सावरकरांच्या मुद्दयाला धरून राजकारण तापविण्यात भाजप आणि संघ नेहमी यशस्वी होतो. त्यांना गरज असते ती वेगवेगळ्या पक्षांचे नेतेमंडळी कडून सावरकराना प्रश्नांकित करणा-या वक्तव्याची. त्या आड मग मोठा इश्यू दडविण्यात भाजपावाले माहीर आहेत. तात्यांना ‘कव्हर करायला, भाजपची मंडळी इतिहासात न घडलेल्या घटना देखील घडल्याचे भासवून नामानिराळे होतात. आता त्यांनी निम्मित्त घेतले आहे ते राहुल गांधी ह्यांचे “माफी मांगने के लिये मैं सावरकर नही गांधी हुं” विधानाचे. विशेष म्हणजे त्याला ‘गांधी विरुद्ध सावरकर’ असा ५७ वर्षे शिळ्या कढीला उत आणण्यासाठी हे स्रुरू आहे. विशेष म्हणजे सावरकर यांच्याबाबतीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ५, २२ आणि २३ मार्च २०१६ रोजी केलेले ट्वीटमुळेही गदारोळ झाला होता. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल ‘ट्रेटर’ म्हणजेच गद्दार असा शब्द वापरला होता.त्यावेळी सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रारही नोंदवली होती.
आता पुन्हा माफी मागायला मी सावरकर नव्हे तर गांधी आहे, ह्यावर गदारोळ सुरु केला आहे.राहुल गांधी ह्यांचे विधानावर उद्धव ठाकरे ह्यांनी जाहीर सभेत आक्षेप घेतला. मालेगावातील सभेतून सावरकर आमचे दैवत आहेत आणि त्यांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका ठाकरेंनी घेतली होती.तर ‘सावरकर माफी मागून परत आल्यानंतर त्यांनी देशात हिंदू मुस्लीम विवाद उभा केला. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, देशाच्या फाळणीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी देशात विषाक्त वातावरण निर्माण केले त्यातूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली. असे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनीच म्हटलेले आहे. सावरकर मुदद्यावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत आहेत परंतु त्यात त्यांना यश येणार नाही, आम्ही एकत्रच आहोत’ असा खुलासा नाना पटोले ह्यांनी केला असून थोरल्या पवारांनी मध्यस्थी करीत या पुढे ‘नो सावरकर’ असा कॉंग्रेसजनांचा कान पकडून राहुल गांधीना तलवार म्यान करायला लावली, असा राष्ट्रवादी सूर आहे. तर महाराष्ट्रात जोडे मारो आंदोलन करीत राज्य सरकारच यात्रेवर निघणार असल्याची (लोककल्याणकरी) घोषणा शिंदे–फडणवीसांनी केली आहे. शिंदे-फडणवीस ह्यांनी सरकारी ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्याचे जाहीर केले आहे.
खरेतर भाजप आणि संघाच्या प्रात: स्मरणीय आणि वंद्नियाचे यादीत सावरकर सोयीचे नाहीत. कारण गायीला देव मानून त्याचा अतिरेक केला जातो याबद्दलही सावरकरांनी स्पष्ट विचार मांडले आहेत. गायीत देव आहेत असं पोथ्या सांगतात. आपल्याकडे वराहवतारी देव डुक्कर झाले होते, असंही पोथ्या सांगतात. मग गोरक्षण का करावे? डुक्कर-रक्षण संघ स्थापून डुक्कर पूजा का करु नये? अशी रोखठोक भूमिका ते घेतात. ज्याअर्थी गोरक्षण, गोपूजा, गोभक्ती या कल्पनाच मुळी मायासृष्टीतल्या आहेत तर त्या स्वीकारणं आणि नाकाराणं हे सुद्धा व्यावहारिक, प्रापंचिक आणि तुलनात्मक विवेकानं होऊ शकतात असं सावरकर म्हणतात. गाढवाने त्याच्याहून श्रेष्ठ असलेल्या गाईस देव मानावे, पण मनुष्याने तसे करण्याचा गाढवपण करु नये, असं ते स्पष्ट करतात.
सावरकरानी ज्याचा उल्लेख ‘गाढवपणा’ असा केला तोच किंवा त्यापुढे जावून ‘गाढवपणा’ भाजपचे गौरक्षक करीत असल्याने सावरकर सोयीचे ठरत नाहीत. परंतु सरदार पटेलांनी संघावर बंदी आणली होती त्याच सरदार पटेल ह्यांचा जगप्रसिद्ध पुतळा उभा करणारी आताची भाजप आणि संघ किती संधिसाधू आहे, ह्याची धडधडीत साक्ष नर्मदेच्या काठी भाजपनेच दिमाखात उभी केली आहे. सबब सोयीचे घेणे आणि त्यावर राडा घालणे हा भाजपचा रोकडा धर्म.
