फोटोची पार्श्वभूमी
पिढ्यानपिढ्यांपासून भुमिहीन शेतमजूरांनी वहितीखाली आणलेली गायरान, पडीत, वन जमीन त्यांच्या नांवावर करा व अत्याचार करणा-यांवर कारवाई करा” या मागण्यांवर महाराष्ट्रभर विविध पक्ष-संघटना आपापल्या कार्यक्षेत्रांत लढत होते. या दरम्यान अंबड तालुक्यातील (जि.जालना) लिंबोणी गांवी गायरान जमीन कसत असताना बौध्द समाजातील भुमिहीन महिलांची कत्तल झाली. त्यानंतर उठलेल्या आग डोंबातून या मागणीवर चळवळ उभारण्यासाठी १९८६-८७ ला “भुमिहीन हक्क समिती (भु.ह.स.)” स्थापन झाली होती. या समितीमध्ये प्रथमपासूनच महाराष्ट्रातील भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), लाल निशाण पक्ष-लेनिनवादी (लानिप-ले.), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष (सकप), जनता पक्ष (जद), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मा-ले.), युवक क्रांती दल (युक्रांद), श्रमुक मुक्ती दल (श्रमुद), शोषित जन आंदोलन (शोजआं), आदी पक्ष-संघटना सहभागी होत्या. बाळासाहेब आंबेडकर समितीचे निमंत्रक होते.
साम्यवादी-समाजवादी मित्रांचे कॉंग्रेस-रिपब्लिकन संयुक्त प्रेम!
भाकप च्या परळ येथील सुप्रसिध्द “दळवी बिल्डींग” येथील समिती बैठकीत रामदास आठवले, रा.सु.गवई यांच्या नेतृत्वाखालील रिप. पक्षांना घ्यावे असा सूर आमचे मित्र साम्यवादी, समाजवादी यांनी लावला होता. “गावोगावी-राज्यभर गायरान-वन जमीन कसणा-या भुमिहीन दलित-आदिवासी-भटके-विमुक्त-बौध्द, मुस्लिम, ख्रिश्चन दलितादी समुहांवर अत्याचार करणारे समुह हाच कॉंग्रेसच्या सर्व गटांचा सामाजिक-राजकीय पाया होता व आजही आहे. हे नेते व त्यांचे रिप. पक्ष कायमच कॉंग्रेसच्या मागे उभे रहात आले आहेत. म्हणून त्यांना समितीमध्ये अजिबात घेवू नये” ही प्रथम पासूनच एड. बाळासाहेब-भारिप, लानिप (ले), युक्रांद, सकप, आदींची स्पष्ट भुमिका होती.
ब.श्र.समिती आणि संधिसाधू रिडालोस
परंतु १९९५ नंतर आंदोलनातुन उभी राहिलेल्या “ब.श्र. समिती” मध्ये कोणतीच चर्चा न करता यातील साम्यवादी-समाजवादी पक्षांनी या नेत्यांना सोबत घेवुन “रिडालोस” ही राजकीय आघाडी निवडणुकीच्या तोंडावर उभी केली. आणि १९९५ साली ज्यांना “कॉंग्रेस पडल्याचे कायम दु:ख झालेय; बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाबरोबर समितीत गेलो आणि वरील कॊंग्रेसवासी नेत्यांना सोबत घेतले नाही; ही घोडचूक वाटत होती” असे ज्यांना नेहमीच बोचत रहात होते” त्यांनी भारिपवर (मूक) खोटा शिक्का मारुन सोडचिठ्ठी दिली. केवळ “कुणितरी रिपब्लिकन नांव व निळा झेंडा” पाहिजे अशी “कॉंग्रेस-भाजप-सेना-मनसे” च्या “बनेल” डावपेचाप्रमाणे या पुढा-यांना सोबत घेतले. “निवडणुक संपली. रिडालोस कुठे गायब झाली? पत्ता नाही. फुले-आंबेडकरी सर्व पक्ष-संघटना-नेते-लोकसमूह यांना “एकाच मापात” मोजण्याची ही वृत्ती-दृष्टिकोण “ब्राह्म-क्षत्रिय वर्चस्ववादी” आहे हे सर्व साम्यवादी-समाजवादी भुमिका-नेत्यांविषयी आदर ठेवून; माफी मागून प्रथमच नमूद करत आहे.
