सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलेला असून जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. दररोज कोविडचे रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. तरीसुद्धा प्रशासन जिल्ह्यातील रुग्णांना योग्य उपचार व बेड उपलब्ध होतील अशी उपाययोजना करताना दिसत नाही. कोविड रुग्णांची जिल्ह्यातील व तालुक्यातील रुग्णालयात गैरसोय होताना दिसत आहे. रुग्णालयात रेडमेसीवर व संबंधित अन्य औषधसाठा उपलब्ध नाही. व्हेंटिलेटर बेडची अत्यंत आवश्यकता असताना व्हेंटिलेटर बेडसुद्धा उपलब्ध नाहीत. ही बाब अतिशय गंभीर असून कोरोना सारख्या महाभयंकर महामारीला रोखण्याकरिता तात्काळ उपाययोजना करावी व जिल्ह्यातील सर्व रूग्णालयात आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या या मागणीकरिता वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी केली.
अन्यथा दोन दिवसानंतर उग्र आंदोलन: राजु झोडे
माननीय आरोग्यमंत्री यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा आपल्या अधिकारात घेऊन संपूर्ण खाजगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर व ऑक्सिजन पुरवठा मुबलक करून देण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये वेंटीलेटर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता करून औषधसाठा मुबलक प्रमाणात द्यावा व सर्व खाजगी डॉक्टरांना शासकीय यंत्रणेत सामावून कोरोनासारख्या आजारावर नियंत्रण मिळवावे. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला ह्या संकटाचा सामना करण्यासाठी त्रास होणार नाही. अशा जनहितार्थ मागण्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते कुशलभाऊ मेश्राम, विदर्भ समन्वयक राजू झोडे, जयदीप खोब्रागडे, लताताई साव, तनुजा रायपुरे संपत कोरडे बंडु ढोंगळे वंदना तामगाडगे सुभाष ढोलणे तथा वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले.
जर वरील मागणी तात्काळ पूर्ण केल्या गेली नाही तर वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरच्या वतीने संबंधित मागण्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी द्वारा देण्यात आला.