औरंगाबाद – रमाई प्रकाशन प्रकाशित ‘‘भारतीय बौद्ध महासभा : कार्य व इतिहास’’ या ग्रंथाचे संपादन आणि प्रकाशन करून प्रा. भारत सिरसाट यांनी बौद्धांचा सांस्कृतिक वारसा पुढे आणला, असे गौरोद्गार पालि साहित्याचे गाढे अभ्यासक भन्ते डॉ. एम. सत्यपाल यांनी काढले.
ते सूर्यपूत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान आयोजित ‘‘भारतीय बौद्ध महासभा : कार्य व इतिहास‘‘ ग्रंथाच्या परिसंवाद कार्यक्रमातून बोलत होते. स्थानिक मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे (दि. १२ डिसेंबर रोजी) भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी डॉ. संजय मून हे होते. वक्ते म्हणून प्रसिद्ध समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अॅड. के. ई. हरिदास, सूर्यपूत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत सिरसाट आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना भन्ते सत्यपाल म्हणाले की, भारतीय बौद्ध महासभेची उद्दिष्ट्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १० कलमी कार्यक्रमातून दिली होती. त्यामध्ये बौद्ध साहित्य आणि संस्कृती प्रचार-प्रसार प्रकाशन संस्थांनी चालवावा, असे निर्देश त्यांनी दिले होते. या ग्रंथाच्या निमित्ताने ‘रमाई प्रकाशन’ने हा वारसा जोपासला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत सिरसाट यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या ग्रंथाचे प्रकाशन मुंबई येथे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते नुकतेच झाले असून, भारतीय बौद्ध महासभेच्या एकूण कार्यावर चर्चा व्हावी या हेतूने या परिसंवादाचे आयोजन केले आहे.डॉ. ऋषिकेश कांबळे म्हणाले की, त्याग आणि समर्पणाशिवाय चळवळ उभी राहत नाही. निष्ठा असल्याशिवाय चळवळीचा विचार व्यापक दृष्टीने पुढे नेता येत नाही. प्रा. सिरसाट यांनी संपादित केलेला ग्रंथ भय्यासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा ख-या अर्थाने गौरव करणारा आहे. हा ग्रंथ येणा-या पिढीला निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. डाॅ. संजय मून बोलताना म्हणाले की, भैय्यासाहेब आंबेडकरांकडे राजकीय नेतृत्व जावू नये म्हणून जाणीवपूर्वक तत्कालीन नेत्यांनी भारतीय बौद्ध महासभेची जबाबदारी त्यांच्यावर दिली. भैय्यासाहेब हे बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार होते. त्यांनी भारतीय बौद्ध महासभेला एका मोठ्या पातळीवर नेले. त्याचा संपूर्ण इतिहास या ग्रंथामध्ये शब्दबद्ध झाला आहे. अॅड. के. ई. हरिदास म्हणाले की, भैय्यासाहेब आंबेडकरांना मिशनरी पद्धतीने बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करावयाचा होता. त्या दृष्टीने भारतीय बौद्ध महासभेने कृती कार्यक्रम आखून त्या पद्धतीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी डोळसे यांनी केले, तर आभार अमरदीप वानखडे यांनी मानले. या प्रसंगी डाॅ. यशवंत खडसे, रतनकुमार साळवे, डाॅ. रेखा मेश्राम, दैवशिला गवंदे, ललीता खडसे, डाॅ. अविनाश अंकुशराव, व्ही. के. वाघ, सिद्धार्थ चौरपगार, देवानंद पवार, जितेंद्र भवरे, विलास पांडे, यशवंत भंडारे, मंगल मून, सुरेखा चौरपगार, अनुमती तिडके, शंकर मेश्राम, शाहीर उत्तमराव म्हस्के, एकनाथ पाखरे आदींसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.