बदल हा जगाचा नियम आहे, असे भगवान बुद्ध म्हणतात. जग बदलते.परिसर बदलतो. त्या बदलाचा माणसांवर, मानवी नातेसंबंधांवर परिणाम होत असतो. माणसाने प्रसवलेल्या सगळ्या व्यवस्था आणि वादांवर त्याचा परिणाम होत असतो किंबहुना हा बदल नव्या व्यवस्था आणि नवे वाद जन्माला घालत असतो. प्रत्येक कलाकृती हे त्या काळाच अपत्य असतं. त्या काळाच संचित असत. शब्द परळकर ऊर्फ अविनाश ऊषा वसंत यांची “पटेली” ही कादंबरी सद्य काळाच अपत्य आहे.
मुंबईच महानगरी जीवन या आधी अनेकांनी मांडले आहे. नामदेव ढसाळ, दया पवार, नारायण सुर्वे, भाऊ पाध्ये, मंटो, चंद्रकांत खोत, मधु मंगेश कर्णिक, जयंत पवार, तुळशी परब, अरूण काळे ते प्रकाश जाधव यांसारख्या दिग्गजांनी त्यांच्या साहित्यातून हे महानगरी जीवन रेखाटलं आहे. पटेली त्या पंरपरेत मोडणारी आणि भर घालणारी एक कडी आहे.
मुंबईकरांच्या भाषेत पटेली शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. पटेली म्हणजे जगाला फाट्यावर मारून जगणे तर कधी कधी पटेली म्हणजे बोलघेवडेपणा, अतिशहाणापणा. एखाद्याकडे सांगण्यासारख खूप काही आहे पण समोरच्याकडे ऐकायला वेळ नसतो. सांगणारा पटेल ठरतो. समुद्र, ऊर्जा, गझल, हेमा यांचे एकमेकांशी, मुंबई शहराशी आणि बदलत जाणा-या काळाशी असलेले नाते आणि बदलत्या काळाचा या सर्वांवर होणारा परिणाम हे पटेलीच कथाबीज आहे. या कांदबरीचा नायक समु्द्रची जीवनाच्या वेगाशी स्पर्धा सुरू आहे. तो वेगाचा पाठलाग करतोय, वेगाचा माग काढतोय. हा वेग जीवनाच्या सुखाचा नाही तर जीवनाच्या अनेक अंगांशी एकरूप झालेला हा वेग तो चिमटीत पकडतो. या वेगाच्या स्पर्धेर तो जमिन शोधतोय जिथे त्याला पाय रोऊन स्थिर उभं राहाता येईल. यातून समु्द्रच्या डोक्यात प्रचंड केऑस निर्माण झाला आहे. त्यातून तो अनेक विषयांना भिडत असतो. हे भिडण म्हणजे पटेली. समु्द्र अगदी समुद्रासारखां खोल आहे. त्याचा तळ सापडत नाही. या केऑस मधून तो भाषिक, साहीत्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय तुच्छतावादावर भाष्य करत असतो. दुसरी कडे, व्यवस्थेबाहेर ठेवण्यात आलेल्या आणि शोषित घटकांबद्दल, वंचित माणसांबद्दल करूणा बाळगतो. हे सगळं करत असताना तो वैयक्तिक आयुष्यात सुद्धा संघर्ष करत असतो. एक माणूस म्हणून येणा-या सगळ्या मर्यादा तो प्रांजळपणे मांडत, पोटात घेत तो पुढे सरकत असतो.
समुद्रची गर्लफ्रेंड ऊर्जा ही नावाप्रमाणे जीवनातली उर्जा कवेत घेऊ पाहणारी आहे. ती जीवनाच्या वेगावर स्वार होऊ पाहणारी आहे. करियरीस्ट आहे. ते तिच्या सामाजिक पार्श्वभूमीच संचित आहे. ती एकीकडे समुद्रवर खूप प्रेम करते; पण दुसरीकडे जीवनाचा वेगसुद्धा तिला हवा आहे. या दोन दगडींवर पाय ठेवताना तिची खूप दमछाक होत आहे पण तरीही ती स्वप्नांचा पाठलाग करत आहे. कार्पोरेट जगात अशा अनेक उर्जा आढळतील ज्यांची सृजन ऊर्जा बोर्डरुमच्या मिटींग मधे, प्रोजेक्टच्या डेडलाईन मधे आणि टार्गेटच्या नंबर्समध्ये मारली जाते.
