१९२५ च्या नियोजनाप्रमाणे रा.स्व.संघाची “सामाजिक-सांस्कृतिक म्हणून आर्थिक-राजकीय कटाची” अंमलबजावणी जोरात सुरू आहे. त्याचवेळी सारा मिडीया मात्र त्यांच्या विविध ’सिरिअल्स’ मधून धादांत खोटा इतिहास दाखवत ब्राह्मणी धर्म-संस्कृतीचा उदो उदो करीत आहे. तो त्यांच्याच कटात सामिल झाला आहे. सध्या सोशल मिडीयात वारकरी परंपरेत कधिही न दिसलेली चित्रं, न ऐकलेल्या तिथी-दिवस, घोषणा, पोस्ट्स धूमाकूळ घालत आहेत. या मिडीयात सक्रिय असलेल्या समतावादी मंडळींचे याकडे लक्ष गेलेय असे दिसत नाही. त्याचवेळी मा. पंतप्रधान ब्राह्मणी संघाचे निष्ठावंत सेवक नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहा मिळून सोशल मिडीयांवर अधिकाधिक कडक बंधनं घालून त्यांचा “सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय” कार्यक्रम राबवित आहेत.
असं काय घडतेय? “काळ्या-सावळ्या विठ्ठलापासून रुख्माईला गायब करून त्यांच्या डावी-उजवीकडे दुसरेच कुणीतरी अन्य दिसत आहेत! विठ्ठलाच्या डोक्यावर “शिव नमन” घोषणा, शेजारी सूर्यदेवाचा फोटो, खाली “जय हरी विठ्ठल” लिहीलेय. विठ्ठल-रुखमाईचे वारकरी ऊठता बसता “पांडुरंग-हरी” म्हणतात, पण आता “राम-कृष्ण-हरी” हा नारा सर्वत्र आणला गेला आहे. त्याच क्रमाने फोटोही आले आहेत. “राम राम” म्हणणारा शेतकरी-शेतमजूर-बारा-बलुतेदार कधिही गांव-वस्तित राम मंदीर बांधताना दिसलेला नाही. मात्र त्यांचे ओबड-धोबड दगडाचे देव आहेत खंडोबा, जोतीबा, विरोबा, मरिआई, धावबा, आदी. “जोतीबाच्या नावानं चांगभल” (खाली काळा रंग व विस्फारलेल्या डोळ्याचा जोतीबा), दुस-या बाजुला “यळकोट यळकोट जय मल्हार” (खाली भंडा-याने भरलेले कपाळ, लाल भडक शरीर व विस्फारलेल्या डोळ्याचा फोटो) आणि यांच्यामध्ये “ओम सूर्य देवाय नम:” असे लिहून खाली सूर्य देव रथात बसून स्वारीवर निघालेला फोटो! शेजारी भगवा दिसणारा झेंडा!! विठ्ठलाच्या मूर्तीखाली “जय हरी-विठ्ठल” ऐवजी “राम कृष्ण हरी” आणि शेजारी वराहादी अवतारात हनुमान आणि खाली “जय श्रिराम” आहे!!! वर लिहीलेले आहे “मोहिनी स्मार्त एकादशी” अशी एखादी एकादशी बहुजनातील वारक-यांनी कधीच ऐकलेली नाही. हा सारा “खेळ” काय आहे? राम जन्म भुमी झाली. आता श्रिकृष्ण जन्मभुमी आणि नंतर विठ्ठलावर स्वारी आहे! सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय सत्तेची न्याय्य मनिषा बाळगणा-या वंचित बहुजनांनी या ब्राह्मणी धर्म-संस्कृतीच्या प्रतिक्रांतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही! या पलिकडच्या त्यांच्या विविध खोट्या पोस्ट तर वेगळ्याच!!
