नांदेड : नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार आंदोलन राज्यभरात करण्यात येत आहे. नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यासाठी धडक आंदोलन करण्यात येत आहे.
आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. हेडगेवार चौक परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत गिरीश महाजन यांच्या कृतीचा निषेध नोंदवला. (Vanchit bahujan aghadi)
नेमकी घटना काय?
२६ जानेवारी रोजी नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या शासकीय सोहळ्यात भाषण करताना त्यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. एका जबाबदार पदावर असलेल्या मंत्र्याकडून अशा प्रकारे महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे, असे म्हणत नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

या घटनेचे पडसाद नांदेड जिल्ह्यातही उमटले आहेत. वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नायगाव येथील हेडगेवार चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “महामानवाचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांचा निषेध असो,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. (Vanchit bahujan aghadi)
या आंदोलनात बालाजी गायकवाड रातोळीकर (जिल्हा सचिव, वंचित युवा आघाडी), दीपक गजभारे (जिल्हा उपाध्यक्ष), साहेबराव कोपरेकर, सतीश वाघमारे, साईनाथ नामवाडे, भूषण काळेवार, राजू भद्रे, दीपक जमदाडे, प्रभाकर वाघमारे उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महामानवांचा अवमान करणाऱ्या मंत्र्यांनी माफी मागावी, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.