समुद्र आणि ऊर्जा यांना जोडणारा दुवा म्हणजे गझल. समुद्र ज्या जमिनीच्या शोधात आहे ती जमीन म्हणजे गझल. वेगाच्या स्पर्धेत गझलं कुठेच दिसतं नाही. तिचा जागाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन आहे, जगण्याची एक वेगळी लय आहे. ती विभक्त आईबापाची मुलं जगरहाटी लवकर शिकतात. वयाच्या मानाने अधिक समजुतदार असतात. गझलला तिच्या आईने म्हणजे हेमाने एकट्याने वाढवले आहे. हेमाची स्वत:ची वेगळी कथा आहे. समुद्र आणि ऊर्जेला स्थिरपण देणारी गझल आहे. वेगाच्या स्पर्धेत आपण ज्या ठहरावाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तो ठहराव म्हणजे गझल. कधी कधी वाटतं कदाचित समुद्रपेक्षा गझल दुनियेला जास्त फाट्यावर मारत जगत असावी.
अभिजनवादाविषयी समुद्रला चीड आहे. अभिजनवाद मग तो सांस्कृतिक, सामाजिक, वर्गीय, आर्थिक असो व भाषिक भाषेच्या वेगाविषयी बोलताना समुद्र म्हणतो “तथागताचा भाषेचा आग्रह पूर्णपणे राजकीयच होता. चक्रधरांचा मराठी सदृश्य भाषेचा पहिला हट्ट असू देत की, त्यानंतरचा पैजा जिंकण्याचा विश्वास असू देत. त्यातील राजकीयता समजावून घेतली, तर ते दर्जेदार विद्रोह ठरतात. एकनाथांचा समन्वयीपणा अनेकांना आजच्या काळात साध्य झालेला आहेच. पण तुका जेव्हा आपली भाषा जेव्हा केवळ मौखिकतेने पसरवतो त्याला बंडखोरीचे टोक म्हणू शकतो. आजही त्याची भाषा प्रवाही वाटते बोलण्यातील मराठीत गाथेतले शब्द फिरुन फिरुन येतात. फुल्यांनीसुद्धा भाषेला समृद्ध केले याचा विसर पडतो. त्यांनी त्यांचे लेखन सहज राजकीय भाषेत केले असते, पण ते पोहचणे जास्त गरजेचे असेल. त्यानंतर मात्र क्रांती भाषेतुन घडते याचा विसर पडलेला दिसतो.” पुढे समुद्र म्हणतो “सत्यकथेची होळी करणा-यांनी पुढे भाषेची होळी केल्याचे दिसत नाही.” हे वाक्य वाचून मी चमकलो. कोणीतरी अलगद काळजावर सुरी चालवल्या सारखं वाटलं. खुप अस्वस्थ झालो. अशी मनं आणि मेंदूवर सपासप वार करणारी भाष्य समु्द्र पटेलीत करतं असतो. आपल्या अनेक धारणांना धक्के देत राहतो.
पटेली ही जेवढी समुद्र, ऊर्जा, गझल यांची कथा आहे ती कथा तेवढीच मुंबई शहराचीसुद्धा आहे. या शहारातील अनेक ठिकाण वारंवार आपल्या समोर येत राहतात. प्रगतीच्या वेगाला हे शहर हळूहळू शरण जाऊ लागलं आहे. पटेलीतली चाळ हेसुद्धा एक पात्र आहे. ती तिच्या सगळ्या गुणदोषांसहीत पटेलीत समोर येते. या चाळी सोबत समुद्रच विशेष नातं आहे. संपानंतर समुद्रचा बाप ग्रॅच्युईटी घेऊन गावाला जातो पण चाळीतली खोली मात्र सोडत नाही. चाळीतल्या लोकांच्या विश्वासावर समुद्र एकटाच चाळीत राहतो. समुद्रच्या बापाच चाळीवर विश्वास आहे म्हणून पोरगा चाळीत एकटा राहतोय. चाळ कधी उपाशी मरू देत नाही, असे समुद्र म्हणतो. चाळीतल्या लोकांवर विश्वास असणारा समुद्राचा बाप डाव्या कामगार संगठनेचा सदस्य असतो, पण समुद्रच्या आंतरजातीय लग्नाला विरोध करतो ही बाब डाव्यांच राजकारण नेमकं कुठे फसलं यावर नेमकं भाष्य करते.
