गेल्या आठवड्यात मणिपुरी बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमला कोलंबिया देशाच्या इंग्रीत वॅलेन्सिया कडून स्वीकाराव्या लागलेल्या वादग्रस्त पराभवामुळे २०२१ ऑलिंपिक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. आपल्या देशाने तिच्या सोबत अश्रू ढाळले. हे मात्र कळत नव्हते की, हे अश्रू मगरीचे आहेत की कांद्याच्या वासामुळे आलेले आहेत. कदाचित, आपण ‘मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे’ ह्यावर तात्पुरता का असेना विश्वास ठेवला असावा म्हणून रडलो असेन.मेरी कोमला ऑलिंपिक स्पर्धेतून बाहेर फेकले जाणे हे अन्यायकारक होते या आशयाच्या टेलीविजन चॅनेल वरील घमासान चर्चा पाहून ओमंग कुमार यांच्या ‘मेरी कोम’ या चित्रपटाने निर्माण झालेला वादंग आठवला. विविध माध्यमांतील लेखांमध्ये प्रियांका चोप्राने ‘मांगटे चुंगनेजियांग मेरी कोम’ची व दर्शन कुमारने मेरी कोम हिचा जोडीदार ओंग्लरची चित्रपटामध्ये भूमिका साकारणे हे मुख्य भूभागात राहणाऱ्या भारतीयांची, ईशान्य पूर्वेला राहणाऱ्या आणि तथाकथित चिंकी पिंकी दिसणाऱ्या लोकांच्या विरोधातील खोलवर रूजलेली वंशभेदी वृत्ती आहे याचे अधोरेखन विविध माध्यमात लिहिल्या गेलेल्या लेखांनी केले आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये असणाऱ्या ईशान्य पूर्व विध्यार्थी गटाने एक परिसंवाद आयोजित केला होता ज्यात माझाही सहभाग होता. त्यांनी महत्त्वाचा प्रश्न उभा केला. चित्रपटातील मेरी कोमची भूमिका साकारणे हा ‘व्हाईट वॉशिंग’ चा भाग आहे काय? व्हाईट वॉशिंग ही संज्ञा हॉलीवूड चित्रपटांमध्ये केल्या जाणाऱ्या अभिनय निवडी संदर्भात वापरली जाते ज्यामध्ये श्वेतवर्णीय कलाकारांची निवड अश्वेत पात्रांची भूमिका साकारण्यासाठी करतात. या परिसंवादातून सुप्त आणि कावेबाज स्वरूपाच्या भारतीय वंशवादाचे वास्तव दर्शवण्यात आले. मोठे डोळे, सरळ नाक आणि गोरी कातडी यांना केंद्र मानणाऱ्या वंशवादी भावना देशात हळुवारपणे पसरवण्या मध्ये लोकप्रिय संस्कृतीच्या पर्यायाने चित्रपटांच्या प्रतिगामी भूमिकेचे स्पष्टपणे अधोरेखन करण्यात आले.
हिंदी चित्रपटां मध्ये सिगरेटचा भपकारा मारणाऱ्या इंग्लिशाळलेल्या नकारात्मक स्रिया, सुरमा अथवा काजळ लावलेले मुस्लीम आतंकवादी, आफ्रिकन अथवा चायनीज खलनायक आणि सांबर रस्सा चाटणारे मद्रासी कॉमेडीयन्स यांना नेहमीच उत्तर भारतीय हिंदू अभिनेता/अभिनेत्रींपेक्षा वेगळ दाखवण्यात आले. आपल्या लोकप्रिय चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात लिंगभावी, जातीय, धार्मिक मिथ्या कल्पना पसरवल्या आहेत. परंतु, केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाने (CBFC) अशा मिथ्या कल्पना प्रचार प्रसाराच्या विरोधात काही भूमिका घेतल्याची माहिती नाही अप्रकट आणि दबलेल्या इच्छांना मोठ्या कल्पित कथा अथवा मोठ्या दंतकथेतील पात्रांमधून जादुई रीतीने बॉलीवूड सिनेसृष्टी पडद्यावर दर्शवते हे आपल्याला माहीत आहेच. याच्यातून वास्तव चित्रण कोसो दूर राहते.सामूहिक इच्छांचे प्रकटीकरण करणाऱ्या लोकप्रिय चित्रपटांच्या ताकदीकडे आशिष नंदी आणि सुधीर काकर यांनी लक्ष वेधले आहे. जनसमूहांच्या दबलेल्या ‘सामूहिक इच्छांची’ बाजारामार्फत त्यांनाच विक्री करण्यासाठी तारांकित अभिनेत्यांचा/अभिनेत्रींचा वापर करण्याची आपल्याकडे फार जुनी पद्धत आहे.
त्यामुळे पंजाबी प्रियांका चोप्राला कोम आदिवासी समूहातील मणिपुरी मुलीची भूमिका करण्यासाठी निवडले ही धक्का देणारी गोष्ट न ठरता त्याच सामान्यीकरण होते. ही भूमिका छोट्या पात्रासाठी नसून खऱ्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटातील मुख्य पात्रासाठी आहे ज्याने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे जमावबंदीने त्रस्त आणि गरिबीने होरपळलेल्या मणिपूरमधून भरारी मारून जागतिक बॉक्सिंग विजेतेपदाला गवसणी घातली.
