मागच्या आठवड्यात ऍमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बोझेस यांच्या दुसऱ्या का तिसऱ्या लग्न समारंभावर ५० मिलियन डॉलर्स म्हणजे ४५० कोटी रुपये खर्च झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आणि इतरत्र झळकल्या.
श्रीमंतांच्या समारंभातील उधळ माधळ यावर एकेकाळी श्रीमंतीचे / पैशाचे ओंगळ प्रदर्शन म्हणून सार्वजनिक टीका व्हायची.
आता नाही. वेलकम टू नवीन नवउदारमतवादी आर्थिक मूल्ये !
आता बेझोस असुदे नाहीतर आपले देशी अंबानी कुटुंबातील लग्न समारंभ. श्रीमंत लोकांच्या चंगळवादामुळे, असे पैसे खर्च करण्यामुळे चार लोकांना रोजगार तरी मिळतात असे सर्रास समर्थन / इकॉनॉमिक रॅशनल केले जाते
ही तीच लोक आहेत .. .. ..
…. … श्रीमंतांच्या घरातील समारंभात , मांडवाबाहेर खरकट्या / उष्ट्या अन्नाची लाजिरवाणी, ओंगळवाणी प्रतीक्षा करावी लागते पण गरिबांच्या तोंडात आयुष्यात एकदा तरी गोडधोड तोंडात पडते असे म्हणतात
….. … रियल इस्टेट , बिल्डर , लँड माफिया यांच्या गैरकृत्यांकडे, त्यांनी सार्वजनिक जमिनी हडप केल्याकडे , नफेखोरी कडे दुर्लक्ष करून ते घरे बांधतात म्हणून कसेही बांधलेले का होईना, कितीही कर्जे काढावी का लगेनात पण लोकांना घर मिळते असे म्हणतात
….. …. जमीन विकून , कर्ज काढून , पोटाला चिमटा घेत लाखो रुपयाच्या फिया भरून शिक्षण सम्राटांच्या शाळा कॉलेजांची साम्राज्ये उभे रहात असतात पण त्यामुळे मुला मुलींना शिक्षणाचे पाणी तरी लागते म्हणतात
… …. जल, जंगल , जमीन, डोंगर , समुद्र , नद्या आणि एकूणच पर्यावरण यांचा नाश होतो आहे हे खरे पण त्यामुळे आर्थिक विकास देखील होत आहे असे म्हणतात
ही तीच लोक आहेत …. ….
…. …. ज्यांच्या कवटीतील स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असणाऱ्या मेंदूच्या वापर न करणारी ; राजकीय अर्थव्यवस्था म्हणून काहीतरी असते, त्याचा अभ्यास करायचा असतो हे माहीत करून न घेणारी
…… … आत्मसन्मान देणारा रोजगार, घर खरेदी , आरोग्य सेवा आणि मुलांच्या शिक्षणामुळे कायमचे कर्जबाजारी पण न येणे, न जन्मलेल्या पिढ्यांसाठी पृथ्वी आणि पर्यावरण किमान जिवंत तरी ठेवले पाहिजे, माणसाचा आत्मसमान हे कोणतेही शब्द कानावर न पडलेली
ही तीच लोक आहेत ज्यांच्या तोंडी कधीही लागू नये
जगभरचा आत्यन्तिक विषम, शोषक, दिवाळखोर आर्थिक ढाचा तयार करणारा नवउदारमतवाद , ब्रेनवॉश केलेल्या अशा सामान्य लोकांच्या पोकळ कवटीवरच्या पायावर उभा आहे.
म्हणून बेझोस , अंबानी, लँड माफिया , शिक्षण सम्राट , यांना कधीही आपल्या वागण्याच्या समर्थनार्थ पत्रकार परिषदा घ्याव्या लागत नसतात
संजीव चांदोरकर