पैठण : पैठण तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी पैठण तालुका अध्यक्ष सोमनाथ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील मौजे कातपूर ग्रामपंचायत हद्दीतील संजय नगर, राजीव गांधीनगर, राहुल नगर येथे सुमारे 50 वर्षांपासून राहत असलेल्या आणि ग्रामपंचायत मार्फत विविध शासकीय योजनेअंतर्गत घरकुल व अन्य योजनेचा लाभ घेतलेल्या स्थानिक रहिवाशांवर जायकवाडी पाटबंधारे विभागाने शासकीय जागेवरील विनापरवानगी अतिक्रमण नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याचे कार्यवाही सुरू केली.
‘सर्वांसाठी घरे २०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय (शासन निर्णय) आहे. तरीही शासकीय कामकाजातील दिरंगाईमुळे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आंदोलकांनी केला म्हटले.
आंदोलकांनी पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार आणि जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथसागर (उत्तर) पैठणचे कार्यकारी अभियंता संत साहेब यांच्याकडे निवेदन दिले आणि खालील प्रमुख मागण्या केल्या:
१. मौजे कातपूर हद्दीतील संजय नगर, राजीव गांधीनगर, राहुलनगर येथील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे.
२. जायकवाडी पाटबंधारे विभागाने अतिक्रमण निष्कासित करण्याच्या कारवाईतून गरजू निवासी अतिक्रमणे वगळण्यात यावीत.
वरील मागण्या पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडीने जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी जिल्हा सदस्य भगवानराव बनसोडे, तालुका सचिव अतुल गिरी, उपाध्यक्ष विष्णू वीर, राम मिसाळ, तालुका संघटक अभिजीत पाटील पवार, शेषराव निकाळजे, संतोष खोतकर, पंकज गायकवाड, प्रदीप ठोंबरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुंदरराव निसर्गद, आकाश गायकवाड, प्रदीप गायकवाड, गंगाधर म्हस्के, दीपक गायकवाड, अविनाश चाबुकस्वार, संतोष साबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






