मानवी विकासाच्या एका दिघाकालीन इतिहासाच्या टप्पावर मानवाने शहराचा विकास केला आणि आपले सामूहिक विकसित जीवन जगण्यास सुरवात केले . आपणास ज्ञात असलेले पहिले शह कॅटाल्होयू दक्षिणी अनातोलियामध्ये – सध्याच्या टर्की (तुर्कस्थान) सुमारे ८०००-९००० वर्षांपूर्वी बांधले गेले. . इ.स.पूर्व तिसऱ्य सहस्राब्दी पासून शहर-केंद्रित संस्कृती सिंधू खोऱ्यासह आशियातील बर्याच भागात – सध्याच्या पाकिस्तान,भारत आणि मेसोपोटेमिया, इराक आणि सीरियामध्ये विकसित केले गेले . त्यानंतर सुमारे 2000 वर्षांनंतर स्वतंत्र रहिवासी शहर ग्रीस आणि रोम मध्ये बांधले होते. ही शहरे संघटित सामूहिक जीवनावर आधारित होती. सामुहीक जीवन, तुलनेने घनदाट वस्ती, सुविधांची उपलब्धता आणि सामुहिक सामायिक जबाबदारीचे भान या आधारे या शहरांचा विकास झाला . तेथे रहाणारी लोक –नागरिक -ज्यांना काही राजकीय आणि कायदेशीर हक्क होते त्यांनीच ह्या शहरांना एक ओळख दिली. राष्ट्र हे ह्या मूल्यांचे आधुनिक रूप आहे.अर्थातच स्त्रिया आणि ‘गुलाम’ यांना आपले स्वातंत्र्य आणि समानता हे हक्क प्राप्त करण्यासाठी जबरदस्त संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे त्यांना हे अधिकार प्राप्त झाले.
हे एक ऐतिहासिक पण कटू सत्य आहे की ज्या लोकांनी ही शहरे उभारली त्या स्थलांतरीत मजुरांना नागरी आणि मानवी अधिकार नाकारले गेले. ‘अथिती देवो भव’ ही आपली संस्कृती सांगणाऱ्या भारतात ही भावना आपल्यात सर्व ‘अथितीं’ साठी नसते. त्यांना समान वागणूक कधीच देत नाहीत. कोविड दरम्यान 19 साथीच्या वेळी ज्यांनी ही शहरे निर्माण केली त्यां स्थलांतरित मजुरांकडे डोळेझाक करण्याचा सत्ताधीशांचा ढोंगीपणा आपण सर्वांनी बघितलाच आहे.
जगभरातील सर्व राष्ट्रांमध्ये स्थलांतरितांबाबत कायमच भेदभाव करण्यात आल्याचा भक्कम पुरावा आहे. मग तो भेदभाव हा वंश, भाषा, सांस्कृतिक व प्रादेशिक अस्मिता या कशावरही आधारित असो. भारत ही त्याला अपवाद नाही. इतर प्रांतातून किंवा देशातून आलेल्या लोकांप्रती सहिष्णुता आणि त्यांना स्वीकारण्याची भावना निर्माण होण्याची गरज आज सर्वच जगात आह अशाश्वतेला किंवा बदलांना स्वीकारण्याची एक व्यवस्था समाजात निर्माण होण्याची गरज आहे. लोक बहुविधातेला सामावून घेतील ही राजकीय इच्छाशक्ती ही निर्माण होण्याची गरज आहे. पृथ्वी ही केवळ मानवच नाही तर निसर्गासह इतर प्राणीमात्रांचे सामायिक संसाधन आहे ह्याचे भान तातडीने यायला हवे.
याच संदर्भात मी ‘टिन शीट्सच्या मागे’ ह्या एकता मित्तल आणि यशस्विनी रघुनंदन या दोन कलाकार कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या प्रकल्पाबद्दल लिहिणार आहे. एकता आणि यशस्विनी स्थलांतरितांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्ष बंगलोरमधे काम करत आहेत. त्यांना बंगलोर मेट्रोचे काम काम चालू असतांना टीनपत्रे ठोकून रहाणारी लोक सर्वत्र दिसत होती. ह्या टीनपत्र्यांमागे काय वास्तव दडले अही हे शोधण्याची त्यांची उत्सुकता होती आणि ह्यातूनच पुढे स्थलांतरित मजूरांवर सात छोट्या फिल्म्सची निर्मिती २००९ मधे झाली. .
स्थलांतरित मजूर हे सर्वसाधारणपणेशासनाकडून, अशासकीय संस्थांकडून किंवा माहितीपट फिल्म निर्मात्यांकडून एकतर नायक म्हणून तरी दाखवले जातात किंवा व्यवस्था, शासन अन्यायाचा बळी म्हणून दाखविले जातात ह्याचे भान ह्या चित्रपट निर्मात्यांना होते. ह्या पारंपारिक प्रतिमांच्या पलीकडे जाऊन स्थलांतरितांचे आयुष्य हे सामान्य, परिचयाचे आणि वैश्वीक आहे हे उलगडून दाखवण्यावर त्यांनी भर दिला. हा उद्देश सध्या करण्यासाठी त्यांनी त्यांच्या रोजच्या आयुष्याचे केलेले चित्रण आणि काही कलात्मक अमूर्त दृश्यांचा वापर केला गेला. मजूर बंगलोर मधील त्यांच्या अनुभवांच्या कहाण्या सांगत असताना आपल्याला शहरात मोठ्या प्रमाणावर चालू असलेले बांधकाम दिसत असते. पारंपारिक माहितीपट किंवा वृतांकानामधे “मी राधाबाई, बागलकोट माझ गाव’ असे ओळख करून देणारे एक वाक्य असते. परंतु ह्या लघुपटात आपल्याला ह्या मजुरांचे नाव कळत नाही. त्यामुळे त्यांच्या कहाण्यांची विशिष्ठ सुरवात नसते किंवा स्थलांतरित सामान्य माणसं होतात.
हे लघुपट बघताना प्रेक्षकांचा पात्रांबरोबर जो बंध जुळतो तो केवळ स्थलांतरित मजूर म्हणून नसतो तर एक सह-रहिवासी, संभाषणवादी आणि आपल्यासारखीच स्वप्न पहाणारी माणस म्हणून असतो. ‘त्यामुळे त्यांच्याबद्दल अनुकंपा किवा कणव वाटणे ही टाळले आहे. हे लघुपट बघताना समाजाबद्दल एक बांधिलकी निर्माण होते, त्यासाठीच्या शक्यता उमगायला लागतात. ‘प्रेझेन्स’ ह्या लघुपटात पडद्यावरील पात्र भूत भेटल्याच्या कहाण्या सांगतात. भुताच्याआपण कहाण्या ऐकल्या नाहीत किंवा सांगितल्या नाहीत असा माणूस सापडण जरा अशक्यच, आणि हीच आदिम मानवी उत्सुकता जात, वर्ग, लिंगभाव आणि भाषेच्या पल्याड जाऊन त्यातील पात्रांशी आपल्याला जोडते. एक कामगार ‘माझा भूतांवर विश्वास नाही कारण आपणच भूत आहोत’ हे वाक्य म्हणतो तेंव्हा ते वाक्य कुठेतरी आपल्या अनुभव विश्वाशी जाऊन भिडत. ‘बिऱ्हा’ हा लघुपट गेलेल्या, हरवलेल्या किंवा बेपत्ता माणसांबद्दल आहे. हजारो तरुण स्त्री पुरुष गावं सोडून शहरात येतात, कधीच न परतण्यासाठी. आपली मागे राहिलेले नातलग आणि मित्र आशा- निराशेच्या गर्तेत सोडून. वीज कोसळते तेंव्हा रवंथ करणारी म्हैस, सूर्यप्रकाश परिवर्तीत करणाऱ्या शांत जलाशयात तरंगणारा ऐटदार हंस, उमलत्या फुलांवरील कोळ्यांची जाळी ही सर्व दृश्य त्या विरहात सुद्धा आशेचा किरण दाखवात रहातात.
‘ A very old man with winged sandals’ ह्या २०१३ साली केलेल्या लघुपटात राष्ट्रीय श्रम संग्रह, नवी दिल्ली येथील साहित्य वापरले आहे. त्यात कॉम्रेड अनिल कुमार राय यांचे स्वतंत्र झारखंड साठी कामगार आणि आदिवासींना संघटित करतानांचे फुटेज वापरले आहे. १९६० मधे त्यांनी कोळसा माफियांविरुद्ध लढण्यासाठी बिहार कोलारी कामगार युनियन स्थापन केली होती. ह्या लघुपटात कोळसाखान कामगारांचे आयुष्य, वारंवार येणारी मानवनिर्मित आपत्ती- त्यातील एक १९७५ मधील चासानाला खाण घटना ज्यात ३५० खाण कामगारांचा पाण्यात बुडून जीव गेला होता- ह्या सर्वांचा उल्लेख आहे.
हा लेख लिहित असतानाच उत्तराखंडातील अजून एका आपत्तीत तपोवन येतील जलविद्युत प्रकल्पातील भोगाद्यात ३७ कामगार अनेक दिवस अडकून पडल्याची बातमी आहे. ३० मृतांचा आकडा जाहीर झाला आहे आणि २०४ लोक बेपत्ता आहेत. हिमप्रपातामुळे रौनथी ग्लेशिअर मधील १६ लाख (१.६ मिलियन) क्युबिक मीटर पाणी बाहेर आले आणि त्यामुळे ही आपत्ती ओढवल्याचे शास्त्रीज्ञ सांगत आहेत. आधीच भकास होऊ घातलेल्या भविष्याकडे मानव जात वाटचाल करत असताना ज्यांनी आपल्याला समृद्ध जीवनशैलीची स्वप्ने वास्तवात आणली त्या धरणे, रेल्वे, शहर उभारणाऱ्या कामगारांचे आणि शेतकऱ्यांच्या आयुष्याचा आपण क्षणभर थांबून विचार करणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे.
रश्मी सहानी