पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक न घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी या घटनेचे जोरदार निषेध करण्यात येत आहे. या घटनेचे पडसाद पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उमटले असून, वंचित बहुजन आघाडी (VBA) विभाग दापोडीच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांचा जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला.
नेमकी घटना काय?
नाशिक येथील पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले नाही. हा प्रकार लक्षात येताच उपस्थित वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिथेच आक्षेप घेतला व “महामानवाचे नाव का वगळले?” असा थेट सवाल केला. पोलिसांनी या महिला कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढले आणि पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. ज्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ दापोडी येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गिरीश महाजन यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी “संविधान निर्मात्यांचा अवमान सहन केला जाणार नाही,” असा इशारा दिला.

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणूनबुजून वगळण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. हा प्रकार जनता कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे नागरिकांकडून गिरीश महाजन यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
या आंदोलनात चंद्रकांत गायकवाड (अध्यक्ष, VBA दापोडी), संजय कांबळे (उपाध्यक्ष, PCMC), अमित सुरवसे (महासचिव), बालाजी सूर्यवंशी (उपाध्यक्ष), ऍड. सुशांत बनसोडे, नितीन शिंदे, रवि कांबळे, भगवान शिंदे, इमाम शेख, बालाजी सोनकांबळे, कन्हैया सूर्यवंशी, विजय सोनकांबळे, अशोक पगारे, सुषमा शेलार व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