ब्राह्मणी धर्म-संस्कृतीचे असे घुसखोर धोरण अडीच हजारहून अधिक वर्षांच्या बौध्द धर्माचा धसका घेतल्यापासून सुरू आहे. त्यानंतर १२ व्या शतकात श्रीचक्रधरस्वामी “मनुस्मृती आधारित ऊच्चनीचपणाचा त्याग करा” असे सांगून म्हणतात, “उत्तम भणिजे ब्राह्मण: आन आधम भणिजे मातंग : ऐसे म्हणे: परि तोही मनुष्य देहची: परिवृथा कल्पना करी:—महारवाड्याहोनि धर्म काढावा!” पुढे आठशे वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वास्पृश्य समाज सोबत घेवून १९५६ सालात “बौध्द धम्म स्विकारून श्रीचक्रधरस्वामींचे स्वप्न पूर्ण केले. बाबासाहेबांनी बुध्द, कबीर, फुले हे तीन गुरू मानले. ही एक महाविशाल समतेची परंपरा आहे. उत्तरेत विठ्ठलाला नेणा-या संत नामदेवांनी पंडितांच्या गढातच जाऊन गुरूमुखीतून खडे बोल सुनावले. ते म्हणतात, “बानारसी तपु करै उलटि तीरथ मरै—–“ (आपणास उलटे टांगून घेऊन तपश्चर्या करा, अथवा काशी, प्रयाग, हरिद्वार, मथुरा, इ. पवित्र स्थळी मरा,—–सर्व ढोंगे व्यर्थ आहेत. कुंभमेळ्याचे प्रसंगी गंगा, गोदावरी, या नद्यांत स्नानें करा,–ब्राह्मणांना बोलावून भारंभार सुवर्ण द्या, –) आज जे काही अयोध्या, वाराणसी-काशी, कुंभमेळ्यात चालले आहे त्याला हे लागू होतेय.
देहू रोड येथे १९५४ साली डॉ. बाबासाहेबांनी “पंढरपूर येथे बौध्द धर्माचे देवालय होते हे मी सिध्द करून देईन.” असे म्हटले होते. तर त्या आधी आठ शतके तुकारामांची ब्राह्मण शिष्य संत बहिणाबाई त्यांच्या अभंगात सांगतात,”विठ्ठलासीं तया नाहीं भेदभाव I ऐसे माझें मन साक्ष आहे II ४ II कलियुगीं बौध्दरुप धरी हरी I तुकोबा शरीरीं प्रकटला II ६ II ब्राह्मण विधवा स्त्रिचे केशवपन करून तिला घराच्या अंधा-या खोलीत कोंडत असत. अशावेळी स्त्री-पुरूष समतेचे श्रीचक्रधरस्वामी प्रश्न करतात, “पुरूषांचा जीव आणि स्त्रिचा जीव यात फरक आहे?” बाराव्या-तेराव्या शतकात महाराष्ट्रात चांगदेव, शेख महंमद, निवृत्तिनाथ, सुदामा, एकनाथ, नामदेव, ज्ञानदेव, सोपान, रोहिदास, मुक्ताई, जनाई, साळ्या रसाळ, भानुदास, चोखा, विसोबा खेचर, कान्हो पाठक, कुर्मदास, सच्चिदानंद बाबा, बंका, राका कुंभार, जोगा परमानंद, चोखोबा मेळा, सेना न्हावी, सावता माळी, नरहरी सोनार, चांगा वटेश्वर, आदी स्त्रीशूद्रादीशूद्र संत आणि बंडखोर काहीच ब्राह्मण संतांनी ब्राह्मणी धर्माचे चिरे आणखी हलविणे सुरूच ठेवले. संत नामदेवांची मराठवाड्यातील गोदावरी काठच्या शिष्य संत जनाबाईला ब्राह्मणांनी चोरीचा खोटा आरोप करून खुप छळले. ती निर्भयपणे सांगते, “पदक विठ्ठलाचें गेलें I ब्राह्मण म्हणती जनीनें नेलें II अगे शिंपीयाचें जनी I नेलें पदक दे आणोनी II—“ बडव्यांच्या जाचाला त्रासून संत चोखा मेळा कळवळून म्हणतात,”धांव घाली विठू आतां चालूं नको मंद I बडवे मज मारीती ऐसा काही तरी अपराध II १ II विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला I शिव्या देती म्हणती म्हारा देव बाटविला II पुढे अस्पृश्य जातीतील चोखा सरळ सरळ ब्राह्मणी धर्मालाच आव्हान देत म्हणतात, “वेदाचा अनुभव शास्त्राचा अनुवाद I नामचि गोविंद एक पूरे II” असे रोखठोक बोलणा-या सनातन संस्कृतीविरोधाची ही ऐतिहासिक चळवळ बुध्द, श्रीचक्रधरस्वामी, संत कबीर, आदी नंतर पुढे जोतिराव-सावित्री, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पार विसाव्या शतकात गाडगेबाबांपर्यंत पोचते. यामुळे समतेच्या क्रांतिकारकांची विशाल साखळी निर्माण झाली आहे. ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण नसल्याचा गर्व म्हणून संत तुकाराम अभंगात म्हणतात,”मुखे सांगे ब्रह्मज्ञान I जन लोकांची कापितो मान II १ II ज्ञान सांगतो जनासी I नाही अनुभव आपणासी II २ II —-त्याचे हाणुनि थोबाड फोडा II ४ II” ते आपले नाते बळीच्या परंपरेशी सांगताना ते म्हणतात, “कर्ण भिडता समरांगिणी—“बळी सर्वस्वे उदार I—तो पाताळीं घातला II महारासि सिवे I कोपे ब्राह्मण तो नव्हे I” या आणि जोतीराव फुले यांच्या भूमिकांमुळे त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्यावरील लेखात अनेकांनी त्यांचा “एकोणीसाव्या शतकातील “संत तुकाराम” असा उल्लेख केला होता. आठशे वर्षांपूर्वी मृत्यूची अजिबात भिती न बाळगता वारकरी-सत्यशोधक आपल्या अभंग-अखंडांतून ब्राह्मणशाहीवर निरंतर रोखठोक हल्ले करून स्त्रीशुद्रादीशूद्रांना जागे करत होते. हा सर्व इतिहास पाहिल्यावर “मंबाजी भट बोलला म्हणून इंद्रायणी नदीत तुकोबांनी स्वत:च्याच हाताने अभंगांची गाथा बुडविणे आणि त्यानंतर त्यांचे तथाकथित पुष्पक विमानाने सदेह वैकुंठ गमन, सावित्री फुले शिक्षीका मुलींच्या शाळेत जातानाचा प्रचंड त्रास, लिंगायत धर्माचे संस्थापक बसवण्णांवरील हल्ले आणि विसाव्या शतकात राज्यघटना आराखडा बनवल्यावर बाबासाहेबांना हिंदू कोड बिल, मागास जातींना राखीव जागांची तरतूद, यावर जो विरोध झाला; आदींचा अर्थ-अन्वयार्थ लावणे सोपे होते. त्याचबरोबर लोकशाही, समतावादी, शक्तींच्यादृष्टीने मोठा सकारात्मक बदलही दिसतोय. “जस जसे स्त्रिशुद्रादीशूद्र जागे होताहेत; सन्मानजनक मार्गाने सत्ता, संपत्तीवर उघड दावे करु लागले; तसतसे ब्राह्मणी शक्तींच्या विरोधाचे स्वरूपही बदलताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर बुध्द-कबीर-पांडुरंग-बसवण्णा-फुले-शाहू-आंबेडकरांच्या इतिहासाला ब्राह्मणी धर्म-संस्कृतीग्रस्त असे विकृत का करत आहेत याचा अर्थ लागतो.
नियोजनबध्दरित्या रा. स्व. संघ सर्व सत्तास्थानांवर आला आहे. या पार्श्वभुमिवर जरी समतेची परंपरा राजकीय सत्तेवर आज दिसत नसली; तरिही सामाजिक-सांस्कृतिक-वैचारिकसह काही क्षेत्रांत समतावादी परंपरा आपल्या जनशक्तीसह ब्राह्मणी सत्तेला हादरे मात्र देत आहे. “बुध्द स्वत:ला माणूस म्हणतो.” तरिही त्याला नववा अवतार मानणारी, बहुजनांवर लादणारी ब्राह्मणी परंपरा भागवत संप्रदायात म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कशी पाझरत आली; त्याचा शोध घेणे हे फुले-आंबेडकरी इतिहासतज्ञांसमोर आव्हान आहे. यातील काही संदर्भात विठ्ठल परंपरेचे संशोधक प्रसिध्द इतिहासतज्ञ मा. रा. चिं.ढेरे त्यांच्या “श्रीविठ्ठल : एक महासमन्वयक” या ग्रंथातही असेच म्हणतात.
