भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातील शोषित पीडित माणसांच्या जीवनात ’प्रकाश’ आणला आहे, हे कुणालाही नाकारता येत नाही.त्याच महामानवाच्या नातवाच्या आणि आंबेडकर कुटुंबाच्या शोधात तमिळनाडू राज्यातील विल्लुपुरम जिल्ह्यातील एक युवक तीस वर्ष पेक्षा अधिक काळ जीव पाखडत असल्याची अविश्वनीय बाब मला २०१४ साली कळली.लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अचानक आलेल्या एका आंतरराष्ट्रीय कॉल मुळे, त्या युवकाचे नाव आहे रामाणन नागमणी.पेशाने इंजिनियर असलेला आणि सध्या आखाती देशात कुवेत मध्ये कार्यरत असलेल्या रामाणन चे संपूर्ण कुटुंब आंबेडकरमय आहे.त्याचे वडील एम.जी.नागमणी हे भारिप बहुजन महासंघ ( RPI BBM) प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत होते.परंतु, ज्यांच्या नावावर ते तमिळनाडू मध्ये सामाजिक राजकीय काम करतात त्या बाबासाहेबांच्या नातवा्ची अर्थात अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि नागमणी कुटुंबाची १९८८ साला नंतर कधीच भेट झाली नव्हती. मात्र, १९८७ पासून एम जी नागमणी आणि त्यांचे सहकारी बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन आंबेडकरी चळवळीचे काम करीत होते.
ह्या अविश्वनीय घटनाक्रमाची सुरुवात झाली ती १९८७ साली. तमिळनाडू मधील निवडणुकी संदर्भात अॅड. बाळासाहेब आंबेड्कर यांनी तमिळनाडू लाभेट दिली होती.त्या वेळी शेड्युल कास्ट फ़ेडरेशन पासून कार्यरत जी. मुर्ती नावाचे आंबेडकरी नेते आणि एम.जी. नागमणी हे रिपाई फ़ुटी नंतर काही काळ खोब्रागडे गटाशी जुळले होते.मात्र, बाबासाहेबांचे नातू प्रत्यक्ष राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आहेत ह्याची माहिती होताच १९८७ मध्ये जी. मुर्ती आणि एम.जी. नागमणी यांनी भारिप मध्ये प्रवेश घेतला.
१९८८ साली बाळासाहेब परत निवडणुकी मध्ये तमिळनाडू ला गेले असता पहिल्यांदा २ वर्षाच्या रामाणनह्याने बाळासाहेबांना पाहिले होते. हातात निळा ध्वज घेतलेला रामाणन बाबासाहेबांचा नातू आला म्हणून प्रचंड आनंद उत्साहात असलेल्या विल्लुपुरम जिल्ह्यात साहेबांचे स्वागत झाले त्यावेळी सहभागी झाला होता.नेमकं काय चाललेय हे त्याला उमगत नसले, तरी भिम जयंती प्रमाणे काहीतरी उत्सव आहे एवढेच त्याला कळत होते.त्या दरम्यान एम जी नागमणी ह्यांना दुसरा मुलगा झाला होता. त्या लहान मुलाचा अर्थात रामाणन च्या लहान भावाचे नामकरण बाळासाहेबांच्या हजेरीत झाले. बाळासाहेबांनीच रामाणन च्या लहान भावाचे नाव अशोक असे ठेवले होते.निवडणूक प्रचारा साठी आलेल्या बाळासाहेबांना स्वत:चे हाताने चपाती आणि चना दाळ तयार करून खाऊ घालणारी रामाणन ची आई एन. सुब्बमनल यांना तर प्रत्यक्ष बाबासाहेब त्यांच्या घरी आल्याचा आनंद होता.