कोणी इथे असे मत प्रदर्शित करेल की, अभिनयाचे मूलभूत तत्त्व एखाद्याला दृश्य स्वरूप देणे आहे आणि त्यामध्ये अस्सलपणा अथवा खरेपणा याचा काहीही संबंध नाही. तरीही ,सिनेप्रेक्षकाला जे पाहायला आवडते तेच प्रमाण मानून मेरी कोमच्या पात्र निवडीला सिनेमा अभिव्यक्तीच्या फाजील स्वातंत्र्याचा आधार घेऊन योग्य ठरवणे गैर आहे. सिनेमा अभिव्यक्तीचे समर्थनच करायचे असेल ,तर उत्तर भारतीय दिसणाऱ्या किरण बेदी अथवा अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्यांच्या भूमिका साकारण्यासाठी म्हणून किरकोळ शरीर असणाऱ्या, छोटे डोळे असणाऱ्या ईशान्येकडील कलाकाराला निवडले पाहिजे. जर ५.२ फूट उंच असणाऱ्या मेरी कोमच्या बॉक्सिंगच्या हालचालींवर अथवा तंत्रावर ५.७ फूट उंच असणाऱ्या प्रियांका चोप्रामुळे काहीच फरक पडत नसेल, तर आसामी अथवा मणिपुरी कलाकाराने चित्रपटात बेदी अथवा बच्चन साकारला तर काय फरक पडतो? पण, हे आपल्या विचारातही येत नाही असे का?
मुंबई येथील सिनेसृष्टीत ईशान्येकडील राज्यांमधून आलेला एकही अभिनेता जम बसवू शकला नाही ही बाब बरीच बोलकी आहे. सिक्कीम मधील भुतिया अभिनेता डॅनी डेंगझोंगपा हा एकमेव अपवाद आहे. नेपाली मनीषा कोईराला जिला कातील नजरेची म्हणून स्वीकारल गेल ती हिंदी सिनेमात सहजपणे सामावून घेता येईल अशीच होती. हॉलीवूड मध्ये आयडेंटीचे (समूह ओळख) राजकारण प्रचंड गुंतागुंतीचे असूनही काळे, युरोपियन, आशियायी असे चेहरे दाखवण्यासाठी तरी त्यांच्याकडे आहेत. राष्ट्राच्या लोकप्रिय कल्पनांवर गल्लाभरू चित्रपट मर्यादा आणत असतील तर असे म्हणणे उचित होईल की, भारतीय लोकप्रिय चित्रपटांची राष्ट्रीयतेची कल्पना भारतीय मुख्य भूमिपुरतीच मर्यादित आहे. ती मुख्य भूमीला ईशान्य कडील राज्यांना जोडणाऱ्या चिकन नेक च्या पुढे जात नाही. खूप काळ आपण भारतात द्रविडीयन आणि आर्य असे दोनच मुख्य वंशगट असल्याचे तुणतुणे वाजवत राहिलो. यातून भारतात गुंतागुंतीची वांशिक विविधता आहे हे सत्यच झाकून गेले ज्यामध्ये मध्यभागात आणि पूर्वेकडे राहणारे मंगोलॉयिड गट अथवा आफ्रिकन पूर्वज असणारे सिद्दी समुदाय व इतर अनेक गट यांचा समावेश करता येईल.
खूप सारी सरमिसळ करून ओमंग कुमारचा चित्रपट मणिपूरच्या मेरी कोमला प्रियांका चोप्राच्या रूपाने तिची वांशिक ओळख पुसून अथवा नवीन वांशिक ओळख देऊन तिला वर्चस्ववादी राष्ट्रीय साच्यामध्ये बसवतो. मणिपूरचे भारतीय राज्यासोबतचे तणावाचे संबंध, खासकरून आर्म्ड फोर्सेस स्पेशल कायदा (AFSA) ह्यावर पांघरून घालून चित्रपट वास्तवाचे विकृतीकरण साध्य करतो. चित्रपटातील टाटा मिठाची जाहिरात ज्यात ‘मी देशाचे मीठ खाल्ले आहे’ ही संहिता आणि चित्रपटाच्या शेवटात राष्ट्रगीताची रूजवण यातून एकीकरणाच्या विचारांना मजबुती मिळते. हा एकीकरणाचा युक्तिवाद जसा राष्ट्र राज्याचा आहे तसाच तो लोकप्रिय राष्ट्रीय चित्रपटाचाही आहे. देशभरात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला ‘करमुक्त’ घोषित करण्यात आले. मणिपूर मध्ये मात्र तो प्रदर्शित केला गेला नाही कारण काही बंडखोर गटांनी त्यावर बंदी घातली होती.भारताची ऑलिंपिकच्या शिरपेचात अजून एक तुरा रोवण्याची संधी हुकल्यामुळे आज आपण मेरी कोम सोबत दु:ख हळहळ व्यक्त करत आहोत. खरं म्हणजे आपण अजून एक कृती केली पाहिजे. स्वतःलाच आठवण करून दिली पाहिजे की, सातत्याने समूहभानातून आणि आपल्या राष्ट्रीय ओळखीतून आपण ईशान्य भागाला कसे वगळत आलो आहे.
लेखिका: रश्मी सहानी
अनुवादक : पृथ्वीराज शिंदे