असो. सावरकरांवर त्यांचे विरोधकांचे मुख्य आक्षेप आणि आरोप आहेत ते म्हणजे इंग्रजांना माफीनामा प्रकरण, गांधी हत्या प्रकरण. सुमारे ११ दयापत्रे सावरकरांनी इंग्रज सरकारला पाठविली होती असे विरोधक सांगतात. यातील पहिले डोंगरीच्या तुरुंगात असतानाच लिहीले. अंदमानातील पहिले ३० आùगस्ट १९११ चे असून शेवटचे ६ एप्रिल १९२० चे आहे. त्यानंतरची दोन रत्नागिरीच्या तुरुंगातील आहेत. अशी दयापत्रे पाठविण्याचा अधिकार जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या कैद्यांना असतो अन् सर्वचजण तो घेतात. ही दयापत्रे ठराविक नमून्यातच (Prescribed Format) पाठवावी लागतात. ही सर्व पत्रे समग्र सावरकर साहित्याच्या दूस-या भागात प्रसिध्द झालेली आहेत. शिवाय सावरकरांनी लिहीलेल्या माझी जन्मठेप या विख्यात पुस्तकात या दयापत्रांचे तपशीलवार वर्णन आहे. याचाच अर्थ ही दयापत्रे सावरकरांनीच सार्वजनिक केली होती.
सावरकरांच्या पहिले दयापत्र लिहीले त्याला इंग्रज सरकारने उत्तर देताना एप्रिल १९११ मध्ये असे कळवले होते की, ‘पहिल्या जन्मठेपेची २५ वर्षे तर आधी संपू द्या त्यानंतर पुढचा विचार करु.’ १९१३ साली पाठविलेल्या याचिकेत सावरकरांनी म्हटले होते कि, ‘ माझ्या राष्ट्रास विधायक प्रगती करण्याची संधी दिली तर मीच काय माझे क्रांतिकारक सहकारी सुध्दा शांततेच्या मार्गाने जाण्यास तयार होतील.’ ही याचिका झळकावत विरोधक सावरकरांनी सपेशल शरणागती घेतली होतीचा दावा केला जातो. तत्कालीन गृहमंत्री सर क्रेकार्ड ह्यांच्या सूचनेवरुन सावरकरांनी ही याचिका लिहिली होती असा दावा केला जातो. १९१४ साली म्हणजे दूस-या महायुध्दाच्या काळात पाठविलेल्या दीर्घ पत्रात सावरकर मागणी करतात की ‘भारताला औपनिवेशक स्वायत्तत्ता प्रदान करावी, त्यात हिंदी लोकांचे बहुमत असावे या बदल्यात भारतीय क्रांतीकारक ब्रिटिशांना दूस-या महायुध्दात सहकार्य करतील.’ ५ ऑक्टोबर १९१७,दि ४ ऑगस्ट १९१८ आणि १९२० साली सावरकरांनी तीन दयापत्रे इंगज सरकारला पाठवली होती.(येथे हे स्पष्ट करणे गरजेचे की सावरकरानी जसे आवेदन धाडले. तसेच इतरांनी धाडावे नि आपापली सुटका करुन घ्यावी म्हणून सावरकर इतरांना समादेश देत असत.असे डॉ. नीरज देव ह्यांनी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी दैनिक लोकसत्ता मध्ये लिहिलेल्या लेखात नमूद केले आहे. ह्याच लेखात लेखकाने खुद्द इंग्लडमध्ये सावरकरांच्या समर्थनार्थ अन् ती ही गाय आल्ड्रेड सारख्या ब्रिटिशाच्या नेतृत्वात चळवळ उभी राहिली होती असे नमूद केले आहे.) विशेष म्हणजे अशी शिक्षा भोगणा-या कित्येकांना शिक्षा झाली होती मात्र त्यांनी त्यावर दाद मागितली नाही, दयापत्र तर अजिबात पाठवले नाही.
तर ‘ओह माय गोडसे’ या गांधीहत्येवर आधारित कादंबरीचे लेखक विनायक होगाडे १३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळ मध्ये ब्लॉग लिहितांना नमूद करतात की, हिंदुत्वाची मांडणी करणारे विनायक दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्याच सूचनेवरून अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय. सर्वप्रथम राजनाथ सिंह यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांनी आजवरच्या एका मोठ्या चर्चेला पूर्णविराम दिलाय. आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदूत्ववादी विचारांची मंडळी सावरकरांनी इंग्रजांची माफी मागून सुटका करवून घेतलीय, हेच मान्य करायला तयार नव्हते. अथवा जे मान्य करायचे तेही खासगीत! आता राजनाथ सिंह यांनी इतक्या उघड उघड ही ऐतिहासिक बाब मान्य केलीय, तर त्यांचं अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे. बरं हे विधान करताना तिथे सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते. त्यांनी देखील यावर हरकत घेतलेली दिसून आली नाही.