चाळी मिल्सच्या आस-याने उभ्या राहिल्या. रिडेवलपमेंटच्या नावाखाली बंद पडलेल्या मिल्स गेल्या आणि मॉल्स आले. या मॉल्सच्या पायाभरणीत अनेक स्वप्नांचा बळी देण्यात आलाय. मॉल्स म्हणजे विकासाचा वेग. या वेगाचा मानवी नातेसंबंधांवर परिणाम होतोय. या वेगाशी स्पर्धा करणारे, स्पर्धेत मागे पडणारे या वेगाचे बळी आहेत. समुद्र् म्हणतो “शोषितांचे स्वप्नं मारलेत ईंडीया बुल्सने. . . “आता चाळींच्या जागेवर टॉवर ऊभे राहू लागलेत. ऊंच टॉवरच्या बाजुला रिडेवलप चाळी ऊभ्या राहत आहेत. टॉवरवाल्यांच्या नजरेत चाळी रीडेवलप चाळी म्हणजे सर्वंट क्वार्टर्स. या रिडेवपलमेंट मध्ये अनेक स्वप्न मारली जात अहेत, मारली जाणार आहेत. समुद्रच स्वतःच्या चाळीवर खूप प्रेम आहे. पण रिडेवलपमेंटविषयी मात्र त्याला चीड आहे कारण रिडेवलपमेंटच आर्थिक, सामाजिक, वर्गीय राजकारण त्याला नेमकं उमगलयं. तो चाळींवर, तिथल्या माणसांवर, चाळ जीवनावर भाष्य करत असतो. लवकरच हे सगळं रिडेवलपमेंटच्या वेगासमोर इतिहास जमा होणार आहे हे त्याला ठाऊक आहे म्हणून तो अस्वस्थ आहे. पटेली ही रिडेवलपमेंटच्या ब्लॅकहोल मध्ये हळूहळू कणा कणाने गडप होत जाणा-या शहराची आणि या शहरातील वंचितांची अस्वस्थता आहे.
पटेलीचा मोठा अवकाश हा मुंबईने व्यापलेला आहे. मुंबईतील अनेक ठिकाणं त्यांच्या वैशिष्ट्यांसह पटेलीत आपल्याला भेटत राहातात. सामान्य मुंबईकराला तर अनेकदा समुद्र सोबत आपण मुंबईत फेरफटका मारत आहोत की काय असे वाटावे एवढी दृष्तात्मकता पटेलीच्या भाषेत आहे. ही भाषा पुस्तकी नाही. ती मुंबईची आजची जीवंत भाषा आहे.
पटेली वाचताना काही ठिकाणी विस्कळीत वाटू शकते. ऊर्जा, गझल’, हेमाशी बोलत असताना समुद्र अचानक एखादा धागा पकडून काही भाष्य करतो. समुद्रच्या शब्दात बदलवतो. विषयाला कल्टी मारतो. मला वाटतं हा लेखनातला दोष नसून समुद्रच्या मनातलां, मेंदूतला केऑस नेमकेपणाने मांडण्यासाठी लेखकाने जाणीवपूर्वक केलेली योजना आहे. लेखकाचे वाचन दांडगे आहे. अनेक ठिकाणी लेखक काही संदर्भ देत असतो. त्याचा पाठलाग करताना काही वेळेस सामान्य वाचकांची दमछाक होण्याची शक्यता आहे. पण पटेलीच्या आवाक्यासमोर हे दोष फार फार सूक्ष्म वाटतात.
कादंबरीच्या सुरूवातीलाच अविनाश लिहितो “संचित असे काही नसावे. संचिताने तुच्छता वाढत असेल आणि माज ही. माहितीच संचित कशाला, रोज मरावं माहितीने., कणगी भरता भरता अनेकांची ठासली जाईल. काळ करतो गं संचित म्हणून तो अमर आहे” पटेली हे काळाच संचित आहे. आपण ज्या स्थलकालाच्या मर्यादेत जगत आहोत त्या स्थलकालाच्या परिघातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक अभिजनवादावर वंचितांनी केलेलं पटेली हे कठोर भाष्य आहे. या दशकातील एक जबरदस्त पॉलिटीकल स्टेटमेंट आहे. हे पॉलीटिकल स्टेटमेंट समजून घ्यायचं असेल, तर “पटेली” पुन्हा पुन्हा वाचावी लागणार आहे. पटेली वाचून झाली की फॅंड्री, सैराटसारखी डोक्यात ठाण मांडून बसते. वाचकांना एक नितांत मनस्वी आणि जाणिवा समृद्ध करणारा वाचन अनुभव देणा-या पटेलीचा उत्तरार्ध येवो या सदिच्छा.
पुस्तकाचे नाव: पटेली
लेखक: अविनाश ऊषा वसंत
पुस्तक परीक्षण – साक्य नितीन