मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी वंचित बहुजन आघाडीने आपला बहुप्रतिक्षित निवडणूक जाहीरनामा आज दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ निवासस्थानी प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यातून प्रस्थापित राजकारण्यांना आव्हान देत, मुंबईतील उपेक्षित, श्रमिक आणि वंचितांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
जाहीरनाम्यातील क्रांतीकारक तरतुदी करण्यात आली आहे.
१. महापालिकेतील भेदभावावर पूर्ण बंदी:
मुंबईतील प्रत्येक रहिवाशाला जात, धर्म किंवा आर्थिक स्थितीचा विचार न करता समान नागरी सुविधा मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी “भेदभावरहित चार्टर” लागू करणार आहे. झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमध्ये मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला चाप लावण्यासाठी प्रत्येक विभागात कठोर जबाबदारी यंत्रणा उभारली जाईल.
२. शिक्षण म्हणजे सामाजिक न्याय:
– गेल्या १० वर्षात मुंबईत बंद पडलेल्या ११४ मराठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्धार जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे.
पहिल्या वर्गापासून मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचे शिक्षण दिले जाईल.
– १९९७ पासून रखडलेली मराठी शिक्षकांची भरती प्रक्रिया तातडीने राबवली जाईल.
तासिका तत्त्वावरील शिक्षकांना सन्मानजनक वेतन आणि कायमस्वरूपी नोकरीचे संरक्षण दिले जाईल.
३. स्वच्छता कामगारांना ‘स्थायी’ नोकरी:
ज्यांच्या श्रमावर मुंबई स्वच्छ राहते, त्या सफाई कामगारांसाठी ‘वंचित’ने मोठे पाऊल उचलले आहे. सर्व सफाई कामगारांची कंत्राटी पद्धत बंद करून त्यांना महापालिकेत थेट स्थायी नोकरी दिली जाईल. तसेच त्यांच्या कुटुंबाला मोफत आरोग्य तपासणी आणि मुलांच्या शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती दिली जाईल.
४. असंघटित क्षेत्रातील कामगार व हॉकर्सना सन्मान:
हॉकर्सना अवैध न मानता त्यांना कायद्यानुसार ‘संरक्षण झोन’ उपलब्ध करून दिला जाईल. त्यांना ओळखपत्र, आरोग्य विमा आणि कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. विशेषतः असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांसाठी ₹२,००० गॅरिमा फंड आणि मोफत बेस्ट बस पास देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
५. समता शक्ती – महिला सक्षमीकरण:
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी स्त्री-नेतृत्वाखालील व्यवसायांना वार्षिक ₹१०० कोटींचा बीज निधी दिला जाईल. तसेच बांधकाम स्थळे आणि बाजारपेठांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी सुरक्षित ‘बालसंवर्धन’ (Crèche) सुविधा उभारल्या जातील.
“बंद खोलीत नव्हे, तर वस्त्यांतून साकारलेला जाहीरनामा”
हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी ठामपणे सांगितले की, “हा दस्तऐवज कोणत्याही वातानुकूलित खोलीत बसून तयार केलेला नाही. मुंबईच्या चाळीत, वस्त्यांत आणि झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या जनतेशी संवाद साधून त्यांच्या वेदना आणि आकांक्षांना आम्ही शब्दांत मांडले आहे.”