पुढे सावरकरांचे माफीनामे म्हणून विनायक होगाडे ह्यांनी पुढील तपशील दिला आहे.
१. ४ जुलै १९११ रोजी तात्याराव सावरकरांना पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये डांबण्यात आलं. सहा महिन्यात त्यांनी माफीनामा लिहून दिला.
२. दुसरं माफीचं पत्र सावरकरांनी १४ नोव्हेंबर १९१३ रोजी लिहीलं. त्यात त्यांनी म्हटलं आहे… “I am ready to serve the Government in any capacity they like… .
३. मार्च २२, १९२० रोजी सावरकरांच्या समर्थकांनी कायदेमंडळात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, सरकारतर्फे अशी माहिती देण्यात आली की सावरकरांकडून दोन माफीनामे सरकारला प्राप्त झाले आहेत. १९१४ आणि १९१७ साली. त्याचा तपशीलही पटलावर ठेवण्यात आला.
४. १९३० साली लिहीलेत्या माफीनाम्यात सावरकर म्हणतात— “I and my brother are perfectly willing to give a pledge of not participating in politics for a definite and reasonable period that the Government would indicate…
५. गांधी हत्या प्रकरणी अटक झाल्यावर सावरकरांनी फेब्रुवारी २२, १९४८ रोजी मुंबई पोलीस आयुक्तांना माफीनामा लिहून दिला. त्यात ते म्हणतात– “I shall refrain from taking part in any communal or political public activity for any period the Government may require.”
६. १३ जुलै १९५० रोजी, मुंबई हायकोर्टाला दिलेल्या पत्रात सावरकर लिहीतात– “… would not take any part whatever in political activity and would remain in my house in Bombay” for a year. हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा त्यांनी दिला.
सावरकरांनी पहिला माफीनामा लिहलाय तो २९ ऑगस्ट १९११ रोजी… मोहनदास करमचंद गांधी हा माणूस दक्षिण अफ्रिकेतील आपला लढा संपवून भारतात कायमस्वरुपी परतला तो १९१५ साली! यावेळी गांधी हे फक्त ‘मोहनदास’ होते आणि ते अजून ‘महात्मा गांधी’ व्हायचे होते. त्यामुळे १९११ साली गांधींनी त्यांना तुम्ही माफीनामे लिहून स्वत:ची सुटका करवून घ्या असं म्हणणं संभवत नाही. त्यामुळे राजनाथ सिंहाचा दावा किती पोकळ आहे, हे सहजपणे लक्षात यावं, असे लेखक लिहितात.
प्रश्न आहे तो म्हणजे खरेच गांधींच्या सांगण्यावरुन सावरकरांचा माफीनामा लिहिला होता का ? तर त्याची वस्तुस्थिती तपासुया. सावरकर यांनी अंदमानच्या सेल्यूलर कारागृहात असताना ब्रिटीश सरकारसमोर माफीनामा महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन दाखल केला होता, असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १२ ऑक्टोबर २०२१ रोजी उदय माहूरकर आणि चिरायू पंडीत यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर : द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात केलं होतं. त्यावरुन प्रचंड राजकारण तापल्यावर असा कोणताही उल्लेख माझ्या पुस्तकात नाही, असं पुस्तकाचे लेखक उदय माहूरकर यांनीच जाहीर केले होते. अर्थात हि राजनाथसिंह ह्यांची लोणकढी थाप होती, हे स्पष्ट होते.
