मुंबई : मुंबई विद्यापीठात भंते मीमांसा यांच्यावर सुरक्षा रक्षक बाळासाहेब खरात व त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यामुळे बौद्ध समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. संविधानिक पद्धतीने शांततामय आंदोलन करणाऱ्या भंतेंवर गुंडगिरीने हल्ला करणे ही अत्यंत निंदनीय बाब असून, यामुळे संपूर्ण बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
भंते मीमांसा हे केंद्रीय मंत्री किरण रिजूजींना आपल्या मागण्या सादर करण्यासाठी गेले असताना त्यांना अडवण्यासाठी जाणूनबुजून हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हल्ल्याची तक्रार घेण्याऐवजी पोलिसांनी उलट भंते मीमांसा यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आहे.
हे वर्तन केवळ अन्यायकारकच नव्हे तर न्यायव्यवस्थेवर थेट आघात करणारे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने संताप व्यक्त केला असून बांद्रा विभागाचे उप आयुक्त पोलीस यांना निवेदन सादर केले आहे.या प्रकरणी तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश युवा अध्यक्ष सागर रमेश गवर्ड, महासचिव प्रदीप अडांगळे, प्रा. रोनक जाधव व विपुल हिरे आदी उपस्थित होते.