वंचित बहुजनांचा सावळा विठु माऊली शेजारची सावळी रुख्मिणी हटवून तेथे गो-या-गोमट्या देवींचे फोटो लावणे हा ब्राह्मणीकरणाच्या कटाचा एक भाग आहे. याकडे चित्रकार, अभ्यासक, कार्यकर्ते यांचे लक्ष गेलेले दिसत नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, “ब्राह्मण्य म्हणजे बहुजन समाजाच्या अज्ञानावर आधारलेले जाती वर्चस्व.” याची चुणूक काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात या घातक डावाचे शिरोमणी संभाजी भिडे यांनी पुण्यात वारकरी दिंडीत तलवार घेवून दाखवली होती. त्यांनी जो काही “हिंसक खेळ” सुरू केला; हा सा-या महाराष्ट्राने पाहिला. त्यांच्याविरुध्द तशी तक्रार पुण्यातच वारक-यांनी केली आहे. तोच धुडगूस भिमा कोरेगांवला घातला गेला. मनुस्मृतीसमर्थकांना थेट आव्हान देणारी सच्ची फुले-आंबेडकरी विचारसरणी आणि यातील प्रामाणिक जनता जेव्हा वारकरी व तेथील छोट्या दुकानदारांच्या बाजूने २०२१ मध्ये बाळासाहेब आंबेडकरांसोबत पंढरपूरला विठ्ठल-रुख्माईच्या मंदिरात गेली; त्यानंतर ब्राह्मणी शक्तींनी हे खेळ आणखीच गतिमान करायला सुरूवात केली. आता तर त्यांनी विठ्ठल-रुख्माईलाच घेरले आहे! बुद्ध ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील प्रदीर्घ, अभिमानास्पद, समतावादी परंपरेची मजबूत साखळी कबीरादी संत परंपरा, कुणबी राजा शिवाजी महाराज, सत्यशोधक जोतिराव-सावित्री फुले, शाहू महाराज ते पुढे गाडगेबाबांपर्यंत पोचते. म्हणूनच या तगड्या विचारसरणी, चळवळीची सर्वांत जास्त भिती संघ परिवाराला वाटत आहे. सांस्कृतिक-राजकीय सत्ता मिळताच तिचा पुरेपूर फायदा घेत या शक्तिंनी फासे टाकायला सुरुवात केली. एक एक करत वंचित बहुजनी परंपरेतील आंबेडकरभवन, भिमा कोरेगांवसारखी प्रेरणादायी प्रतीकं बळकवायचा, नष्ट करण्याचे अटोकाट पण नियोजनपूर्वक प्रयत्न सुरु आहेत. लग्न पत्रिका, घर भरणी, बारसे, आंबेडकर जयंती, इ. कार्यक्रमात त्यांची प्रतीकं घुसवत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे “क्रांतीबरोबर प्रतिक्रांतीही येत असते.” १९ मे १९१० ला महात्मा गांधींचा ब्राह्मणी हत्त्यारा नथुराम गोडसेचा जन्मदिन. हा दिन हिंदू महासभेने “हुतात्मा पंडीत नथुराम गोडसे जयंती” म्हणून त्याचा फोटो देवून साजरा केला. एवढेच नाहीतर यावर ज्या कॉमेंट्स आल्या त्यातून त्यांची विकृत मानसिकता लक्षात येते. सनातनी ब्राह्मण लिहीतात–विनम्र अभिवादन, अनंत उपकार ह्या थोर विभूतीचे, तेथे कर माझे जुळती, यांच्या देशभक्तीला प्रणाम, इ., मध्यंतरी याचे आणखी उदात्तीकरण करणारे एक नाटकही आले होते. व त्यातील एका मुख्य नटाने मोठ्या गर्वाने नथुरामचे समर्थन केले.
शेवटी २५ डिसेंबर १९५४ रोजी देहू रोड येथे लोकांसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर “बौध्द धम्म व ब्राह्मणी धर्म” संदर्भात काही विधानं करतात. त्याचा अर्थ– बौध्द धम्म हा ब्राह्मणी धर्माचा सत्यानाश करील. ते पुढे म्हणतात,”हे पहायला कदाचित मी असणार नाही. मात्र (ब्राह्मणी धर्मातील—माझे शब्द)——एक मनुष्य काही माणसांना काही काळ फसवू शकतो. पण एक मनुष्य सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही.” ब्राह्मणी धर्म-संस्कृतीविरुध्दचा हा वंचित बहुजन संकृतीचा राजकीय संघर्ष जारीच रहाणार आहे.
शांताराम पंदेरे
मोबा.: ९४२१६६१८५७
Email: shantarampc2020@gmail.com