चैत्यभूमी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृतिस्थळ आहे आणि त्या स्थळाबाबत आपल्या मनात विषेश भावना असणे नैसर्गिक आहे. तिथे गेल्यावर मिळणारी ऊर्जा अद्भुत आहे हे मी मागच्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. पण, ही अद्भुत ऊर्जा येते कुठून? तर ही अद्भुत ऊर्जा येते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपल्या मनात असलेल्या भावनेमुळे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीसाठी अखंड केलेला संघर्ष आणि त्या संघर्षाचा आपल्या जीवनावर पडलेला प्रभाव या प्रती आपल्या मनात असलेल्या भावनांमधून ही ऊर्जा निर्माण होत असते. पण, या ऊर्जेचं रूपांतर आपण कशात करतो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चैत्यभूमीला अभिवादनासाठी जाणारे तीन प्रकारचे लोक असतात. एक जे तासनतास रांगेत उभे राहून स्तुपात जाऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला फुलं, मेणबत्या, अगरबत्या वाहत असतात आणि दुसरे जे चैत्यभूमीवर सेवाकार्यात गुंतलेले असतात आणि तिसरे ते जे पुस्तकांच्या स्टॉलना भेटी देणे; राज्याच्या, देशाच्या कान्या कोप-यातून आलेल्या मित्रांना, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आलेले असतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी तिनही प्रकारच्या लोकांच्या मनात सारखीच कृतज्ञता असते; पण ती कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत मात्र वेगळी असते. लहानपणी मलासुद्धा अभिवादनाच्या रांगेत उभं राहणं खूप विशेष वाटायचं आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तोच सर्वोत्तम मार्ग वाटायचा. बाबासाहेबांनी आपल्यासाठी येवढा संघर्ष केलाय, तर आपण ४ तास रांगेत उभं राहिल्यास काय बिघडलं, असा विचार त्यामागे असायचा. पण, नंतर समजलं की बाबासाहेब तर त्यांच्या विचारात आहेत आणि त्यांचे विचार ग्रंथांमध्ये आहेत. मग, अभिवादनाची रांग सोडून मी शिवाजी पार्कवरील पुस्तकांचे स्टॉल पालथे घालु लागलो, जमेल तशी पुस्तकं विकत घेऊ लागलो. आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांचे ते गठ्ठे घेऊन शिवाजी पार्कवर मित्रांमध्ये मिरवण्यात खूपच गर्व वाटायचा. आपण अमुक-तमुक ग्रंथ विकत घेतले आहेत, वाचले आहेत, असं चारचौघात सांगणं आणि संदर्भ देणं फार जबरदस्त वाटायचं. एकदम विद्वान असल्यासारखं भासायचं. हे असं करून मी स्वत:ला हुशार आंबेडकरवादी समजू लागलो होतो. पण, खरं सांगतो काही काळाने असं संदर्भ देऊन स्वत:ला हुशार सिद्ध करून मला पोपट झाल्यासारखं वाटू लागलं. पोपट मिठू मिठू करू लागला, लोकांना नावाने हाका मारू लागला की पब्लिक खुश होत, पोपटाला हुशार समजतं, पण पोपट शेवटी पोपटचं असतो. ग्रंथ वाचण, ते पाठ असणं आणि त्या ग्रंथांच आकलन करणं यात फरक असतो, हे लक्षात येऊ लागलं. आकलनाची कमतरता भरून काढण्यासाठी मी मग इतर आंबेडकरवादी अभ्यासकांना वाचू लागलो. त्यांच्याशी चर्चा करू लागलो, प्रश्न विचारू लागलो. यातून माझं आकलन वाढत गेलं. बाबासाहेब थोडेफार समजू लागले. तेव्हापासून बाबासाहेब समजून घेणं सुरूच आहे आणि ते शेवटपर्यंत सुरूच राहील.