समितीच्या आंदोलनातून गायरान-पडीत जमीन नावावर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागला. यातूनच १९९० चा “जिआर” काढण्यात आला. सुमारे दहा लाख समुदायांच्या या यशानंतर यातील जनता दल, शोजआं., भाकप (माले.), श्रमुद सोडून आणि डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील कामगार आघाडी मिळून “बहुजन श्रमिक समिती” ही राजकीय आघाडी स्थापन करण्यात आली होती.
दरम्यानच्या महत्वाच्या घडामोडी
एक: ६ डिसेंबर, १९९२ : मंडल विरोधात ब्राह्मणी चाल म्हणून ओबिसी-बहुजन तरुणांची डोकी भडकवून बाबरी मस्जिद संघ परिवाराने उध्वस्त केली.
दोन : या हिंसक, विद्वेषी कृती विरोधात मा. विश्वनाथ प्रातपसिंह उघडपणे बोलले. किंबहुना त्यांनी राज्यात मंडल निमीत्ताने मोठा दौराही केला.
तीन: या दौ-यामध्ये जद नेत्या मृणालताई गोरे व भारिप नेते बाळासाहेब आंबेडकर सहभागी झाले होते. पण शोकांतिका म्हणजे महाराष्ट्रातील ज.द. यानिमीत्त संपर्कात आलेल्या ओबिसी तरुण-जनता व वातावरणाचा फायदा घेवू शकली नाही. अनेक कारणांपैकी एक कारण होते; त्या पक्षावर शहरी, ब्राह्मण पुरोगामी नेत्यांचे असलेला प्रभाव आणि त्यानंतर मराठा घराण्यांकडे गेलेले नेतृत्व.
चार: १५ फेब्रुवारी, १९९३ : मात्र दूर दृष्टी असलेल्या, फुले-आंबेडकरी सामाजिक-राजकीय चळवळीचा परिघ व्यापक करण्याची त्यांची महत्वाकांक्षा व भुमिका. त्यामुळे त्यांनी व्हि.पी.सिंग यांच्या या वातावरणाचा पुरेपूर फायदा घेण्याचे ठरविले. याची चुणूक लागली होती म्हणून म्हणा; तत्पूर्वी व्हि.पी. सिंग पंतप्रधान असताना त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना १८ सप्टेंबर, १९९० ते १७ सप्टेंबर, १९९६ या कालखंडात राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले होते.
पांच : १५ फेब्रुवारी, १९९३ ला के.सी. कॉलेज, मुंबई येथे तत्कालीन भारिपचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ’बहुजन महासंघ’ स्थापन झाला. या प्रक्रियेत आम्ही सारे ओबिसी कार्यकर्ते सहभागी झालो. (युक्रांदमधील मी व अन्य सहकारी बाळासाहेबांसोबत जावू नये हे पुण्याहून खास येवून रात्रभर आम्हा सा-यांना समजावून देण्याचा एक प्रयत्न झाला. सारे काही जुळते! अर्थ लागतो.) बहुज महासंघ स्थापन होताच बाळासाहेबांनी खास मोहीम काढून मराठवाड्यातील नामांतर विरोधातील ओबिसी तरुणांशी थेट संवाद सुरु केला. त्यांना बहुजन महासंघाच्या प्रक्रियेत आणायला सुरुवात केली.
सहा : १३ मार्च, १९९५ रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल लागले होते. त्या आधी या समितीमध्ये जनता दलाने सहभागी व्हावे असे प्रयत्न सुरू झाले होते. पण यश काही येत नव्हते.