त्या नंतर बाळासाहेब आणि तमिळनाडूतील कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष संपर्कच आला नाही, तरी देखील तमिळनाडू मध्ये भारिप हा बाळासाहेबांच्या नावावर कार्यरत राहीला.१९९५ साली जी. मुर्ती यांचे निधन झाले त्या वेळी बाळासाहेबांच्या RPI ची तमिळनाडू राज्याची धुरा डी. दामोदरन यांचे खांध्यावर देण्यात आली. रामाणन चे वडील राज्याचे जनरल सेक्रेटरी झाले .शिक्षणाचा अभाव, बाळासाहेबांना प्रथम नेणारे आमदार तमील अर्सन यांनी आंबेडकरी चळवळीशी तोडलेली नाळ, जी. मुर्ती यांचे निधन या मुळे बाळासाहेबां पर्यंत कधीच ही मंडळी पोहचू शकली नाही.मात्र , त्यांच्या नावावर कार्य करत राहिली.
वयाच्या तिस-या वर्षी बाळासाहेबांच्या स्वागतासाठी निळा झेंडा घेवून उभा असलेला रामाणन २००५ साली अभियंता म्हणून गुजरात ला एका कंपनीत नोकरीत लागला.ज्या महामानवाने आपल्या सकट संपूर्ण जगाचा उध्दार केला त्या महामानवाच्या कुटुंबाबाबत, बाळासाहेबाबाबत त्याने शोध
सु रू केला. अनेक समाजमाध्यमांवर तो शोधत राहीला. ते मुंबईत असतात हे समजले म्हणून त्याने हिंदी शिकायला सुरुवात केली. २०१० पर्यंत त्याला काही यश आले नाही.त्या नंतर तो राजीनामा देवून आखाती देशात गेला. त्या वेळी फ़ेसबुक च्या माध्यमातून तो शोध घेत राहीला: पण त्याला काही आंबेडकर कुटुंब सापडले नाही.
२०१३ साली त्याला माझा फ़ेसबुक प्रोफ़ाईल दिसला. त्यात माझे वाल वर बाळासाहेब आंबेडकरांचे फ़ोटो तो पाहत होता.माझे प्रोफ़ाईल आणि त्यावरील पोस्ट मराठीत असल्याने त्याला काही बोध होत नव्हता. त्याने मला फ़्रेंड रिक्वेस्ट दिली मी ती स्वीकारली आणि विसरून गेलो. तो मात्र सर्व फ़ोटो आणि कार्यक्रम सातत्याने पाहत होता.स्वत:चे कुटुंबाला शेयर करत होता.आपण बाळासाहेब आंबेडकरांबरोबर सातत्याने काम करत असलेल्या त्यांचे बॉडीगार्ड चे मित्र आहोत असा त्याचा समज होता.
२०१४ साली लोकसभा निवडणुकीत अचानक मला एक आंतरराष्ट्रीय कॉल आला.साउथ इंडीयन टच मध्ये हिंदी बोलणा-या त्या व्यक्ती ने “मी बाळासाहेबांचा बॉडीगार्ड आहे न अशी ..” सुरुवात केली.मी त्याला नाही म्हणून उत्तर दिले, मी बाळासाहेबांचा बॉडीगार्ड नसून भारिप बहुजन महासंघ युवक आघाडीचा अमरावती विभागाचा विभागीय युवक अध्यक्ष आहे, असे सांगितले. ही माहिती मिळताच त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.त्याने आंबेडकर कुटुंबाची संपूर्ण माहिती घेतली.त्याने मला १९८७ आणि १९८८ च्या बाळासाहेबांच्या तमिळनाडू भेटी पासूनचा इतिहास सांगत होता.त्याचे वडील आणि त्यांचे कार्यकर्ते आजही साहेबांच्या नेतृत्वात तिकडे काम करीत आहेत.
