारतविद्या शास्त्रातही एम.ए. आणि एम.फिल. संपादन केलं होतं. पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केलं आणि त्याच पदावरून त्या सेवानिवृत्त झाल्या.
केवळ वनस्पतिशास्त्रच नाही, तर इतिहासाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. त्या पुण्याच्या जोगेश्वरी मंदिरासमोरील शीतलादेवी पार भागातील एका जुन्या वाड्यात राहत होत्या. या वाड्याला त्यांनी एक प्रकारे निसर्गाचं घरच बनवलं होतं, जिथे त्यांच्यासोबत चार मांजरी, एक मुंगूस, एक घुबड आणि भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या यांसारख्या अनेक पक्ष्यांचाही निवास होता.
डॉ. साने यांनी आयुष्यभर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब केला. त्यांच्या घरात विजेचा वापर नव्हता, त्यामुळे आधुनिक उपकरणांचा मागमूसही नव्हता. नोकरीच्या शेवटच्या १० वर्षांत त्यांनी लुना वापरली, पण त्याआधी आणि त्यानंतर त्या कामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी पायीच प्रवास करत. विहिरीवरून पाणी आणणं, सूर्यप्रकाश आणि कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करणं हे त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा भाग होता.
विजेविना जीवन जगूनही त्यांनी वनस्पतिशास्त्र, पर्यावरण, इतिहास आणि प्राच्यविद्या अशा विविध विषयांवर ३० हून अधिक पुस्तकं लिहिली. अलीकडच्या काळात त्यांनी फक्त सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिव्याचा वापर सुरू केला होता.
डॉ. साने यांची उल्लेखनीय ग्रंथसंपदा:
- आपले हिरवे मित्र
- पुणे परिसरातील दुर्मीळ वृक्ष (डॉ. विनया घाटे यांच्यासह)
- बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष
- सम्राट अशोकावरील ‘देवानंपिय पियदसी राजो अशोक’
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तके (ज्यात बायोलॉजी आणि इंडस्ट्रीयल बॉटनी यांसारख्या पुस्तकांचा समावेश आहे)