सात : त्यावेळी बाळासाहेब यांनी जद.ला या समितीमध्ये सहभागी व्हावे यासाठी थेट मा. व्हि,पी.सिंग यांना साकडे घातले. व्हि.पी.सिंग मुंबईत आले की, त्यांचे सहकारी लोलायका यांच्या घरी मुक्काम करत. या बोलणी दरम्यान ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना घरी बोलावले. नेहमी सकाळी नास्ता सोबत घेण्याचा त्यांचा आग्रहच असायचा.
ज.द.सोबतच्या आघाडी प्रश्नावर सुरुवातीला एका बैठकीला भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते आदरणीय लंकेश्वर गुरुजी (अकोला) आणि मला महासचिव महासंघ म्हणून सोबत घेवून गेले. आणि व्हि,पी.यांची ओळख करून दिली. त्या दिवशी व्हि.पी.सिंग यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून सारी हकीकत ऐकून घेतली. जवळ जवळ दोन-अडीच तास चाललेल्या या चर्चेतून दोन बाबी स्पष्टपणे दिसून आल्या.
१. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निवेदनात जद.चे तत्कालीन अध्यक्ष वा अन्य नेते यांच्याविषयी चुकूनही एकही अवाक्षर बोलले नाहीत. त्यांच्या निवेदनातूनच एकच गोष्ट स्पष्टपणे पुढे येत होती; जर जद.”ब.श्र. समिती” मध्ये सामिल झाली; तर येत्या १९९५ च्या विधानसभा निवडणूकीत आपण सत्तेवर येवू. कारण सत्ताधिश कॉंग्रेसला गर्व झालाय; की, त्यांना महाराष्ट्रात कुणिही हरवू शकत नाही. त्यावेळी ते त्यांच्यासोबतच्या औरंगाबाद, सोलापूर, आदी जिल्ह्यांत सभांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाचेही उदाहरण देत होते. या माहोलचा फायदा ज.द.ने घेतला पाहिजे असे बाळासाहेबांना मनापासून वाटत होते.
२. हे सारे ऐकल्यावर मा. व्हि.पी.सिंग म्हणाले होते, “—ऐसी स्थितीमें हमारी पार्टी इसमें जरूर शामिल होनी चाहिए. और अभितक आपके साथ क्यों नहीं आयी यह मेरी समझमें नहीं आती.” त्यावेळी बाळासाहेब आणि व्हि.पी.सिंग यांच्यातील एका वेगळ्या भावनिक व विश्वास, संवादाचा सुखद अनुभव मी घेत होतो. वरील फोटोतील सभा होईपर्यंत बाळासाहेब सतत मला व्हि.पीं.सोबतच्या बैठकांना घेवून जात असत. याचे मुख्य कारण मला असे वाटते की, पदाबरोबर बाळासाहेबांनीच राज्यसभेत मिळालेल्या व मला दिलेल्या ’लॅपटोप’ वर मी जमा करून तुलत्मकदृष्ट्या केलेले भारिपचे मतांचे विश्लेषण.
हे सारे व्हि.पी.सिंग यांनी पाहिले होते. जिथे “१९८४ नंतरच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी कॉंग्रेस व समिती, ज.द.पेक्षा अधिक असलेल्या मतांच्याच जागा भारिप ब,म.ला द्याव्यात” असा आमचा आग्रह होता. त्याचबरोबर ज्या जागा कुणिही लढवायला तयार नाही; त्या जागा महसंघ लढवू इच्छितो.
व्हि.पी.च्याच सांगण्यानुसार एक प्रमुख (मराठा घराणे) पदाधिकारी सोडून मा. मृणालताई व अन्य पदाधिकारी आघाडीला तयार आहेत. व्हि.पी. यांनी वारंवार निरोप देवूनही ते काही बाळासाहेब, व्हि,पी. यांच्यासोबतच्या समोरासमोर बैठकील कधीच आले नाहीत. मात्र मृणालताई बैठकीला नेहमी असत. त्यांचीही व्हि.पीं.सारखीच भुमिका होती. पण गाडी काही पुढे जात नव्हती.