पण, आपण बाबासाहेब समजून घेऊन काय करतो, असा प्रश्न मागील काही वर्षांपासून मला पडू लागलाय. बाबासाहेब वाचले, समजून घेतले, जे समजलं ते जमेल तसं इतरांना सांगितलं, पण पुढे काय असा प्रश्न मनाला पडू लागला आणि एक दिवस समजलं की, बाबासाहेब वाचण्याच्या, समजून घेण्याच्या नादात आपण ग्राऊंडवर काम करणंच विसरून गेलो. वेगवेगळ्या संस्था-संघटना जॉईन केल्या. त्यातल्या एका संस्थेशी असलेली बांधिलकी आजही कायम आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सगळा संघर्ष हा समस्या, दु:ख निवारणासाठी होता. शोषणकारी व्यवस्था नाकारून त्यांना समतवादी समाज व्यवस्था निर्माण करायची होती. त्यांनी केवळ अस्पृश्य नाही तर शेतकरी, कामगार आणि स्त्रियांच्या समस्या दूर करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची पराकाष्ठा केली. याबाबत बाबासाहेबांचं अनुकरण करायचं राहूनच गेलं, हे लक्षात आलं. आपल्या आसपास एवढ्या सगळया समस्या असताना आपण अनेक वर्ष केवळ संदर्भ-संदर्भ खेळत बसलो याच आश्चर्य वाटतंय. कदाचित आपल्या आंबेडकरवादी उत्क्रांती मधला एक टप्पा असावा. हा टप्पा आता पार करायला हवा. आपल्या आसपास असणारे आणि समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते हेच खरे प्रबुद्ध आंबेडकरवादी असल्याचे आता पटू लागलं आहे. भलेही त्यातले काही जण फार शिकलेले नसतील, भलेही त्यांनी बाबासाहेबांचे खंडच्या खंड वाचलेले नसतील; पण तरीही त्यांना बाबासाहेब नेमके समजलेत हे लक्षात येऊ लागलं आहे. समाजा समोर समस्यांचा डोंगर उभा असताना बाबासाहेब वाचलेल्या समजलेल्या लोकांनी केवळ वैचारिक चर्चा आणि डिबेट्स मध्येच रमणं हा शहाणपणा नाही. बाबासाहेबांचे ग्रंथ वाचून, त्यावर चर्चा करणे आवश्यक असले, तरी केवळ त्यामुळेच बाबासाहेब समजणार नाहीत. बाबासाहेब समजून घेण्यासाठी त्यांच्या लिखाणासोबतच त्यांनी जे काम केल तेसुद्धा समजून घ्याव लागेल. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी जी महत्त्वाची दोन साधनं जनतेला दिली त्यांचा वापर करून, लोकांच्या समस्या सोडवणं हाच आंबेडकरवाद आहे, असं आता वाटू लागलं आहे.
ती दोन साधनं म्हणजे धम्म आणि संविधान. धम्म म्हणजे कर्मकांड नाही, तर धम्म म्हणजे कर्मकांडातून मुक्त होणं. स्वत:च स्वत:चा आधार होणंं, स्वत:तलं आणि इतरांमधलं माणूसपण जपणं आणि वाढवणं. धम्माचं मुख्य प्रयोजन हे स्वत: सह इतरांना समस्येतुन, दुःखातून, शोषणातून मुक्त करणे आहे. संविधानाने जी शासकीय, प्रशासकीय, राजकीय व्यवस्था निर्माण केलेली आहे ती मुख्यत: जनतेच्या समस्या सोडवण्यासाठीच, जनतेचं दुःख दूर करण्यासाठीच निर्माण केली आहे. ही व्यवस्था आज संविधानकारांना अपेक्षितरित्या काम करत नसल्यामुळे जनतेच्या समस्यांमध्ये, दुःखामध्ये वाढ झाली आहे. या दोनही साधनांचा उपयोग सामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी केल्याशिवाय आपण स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेऊ शकत नाही. जातिव्यवस्थेचे निर्मूलन हा जरी आंबेडकरवादी चळवळीचा केंद्रबिदू असला, तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी, कामगार आणि स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी काम का केले याचे तात्त्विक उत्तर काहीही असले, तरी त्याचे व्यावहारिक उत्तर हेचं आहे की, जो पर्यंत आपण इतर शोषित, वंचित वर्गाला