Rahuri : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला वेग देण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे ९ एप्रिल २०२६ रोजी राहुरी येथे येणार आहेत. येथील आत्मा मालिक हॉलमध्ये आयोजित मेळाव्यात ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा महासचिव मधुकर साळवे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राहुरी विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने संतोष चोळके यांना उमेदवारी देत प्रस्थापित घराणेशाहीला थेट आव्हान दिले आहे. ही निवडणूक सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी आणि उपेक्षितांच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले. (Rahuri Election 2026)
तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी भाजपवर धर्माच्या नावावर राजकारण केल्याचा आरोप केला. सध्या भाजपविरोधात वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिक व शेतकरी भयभीत झाल्याचे ते म्हणाले. ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यातच रंगणार असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, उमेदवार संतोष चोळके यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, त्यांचे हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर आधारित आहे. विकासाच्या नावावर अपयशी ठरलेल्या आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. (Rahuri Election 2026)
“ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते शिरीषराव गायकवाड, बाबासाहेब साठे, संदीप कोकाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