अखेर महासंघाच्या राजकीय व्यवहार समितीच्या निर्णयानुसार बाळासाहेबांनी जद. बाबत विधानसभेच्या कोणत्याही जागा सोडण्याच्या अधिकाराचे लेखी पत्रच व्हि.पी.सिंग यांनाच सादर केले. ते वाचून व्हि.पी. म्हणाले, “—-अरे ये क्या कर रहे हो? आपको पार्टी चलानी है ना? मेरी पार्टी मुझे मान नहीं रही. और आप मुझे पुरा अधिकार दे रहे हो. वो भी एक शर्त पर. किसीभी हालतमें जद समितीके साथ आना चाहिए.” ते पुढे म्हणाले, ”आप कहते हो; सभी एक साथ आएंगे; तो यहा कॉंग्रेस जाकर आप सभीकी सरकार आ सकती है. मुझे भी ऐसा लग रहा है.”
त्यावेळी व्हि.पी.खुप अस्वस्थ, हतबल झालेले दिसले. काही क्षण थांबून ते बाळासाहेबांना निर्धारपूर्वक बोलले,”चलो प्रकाशजी. मैं आपकी “बंबईकी सभामें” जरुर आऊंगा.”
आठ : ब.श्र.स.-बसपा-सपा आयोजित “बहुजन श्रमिक महापंचायत” आणि व्हि.पी.सिंग
बहुजन श्रमिक समिती-बसपा-सपा आयोजित फोटोतील “बहुजन श्रमिक महापंचायत”, शिवाजी पार्क, मुंबई ची घोषणा झाली. दरम्यान जद नेते आणि माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी जदता दलाची प्राथमिक सदस्यत्वाचा राजिनामा दिल्याच्या बातम्याही देशभर आल्या होत्या. त्यांनी तब्बेतीचे कारण दिले होते. मात्र ते सार्वजनिक जीवनातून निवृत्त होणार नाही हे ही प्रेसला आवर्जून सांगितले होते. त्याचबरोबर “प्रकाशजी आंबेडकरजीके सभामें मैं हाजिर रहूंगा हेही सांगितले.” जद “ब,श्र.स.” त नाही आणि व्हि,पी. मात्र सभेला उपस्थित रहाणार म्हणून महापंचायतची जोरदार चर्चा सुरू झाली.
नऊ: यानंतर महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडींना राष्ट्रीय पातळीवर महत्व आले. त्यात भर पडली “बहुजन समाज पक्ष (बसप)” चे नेते मा. कांशीराम यांनी बाळासाहेबांसोबत घेतलेल्या भेटीने. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशमध्ये “समाजवादी पक्ष (सप.)” बसप सोबत असल्याने त्याच्यासह बसप या समितीमध्ये सहभागी होत आहोत अशी भूमिका घेतली. समितीनेही याचे स्वागत केले. “एक नेते” सोडून जमीन हक्काच्या यशस्वी चळवळीतील सर्व पक्ष-संघटनांचा यावरील विश्वास वाढला होता की, महाराष्ट्रात सर्वजण एकत्र आले तर किमान एक प्रभावी राजकीय शक्ती उभी राहू शकते.
त्यामुळे सभेला खुपच राजकीय महत्व आले होते. इकडे बाळासाहेब व आम्ही सारे पदाधिकारी राज्यभर सभेच्या तयारीला सर्वत्र सभांचा धडाका लवला होत.
अखेर “ऐतिहासिक महापंचायत” झालीच आणि पुढचे उधाण!