त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करत नाही, तोपर्यंत आपली चळवळ सशक्त होणार नाही. याचाच अर्थ एकाच जातीच्या किंवा वर्गाच्या समस्यांवर चळवळ करून आपली चळवळ मोठी होणार नाही. त्यामुळेच आंबेडकरवाद्यांनीसुद्धा केवळ जातकेंद्री चळवळ न करता शेतक-यांचे, कामगारांचे, इतर समदु:खी समूहाचे, लिंगभेदाचे प्रश्न हाती घेतले पाहिजेत. या प्रश्नांवर काम करणारी आंबेडकरवादी लिडरशीप निर्माण झाल्याशिवाय आंबेडकरवादी चळवळीचा व्यापक परिघ ख-या अर्थाने देशाला समजणार नाही. जो पर्यंत लोकांच्या रोजच्या जगण्याच्या समस्या, नागरी समस्या, सांडपाण्याच्या समस्या सोडवणे हासुद्धा आंबेडकरवाद आहे हे आपल्याला समजणार नाही, तो पर्यंत लोकांना आबेडकरवाद आपलासा वाटणार नाही. समस्या कोणतीही असो या समस्यांचा सर्वाधिक त्रास हा शोषित, वंचित समूहांनाच जास्त होतो हे जाणून काम करणारे कार्यकर्ते जो पर्यंत निर्माण होत नाहीत, तो पर्यंत आंबेडकरी चळवळ ही केवळ जातकेंद्री आणि पर्यायाने जातीपुरतीच मर्यादित राहणार नाही. बिगर आंबेडकरवादी लोक आणि आंबेडकरवादी कार्यकर्ते यांच्यात जे एक प्रकारच अंतर निर्माण झालं आहे त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर वैचारिक चर्चा करणारे लोक हे जनतेच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांवर काम करताना अभावानेच आढळून येतात. आरक्षण, जातीय अत्याचार, महापुरुषांचे विचार या पलीकडे आपल्या चर्चा सरकत नाहीत.
मी असं म्हणत नाही की, अर्थशास्त्रात पीएच.डी असणा-या व स्वत:ला आंबेडकरवादी म्हणणाऱ्या प्राध्यापकाने सांडपाण्याच्या प्रश्नावर नगरपालिकेला फे-या माराव्यात, पण त्यांनी निदान लोकांना समजेल अशा भाषेत सरकारच्या आर्थिक धोरणांचा आपल्या रोजच्या जीवनावर काय चांगला-वाईट परिणाम होतो, हे तरी सांगायला हवं. अर्थशास्त्राच्या परिषदेत क्लिष्ट शब्द आणि आकडेवारीच्या माध्यमातून विद्वत्ता सिद्ध करणे जेवढे महत्त्वाचं आहे तेवढेच सामान्य लोकांशी त्यांना समजेल अशा भाषेत संवाद साधणेसुद्धा आवश्यक आहे कारण शेवटी अर्थशास्त्र हा विषय थेट लोकांच्या जगण्याशी जोडलेला आहे. या पीएच.डी धारक प्राध्यापकांनी सांडपाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिकेला फे-या मारल्या, तर उत्तमच कारण प्रशासन त्यांना अधिक चांगला प्रतिसाद देण्याची शक्यता आहे. सांगण्याचा हेतू हाच की शोषित, वंचित कोणीही असो त्यांच्या समस्या सोडवून त्यांना सोबत घेणे हाच मार्ग आंबेडकरवादी चळवळीला पुढे नेणारा आहे. चळवळीचा परिघ मोठा करणारा आहे. तोच मुक्तिपथ आहे. हे macro level ला ते होत आहे. पण ,micro level ला सुद्धा ते मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. यातून केवळ आंबेडकरवादी समाजकारण नाही, तर आंबेडकरवादी राजकारणसुद्धा पुढे जाणार आहे. त्यासाठी शासकीय-प्रशासकीय व्यवस्था कसं काम करते हे माझ्या सारख्या थोडंफार वाचन असलेल्या लोकांना शिकून घ्यावं लागणार आहे. वैचारिक चर्चांच्या हस्तिदंती मनो-यातून उतरून आता जमिनीवर थोडं काम करावं लागणार आहे. संवैधानिक मार्गाने बिनबोभाट असं काम करणारे अनेक कार्यकर्ते आसपास आहेत. या कार्यकर्त्यांमुळेच चळवळ टिकून राहणार आहे, यांच्यामुळेच संविधानाचा सन्मान होणार आहे. जे अभ्यासु आणि हुशार कार्यकर्ते असं काम करत आहेत त्यांच्या कडून काही गोष्टी शिकून घ्याव्या लागणार आहेत.
