पाचोरा: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळल्याचा, वंचित बहुजन आघाडी पाचोरा तालुक्याच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यासंदर्भात पाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मंत्र्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (Girish Mahajan controversy)
प्रजासत्ताक दिनी संविधान निर्मात्यांचा उल्लेख टाळणे हा समस्त आंबेडकरवादी जनतेचा अपमान आहे. मंत्री महाजन यांनी या प्रकाराबद्दल जाहीर माफी न मागितल्यास, वंचित बहुजन आघाडी आणि फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीचे नागरिक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन आणि मंत्री सर्वस्वी जबाबदार असतील, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
२६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. याच कार्यक्रमात वनविभागात कार्यरत असलेल्या माधुरी जाधव यांनी मंत्र्यांच्या या भूमिकेचा जागीच निषेध करत त्यांना जाब विचारला. त्यांच्या या धाडसाचे वंचित बहुजन आघाडीने कौतुक करत सार्थ अभिमान व्यक्त केला आहे. (girish Mahajan controversy)
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे अनिल लोंढे (जिल्हा उपाध्यक्ष), अमित तडवी (जिल्हा महासचिव), संदीप जाधव (तालुका अध्यक्ष), अमोल अहिरे (तालुका महासचिव),
मनोज अहिरे, विशाल सोनावणे, राहुल गायकवाड, गोकुळ संसारे, संतोष गायकवाड, राजेश सोनवणे आदी पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.