अखेर बहुचर्चित वरील फोटोतील “महापंचायत” सुरू झाली. व्हि.पी.सिंग यांचा आजार वाढत चालला होता. विचारपीठावरून त्यांना वारंवार उतरून “बाथरुम” ला जावे लागत होते. त्याही अवस्थेत त्यांची उपस्थिती खुप काही सांगून गेली. या सभेसाठी समितीमधील सर्व नेत्यांबरोबर डॉं. दत्ता सामंत (कामगार आघाडी), बाळासाहेब आंबेडकर, मा. व्हि.पी.सिंग, मा. कांशीरामजी (बसप-सप युती नेते), भा.ब.म.संघाचे मार्गदर्शक-नेते मा. निळूभाऊ फुले उपस्थित होते.
–
कोणताही फोटो घेतला तर त्यामागे दडलेला जिवंत, रसरसीत, स्फुर्तिदायक इतिहास असतो. या निमीत्ताने लिहीला तर त्याचे कुणिही कसेही विश्लेषण-चिकीत्सा करो; त्यामुळे आपली सच्ची, फुले-आंबेडकरी, लोकशाहीवादी चळवळ पुढेच जाणार आहे हा विश्वास बाळगला पाहिजे. पक्ष-संघटना व चळवळीतील कार्यकर्ता राब राबत असताना आपण काय केले; कसे, कुठे; कोणासोबत, कशासाठी, कोणत्या उद्दीष्टाने केले हे लिहून ठेवलेच पाहिजे. इतिहासात अशा दैनंदिनींना खुप महत्व आहे.
कारण ब्राह्मणी, संघीय इतिहासकार-अभ्यासक खोट्या, विपर्यस्त, विकृत विचार, इतिहास पसरविण्यात तरबेज आहेत. वाईट भाग म्हणजे या मनुस्मृतिसमर्थकवृत्तींविरुध्द प्रभावी मोहीम उघडण्यापेक्षा “तथाकथित धर्मनिरपेक्ष-कॉंग्रेसी पक्ष” धार्जिण्यावृत्तीने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. हे काही आताच २०१९ च्या वंचित बहुजन आघाडीच्या कालखंडातील नाही. तर बाळासाहेबांनी सार्वजनिक जीवनात ३५-३६ वर्षांपूर्वी पाऊल टाकले; जेव्हा त्यांची साधी ओळख महाराष्ट्राला नव्हती; त्या दिवसापासून आता २०२१ पर्यंत एखाद-दुसरा अपवाद सोडल्यास सारे पुरोगामी विचारवंत-अभ्यासक (?) निवडणूक आयोगाची आंकडेवारी सोयिने घेवून वाटेल तशी खोटी, विकृत, ब्राह्मणी मानसिकतेमधून टिका (चिकीत्सा तर नाहीच!), खाजगीत कुजबूज करत आहेत ही शोकांतिका आहे.
फुले-आंबेडकरी बहुजनवादी म्हणून विधायक चिकीत्सा-टिका (critique), दिशा दिग्दर्शनचे नक्कीच स्वागत आहे. त्यातूनच लोकशाही अधिक सजग, समृध्द होत जाईल हा आमचा विश्वास आहे.
पण डो. बाबासाहेब शेवटी म्हणाले त्याप्रमाणे, राजकीय समतेबरोबर (आता सरपंच पदाच्या लिलावातून तेही धोक्यात आले आहे!) सामाजिक, आर्थिक लोकशाही-समता आली तरच अर्थ आहे. यावर सर्वच सत्ताधा-यांना रोखठोक सवाल विचारायचे की नाही? आजवर मनुस्मृतीने “सवाल” विचारायचे नाही असेच स्त्रि-शुद्रादीशूद्रांना सांगितलेच आहे. तसेच “मूक” रहाणे आम्हाला कदापिही मान्य होणार नाही.म्हणून सर्व सहका-यांना विनंती की, हा आपल्या फुले-आंबेडकरी वंचित बहुजन चळवळीचा स्फुर्तिदायक, अस्सल इतिहास आहे. तो आपणच लिहीला पाहिजे. कागदपत्रांबरोबर असे फोटो आणि त्याबरहुकूम अनुभव घेतलेले सहकारी-माणसंही महत्वाची आहेत.
शांताराम पंदेरे
Email: shantarampc2020@gmail.com