औरंगाबाद – शहरातील आंबेडकरनगर, फुले नगर, आणि गौतम नगर परिसरातील अतिक्रमणाच्या कारवाईमुळे घरांवर टांगती तलवार आलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांनंतर अखेर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी १५० घरांच्या पुनर्वसनास मंजुरी दिली आहे.
या भागातील अतिक्रमण हटवताना अनेक गोरगरीब कुटुंबांच्या निवाऱ्यावर गदा येणार होती. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अमित भुईगळ यांनी जोरदार पाठपुरावा करत नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी १५० घरांचे पुनर्वसन निश्चित करत लवकरच त्या घरांच्या चाव्या संबंधित लाभार्थ्यांना सुपूर्त करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
तसेच अतिक्रमणाच्या कारवाईत पाडण्यात येणाऱ्या ‘कमान बुद्ध विहारा’बाबतही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. हे बुद्ध विहार पुन्हा नव्याने बांधून देण्यात येईल, असे आश्वासन स्वतः आयुक्त श्रीकांत यांनी दिले आहे.
या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना असून, वंचित बहुजन आघाडीचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे. अमित भुईगळ यांनी याबाबत म्हटले, “आमचा लढा फक्त अतिक्रमणाविरुद्ध नाही, तर गरिबांच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी आहे. हे पुनर्वसन म्हणजे न्यायाचा विजय आहे.”
या निर्णयामुळे औरंगाबाद शहरातील नागरी प्रशासकीय यंत्रणा आणि जनतेतील विश्वास नवी दिशा घेत आहे.