आपल्याला काय फरक पडतो ?
जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल असा प्रश्न दीर्घकाळात आत्मघातकी सिद्ध होतो. खरेतर खूप फरक पडतो हे सिद्ध झाले आहे.
तिकडे अमेरिकेत आर्टिफिशियल इंटीलिजन्स धुमाकूळ घालू लागले आहे; आपण तर इमाने इतबारे नोकरी करतो; आपल्याला काय फरक पडतो ?
रुपया घसरला ; आपण तर आयुष्यभर रुपयात सारे व्यवहार करतो, डॉलर काळा का गोरा हे देखील कधी बघितले नाही ; आपल्यला काय फरक पडतो ?
अमेरिका भारत (आणि इतर राष्ट्रांबरोबर देखील ) व्यापार करार होणार आहे म्हणे; आपण तर प्रगतिशील शेतकरी आहोत. आपल्याला काय फरक पडतो ?
असे बोलणारे अनेक जण असतात; पण वरकरणी , आपल्याशी डायरेक्ट संबंधित नसणाऱ्या, जागतिक स्तरावर आणि देशाच्या राजकीय अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या अनेक मोठया घडामोडी , आज ना उद्या आपल्या मानगुटीला पकडतातच !
गेल्या काही दशकांच्या आर्थिक इतिहासावर नजर जरी टाकली तरी हे लक्षात येईल
ऐंशीच्या दशकात शिकागो स्कुलचे अर्थतज्ञ , जागतिक बँक, नाणेनिधी…बाजाराधिष्टित आर्थिक तत्वज्ञानावर चर्चा करत होते ; आपल्याला माहीतही नव्हते , त्यानंतर पृथ्वीवरील जवळपास प्रत्येक देशात त्या नवउदारमतवादी आर्थिक तत्वज्ञानांवर आधारित अर्थव्यवस्थांचे पुनर्संघटन केले गेले
ऐंशीच्याच दशकात पर्सनल कॉम्प्युटर्स आले ; सरकारने काही फतवा नव्हता काढला कि कॉम्प्युटर नाही घेतला किंवा वापरला तर तुरुंगात टाकू ; पण ४० वर्षानंतर अगदी ग्रामीण भागातील ज्यांना चालवता येत नाही त्यांना देखील आपल्या पाल्याना कॉम्प्युटर आला पाहिजे हे कळले
नव्वदीच्या दशकात जागतिक बँक मायक्रो फायनान्स वर मांडणी करत होते ; १०० कोटींचा फंड तयार केला गेला ; मोहंमद युनूस ना नोबेल प्राईज दिले गेले ; आपल्याला माहित नव्हते. आज भारतातील नाही जगातील ५०० कोटी बॉटम ऑफ पिरॅमिड लोकसंख्या या भोवऱ्यात ओढली गेली आहे
याच सर्व काळात इंटरनेट , स्मार्टफोन , इंटरनेट बँकिंग , क्रिप्टो , युपीआय, सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक , व्हाट्सअप , इन्स्टा , ट्विटर , ऑनलाईन डेटिंग , पॉर्न्स, सॅटेलाईट्स , ओटीटी प्लॅटफॉर्म्स , ऑनलाईन रिटेल , वर्कर्सची नवीन कॅटॅगिरी : गिग वर्कर्स , शेकडो अँड्रॉइड बेस्ड ऍप्स … … … तुम्हीच काढा यादी
आपल्या २४ तासाच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या नाही तर अविभाज्य भाग झालेल्या यातील जवळपास सर्व गोष्टी हजारो किलोमीटर दूर , संख्येने अतिशय मूठभर असणाऱ्या व्यक्तींनी तयार केल्या / ठरवल्या / विकसित केल्या आहेत , आज देखील जात आहेत , नजीकच्या भविष्यात केल्या जातील
आपल्याला पहिल्यांदा वाटते हे सारे त्यांच्यासाठी म्हणजे प्रस्थापित, उच्च वर्गासाठी आहे , पण काही दिवसांनी कळते तो मोठा मोठा होत जाणारा आपल्याला, आपली परवानगी न घेता , कवेत घेणारा महाकाय भोवरा आपल्याला आतपर्यंत ओढून घेतो.
हे चांगले का वाईट , हे शोषक का मुक्तिदायी , हे चंगळवादी का आरोग्यदायी , हे नफेखोर कि चॅरिटेबल याबाबत जजमेंटल न होता याची किमान माहिती घेतली पाहिजे ; त्या क्षेत्रातील तंत्रज्ञ , विशेषज्ञ व्यक्तींना पाचारण करून समजवून घेतले पाहिजे. ऑथेटिंक माहिती, आकडेवारी, संकल्पना महत्वाच्या असतात.
मूल्यधरित, नैतिक जजमेंट त्याला पर्याय नाही. ते जजमेंट पास केले कि आपल्या मनाची , मेंदूची सारी कवाडे बंद होतात ; मग आपण तेच बघतो , तेच ऐकतो , तेच वाचतो , त्यांचेच ऐकतो जे आयडियॉलॉजिकली आपल्याला जवळचे आहे ; त्याने आपलेच नुकसान होते.





