जालना : जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध आंबेडकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी व समता सैनिक दलाच्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावून आपला आवाज बुलंद केला.
आंदोलनात मराठवाडा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे दीपक डोके, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर, राजेश सदावर्ते, महेंद्र रत्नपारखे, कुशाल दहीवाल, प्रतिक सम्राट, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुरज सोनोवने, विष्णु खरात, युवा जिल्हा उपाध्यक्ष हरीश रत्नपारखे, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, तालुका सचिव गौतम वाघमारे, कैलास जाधव, विकास जाधव, लक्ष्मण कोळे, सखाराम कोळे, सुरेश कोळे, मुरलीधर बोबडे, गुमनकाका पारखे, दिनकर पाईकराव, सुनील पाईकराव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी तसेच इतर आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.
या आंदोलनामुळे जिल्हा मुख्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. अधिकारी वर्गाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या असून निवेदनाद्वारे पुढे पाठवण्याचे आश्वासन दिले. हे आंदोलन पुढील काळात अधिक तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे.