औरंगाबाद : शहरातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने संजय नगर, मुकुंदवाडी येथे महिला प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते पार पडले.

वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक २४ मधील या प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. कार्तिकी एंटरप्राइजेस संचलित या केंद्रामध्ये महिलांना विविध कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश आहे.

या उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका करुणा मेघानंद जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून परिसरातील महिलांना रोजगारनिर्मितीच्या नव्या वाटा खुल्या होणार असून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.