बाबासाहेबांचे विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहचणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढचं कृतिशील आंबेडकरवादातून सर्वांना आपल्यासोबत जोडून घेत पुढे जाणंसुद्धा तेवढचं महत्त्वाच आहे. मागच्या १५ दिवसांपासून महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वैचारिक लेख लिहिण्याची तयारी करत असताना, एका प्रबुद्ध माणसाचा फोन आला आणि आपल्या फोलपणाची जाणीव झाली. त्यातून मनात जी काही ढवळाढवळ झाली ती इथे मांडली आहे. दरवर्षी चैत्यभूमी वर ग्रंथ खरेदी करून अभिवादनाचं कर्मकांड पार पाडणारा मी कदाचित थोडा भानावर आल्याची शंका मला स्वत:विषयी येऊ लागली आहे. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा केवळ कपाटांची शोभा वाढवण्यासाठी नाहीत, तर वाचण्यासाठी आहे. केवळ वाचनं महत्त्वाचं नसून त्यात बाबासाहेबांनी मांडलेला विचार समजणं जास्त महत्त्वाचं आहे. जो पर्यंत बाबासाहेबांच्या समजलेल्या विचारांचे रूपांतर कृतीत होत नाही, तो पर्यंत तो विचार आपल्याला समजला, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कृतीच्या पातळीवर माझी पाटी बरिचशी कोरी आहे. येणा-या काळात ही कोरी पाटी जमेल तशी भरून काढणे हेच माझ्यासाठी आंबेडकरवाद समजणं असणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेवर क्लिष्ट वैचारिक चर्चा करून मिळणारा आनंद ईगोला सुखावणारा असला, तरी आता ईगोच्या सुखासिनतेच्या आसक्तीवर मात करून आता पुढे सरकावं लागणार आहे. एखाद्या प्रश्नावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मत काय होते हे मुखोद्गत असण्यापेक्षा आता माझं स्वत:च मत काय आहे, यावर मी विचार करू लागलोय. एक आंबेडकरवादी म्हणून मी जर माझ्या स्वतंत्र बुद्धीने विचार करू शकत नसेल, तर तो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाचा अपमान ठरेल. कारण बाबासाहेबांचा सगळा संघर्ष हा आपल्या सर्वंकष मुक्तिसाठी होता, आपल्या खांद्यावर आपलं डोकं आहे आणि त्या डोक्यात मेंदू आहे. या मेंदूचा वापर आपण स्वतंत्र बुद्धीने करून माणूस म्हणुन आपल्या अंगभूत गुणांचा विकास करावा याचसाठी तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष होता ही बाब लक्षात न घेता आपण निव्वळ पोपट बनून राहणे बाबासाहेबांनासुद्धा अपेक्षित नव्हते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दिपस्तंभाप्रमाणे आहेत. समुद्रात जहाज भरकटू नये, त्यांना योग्य दिशा मिळावी यासाठी दिपस्तंभ उभारले जातात. समुद्र कितीही उधाणलेला असला, तुफान पाऊस, वादळवारा असला तरी त्या सगळ्यांशी भिडत दिपस्तंंभ ठाम उभे असतात. जहाजांना दिशा देण्याचं अखंड काम करत असतात. ही जहाज जर नवी क्षितिज काबिज न करता दिपस्तंभाभोवतीच नांगर टाकून बसली ,तर लक्ष्यापर्यंत पोहचतील का? बाबासाहेब नावाचा दिपस्तंभ पाठीशी असताना या जहाजांनी समुद्रात खोलवर प्रवास करून नवी नवी क्षितिजं काबिज केली पाहिजेत. तसं केल्यानेच त्या दिपस्तंभाचा खरा सन्मान होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सगळा संघर्ष आपली पिढ्यानपिढ्यांची मानसिक गुलामी नष्ट करून स्वतंत्र प्रज्ञेचा माणूस घडवण्यासाठी असताना आपण केवळ पोपट बनून राहणे हा खरंच आंबेडकरवाद आहे का यावर विचार झाला पाहिजे. जसा धम्म नित्य नूतन सनातन आहे, तसाच आंबेडकरवादसुद्धा नित्य नूतन सनातन आहे, पण त्यासाठी केवळ पोपटपंची न करता स्वतंत्र प्रज्ञेने विचार करणारे, ज्ञाननिर्मिती करणारे, नवनिर्मिती करणारे, कृती करणारे लोक निर्माण होणे. संवैधानिक मार्गाचा अवलंब करून लोकांच्या समस्या, दु:ख, दूर करणारे कार्यकर्ते निर्माण होणे हेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरं अभिवादन ठरणार आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस, विचारांस आणि कार्यास विनम्र अभिवादन.
– साक्या नितीन