त्याच ब्लॉग मध्ये होगाडे ह्यांनी गांधी हत्या प्रकरण घेतले आहे. गांधीहत्येतले प्रमुख आरोपी सावरकर ह्या उपशीर्षकाखाली लिहितांना होगाडे म्हणतात, गांधीहत्येचे १९३४ पासून अनेक प्रयत्न झालेत ज्यात गोडसे-आपटे टोळी कार्यरत होती. बाकी फाळणी, ५५ कोटी, मुस्लीम अनुनय ही सारी फसवी आणि आपले गांधीहत्येच्या कृत्याला सहानुभूती मिळावी म्हणून पुढे केली गेलेली खोटारडी कारणे आहेत, हे इतिहासाचा डोळे उघडून अभ्यास करणारा कुणीही व्यक्ती सांगू शकेल. गांधीहत्या हे कृत्य आपण एकट्यानेच पार पाडल्याचे नथुरामने न्यायालयातील आपल्या वक्तव्यात किती जरी ठासून सांगितल असलं तरी ते वास्तव नाहीच. ही खुनी टोळी होती. या कटातील आरोपी होते नारायण आपटे, मदनलाल पहावा, गोपाळ गोडसे, विष्णू करकरे, दिगंबर बडगे, दत्तात्रय परचुरे, शंकर किस्तय्या आणि विनायक सावरकर. नथुराम इतकाच महत्वाचा व्यक्ती आहे नारायण आपटे. नारायणचे चंपूताई फडतरेशी लग्न झालेले असूनही मनोरमा साळवी नावाच्या ख्रिश्चन मुलीशी विवाहबाह्य संबंध होते. स्त्रिया, दारू, सिगारेट, मांसाहार आणि इतर भौतिक सुखाचे त्याला आकर्षण होते. गांधीहत्या हा खटला पोलिसांच्या शोधकार्यावर नव्हे तर दिगंबर बडगे या आरोपीच्या माफीचा साक्षीदार बनल्यामुळे सुटला. ज्या ज्या गोष्टींना दुजोरा देणारा पुरावा मिळाला त्यानुसार न्यायालयाने निकाल दिला. सावरकर या खटल्यातून पुराव्याअभावी निर्दोष सुटले होते. या साऱ्या खुनी टोळीला वेळोवेळी मदत मिळाली आहे ती हिंदू महासभेच्या अनेक कार्यकर्त्याची आणि हितचिंतकांची. साऱ्या खुनी टोळीला सावरकर हे व्यक्तिमत्व निर्विवादपणे शिरसावज्ञ होतं. ते त्यांचे शिष्य होते, हे खुद्द सावरकरही नाकारू शकणार नाहीत. मदनलाल पहावा वगळता सारे आरोपी ब्राम्हण होते हे विशेष. सावरकर कटात सहभागी होते की नव्हते हा प्रश्न सातत्याने चघळला जातो. ते होते की नव्हते हा प्रश्न जरी मुद्दाम टाळला तरी ते हा खून रोखू शकत होते की नव्हते हा प्रश्न शिल्लक राहतोच.
असेच दावे सावरकर विरोधक करतात तर तात्या न्यायालयात निर्दोष झाल्याने हे कपोलकल्पित आहे असा दावा सावरकर समर्थक करत असतात.
वास्तविक पाहता आता सुरु असलेला गांधी सावरकर वाद हा ‘महात्मा गांधी विरुद्ध स्वातंत्र्यवीर सावरकर’ असा नाहीय असे महत्वाचे निरीक्षण अगदी आजच्याच लोकसत्ताचे संपादकीय मध्ये आहे. राहुल गांधी हे पारशी फिरोज गांधी ह्यांचे वंशज असून महात्मा गांधी हे गुजराती होते, अश्या पद्धतीने लोकसत्ताने बायोलोजिकल मुद्दावर कॉंग्रेसच्या पंच्याला हात घातला असून जानवे दिसे पर्यंत घालून प्रदक्षिणा घालणारे राहुल गांधी दुटप्पी असल्याचा आरोप संपादकीय मध्ये आहे. खरे तर देश आणि महाराष्ट्रात अनेक समस्या आ वासून उभ्या असताना सामान्य नागरिकांना ह्या नव्या गांधी सावरकर वादात काडीचाही रस नाही. मात्र ‘अदानी’ प्रकरणाची धग मोदी पर्यंत जात असल्याने भाजप आणि संघाने ठरवून सावरकर अवमान प्रकरण लावून धरले आहे. भाजपवाल्याना सावरकर ह्यांचा इतकाच पुळका असता तर ते राहुल गांधी विरुद्ध पोलीस कार्यवाही करू शकले असते. मात्र त्यानी ‘सावरकर गौरव यात्रा’ या गोंडस नावाखाली अदानीचे पाप झाकण्याची नौटंकी सुरु केली आहे. अवकाळी आणि गारपीट, मंत्रालयाचा दारात होणा-या आत्महत्या, सरकारी कर्मचारी, महिला, तरुण, शेतकरी कष्टकरी, विद्यार्थी हवालदिल असतानाच शिंदे फडणवीसांची ‘गौरव यात्रा’ म्हणजे राज्यकर्ते किती उलट्या काळजाचे आहेत ह्याची खात्री पटविणारे आहे. अदानीच्या इश्यू वरून लक्ष विचलित करण्याकामी पुढे झालेले राज्यसरकार आपल्या अपयशी आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकालाने कधीही घरी जावे लागू शकते हे गृहीत धरून ’महाराष्ट्र गतिमान’च्या खोट्या जाहिरातींचा भडीमार करीत आहे. एक मात्र निश्चित की संपूर्ण देशाच्या लक्षात आले आहे की, सावरकर तो बहाना है, असल खेल अदानी को बचाना है.
राजेंद्र पातोडे
अकोला
९४२२१६०१०१