राज्यात भाजप-काँग्रेस गुप्त युती उघड
मुंबई : राजकारणात परस्परविरोधी भूमिका घेणारे काँग्रेस आणि भाजप एकाच व्यासपीठावर दिसू लागल्याने, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे “आता भाजपची बी टीम कोण?”
सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडियावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यातील गुप्त युतीचा पर्दाफाश करत राज्यातील काही महत्त्वाच्या स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी केलेल्या आघाड्यांची यादी सादर केली आहे.
त्यांनी नमूद केले की, सोलापूर APMC निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने थेट आघाडी केली आणि एकत्र निवडणूक लढवली.
नागपूरमधील मौदा खरेदी-विक्री संघ निवडणुकीत दोन्ही पक्षांनी अधिकृत युती केली आणि संयुक्तरित्या विजय मिळवला.
भंडाऱ्यातील दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिंदे गटासोबत हातमिळवणी केली.
या घटनांचा आधार घेत सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. “वंचित बहुजन आघाडीवर भाजपची बी टीम असल्याचे आरोप करणारे तथाकथित पुरोगामी आता काँग्रेस-भाजपच्या युतीवर गप्प का? त्यांच्या बौद्धिक प्रामाणिकतेचं काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले की, “मुख्य प्रवाहातील पक्ष जेव्हा वंचित समाजाच्या प्रतिनिधित्वावर अडथळे निर्माण करतात, तेव्हा कोणीच प्रतिक्रिया देत नाही. काँग्रेस-भाजपसोबत युती करत असतानाही काही मंडळी शांत राहतात, हे दुहेरी धोरण आहे.
” राजकीय वर्तुळात सुजात आंबेडकरांच्या या प्रश्नांनी खळबळ उडवली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेसच्या भूमिकेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या आक्रमक भूमिकेवर काँग्रेसच्या नेत्यांनी अजून कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.