संवादाची माध्यमे बदलली परंतु, प्रिंट मीडियाचं अजूनही वर्चस्व संपलेल नाही. माध्यमांमध्ये रेडिओ, टीव्ही, नव माध्यमे आली. त्याचे वेगवेगळे प्रकार आले. यात माध्यमे प्युअर फॉर्ममध्ये राहिलेली नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० मध्ये “मूकनायक” या आपल्या वर्तमानपत्राची जाहिरात केसरीमध्ये देण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी केसरीमध्ये जाहिरात देण्यासाठी पैसेही पाठविले पण, केसरीने ती छापली नाही. या घटनेला आज अनेक वर्षे झाली पण, वर्तमानपत्रे बदलली आहेत असे आजही दिसत नाही. आजही माध्यमांमधील दुजाभाव कायम आहे. फक्त ती मांडण्याची भाषा बदलली आहे पण, त्याचा अर्क आजही तसाच राहिलेला आहे.
“प्रबुद्ध भारत” आणि तत्सम पाक्षिक ह्यांनी मुख्य प्रवाहातील मीडियाला बदलायला लावलं आणि नवीन व्यवस्थेच्या बाजूने उभे राहण्यास भाग पाडले. सध्याच्या स्थितीत मुख्य प्रवाहातील माध्यमांचा दुजाभाव अधोरेखित झालेला आहे. मग तो प्रिंट मीडिया असो की टेलिव्हिजन मीडिया असो. २ – जीचा मोठा घोटाळा झाला. तो त्याच पद्धतीने रंगवण्यात आला. ते योग्य की अयोग्य? हा इतिहास सांगेल पण, माझ्यादृष्टीने राईचा पर्वत करण्यात आला. तशाच पद्धतीचा फ्रॉड राफेल विमान खरेदीमध्ये झाला. काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या संस्थेने १ मिलियन युरो इतकी लाच या खरेदी व्यवहारामध्ये एका मध्यस्थाला देण्यात आली. अशी माहिती जाहीर केली. त्याची अनेक वर्तमानपत्रांनी बातमी केली नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्राईम टाइमचा विषय तो झाला नाही. दोन्हीही घोटाळे राष्ट्रीय दृष्टिकोनातून देशाच्या हितसंबंधाचे होते.
यातून ‘प्रबुद्ध भारता’च्या वाचकांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, जोपर्यंत ‘प्रबुद्ध भारत’ सारखे पाक्षिक आपण जिवंत ठेवत नाही, तोपर्यंत मेनस्ट्रीम मीडियावरती अंकुश ठेवता येणार नाही. जयंतीनिमित्त आपण संकल्प करूया की, प्रबुद्ध भारतचे वार्षिक वर्गणीदार होऊ आणि ते सतत सुरु राहील यासाठी सहकार्य करत राहू.