त्याचे काम खूप प्रभावी आहे असे भरभरून बोलत होता. हा रामाणन गेली तीस वर्ष बाळासाहेबांच्या शोधात आहे, हे ऐकून मी थक्क झालो. निवडणूक प्रचारा दरम्यान आम्ही वाशीम जिल्ह्यात जात असताना मग मी त्याला बाळासाहेबांशी आणि अंजलीताई आंबेडकरांशी ( त्याचे भाषेत अंजलीअम्मा शी ) बोलून दिले. त्याचे वडील आपल्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झालेत, ही बातमीदेखील त्याने बाळासाहेबांना दिली.आणि पुढील महिन्यात १८ तारखेला सर्व कुटुंबासमवेत पुण्याला भेटीला येण्याची वेळदेखील साहेबांनी नागमणी कुटुंबाला दिली आहे.”आमच्या जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी ही आंबेडकरी कुटुंबाची भेट असल्याचे गहीवरून रामाणन सांगत होता.”नियोजित केल्या प्रमाणे त्याचे कुटुंब थेट विमानाने पुण्यात दाखल झाले होते.
त्यांना ज्ञानेश्वर चव्हाण, म .ना. कांबळे सर, सचिन शिराळे, नवनीत अहिरे, प्रवीण भोटकर ह्यांनी १८ नोव्हेंबर २०१४ साली त्याचे आई – वडील, पत्नी आणि लहान मुलगा ह्यांना साहेबांच्या घरी नेण्यासाठी मदत केली.त्यांना अंजलीताई आंबेडकर ह्यांनी पाहुणचार दिला.संपूर्ण नागमणी परिवाराला आकाश ठेंगणे झाल्याचा आभास होत होता.त्यांनी खास तमिळनाडू वरून आणलेली शॉल साहेबांना भेट दिली.अंजलीताई साठी आणलेली साडी त्याचे आई आणि पत्नीनी ताईला दिली.बाबासाहेबांच्या नातवाच्या घरचा पाहुणचार घेऊन भरवलेल्या नागमणी कुटुंबाला मी मुंबईत बोलविले.त्यांना संपूर्ण राजगृह, तिथे राहणारे आंबेडकर कुटुंब, चैत्यभूमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, प्रिंटींग प्रेस सर्व दाखविले.राजगृहात भिमरावजी आंबेडकर साहेबानी त्यांना राजगृहा विषयी संपूर्ण माहिती दिली. आपल्या जीवनाचे ह्या तीन दिवसात सार्थक झाले, असे उदगार त्याचे आई वडिलांनी काढले.चैत्यभूमीवर आणि भैय्यासाहेबांचे स्मृती स्थळाला भेट देताना संपूर्ण नागमणी परिवार गहिवरला होता.
दुस-या दिवशी त्यांच्या कुटुंबाला मी सचिन शिराळे आणि शशी घायतडके ह्यांनी त्यांना दादर वरून तमिळनाडूला जाणा-या रेल्वेत बसवून दिले त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू ही कृतज्ञतेची आणि आंबेडकरी कुटुंबाच्या भेटीच्या ‘भरून पावलो’ ह्या भावनेची साक्ष देत होती.आज रामाणनचे वडील आपल्यात नाहीत मात्र आयुष्याचे शेवटच्या क्षणा पर्यंत ते तमिळनाडू मध्ये बाळासाहेबांचे शिपाई म्हणून कार्यरत होते.रामाणन देखील अधूनमधून कॉल करून पक्षाच्या कार्याची माहिती घेतो.साहेबांची बायपास झाल्याचे कळल्यावर तो प्रचंड दुःखी होता.”मी थोडा सेटल झालो की तमिळनाडूला परत येऊन पक्षाच्या आणि बाळासाहेबांच्या चळवळीच्या कामाला लागणार आहे”, असे तो आवर्जून सांगत असतो.
अगदी चित्रपटातील कथानक शोभेल असा हा रामाणन आणि त्याचे कुटुंब आणि तमिळनाडू च्या कार्यकर्त्यांच्या आंबेडकर निष्ठेचा हेवा वाटतो, केवळ एकदा भेट झालेल्या नेत्यावर गेली ३७ वर्षे तमिळनाडूचे कार्यकर्ते बाळासाहेबांच्या नावाने काम करतात ही ऊर्जा चळवळीत अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देते.
–राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी