नांदेड : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नांदेडमध्ये सुजात आंबेडकर यांच्या रॅलीने नांदेडमध्ये धमाला केला आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रभाग क्रमांक २० सिडको-वाघाळा भागात झंझावाती प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता, नांदेडमध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.

नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रॅलीची सुरुवात होताच ‘जय भीम’ आणि ‘एकच संधी वंचितला’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सुजात आंबेडकर यांचे ठिकठिकाणी पुष्पहार घालून आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले. विशेषतः तरुण आणि महिला वर्गाची उपस्थिती होती. सिडको-वाघाळा भागातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली, जिथे नागरिकांनी घराबाहेर पडत युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला.

नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आता नागरिकांनी बदलाचा निर्धार केला आहे, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. सुजात आंबेडकर यांनी रॅलीदरम्यान मतदारांशी थेट संवाद साधत, सक्षम आणि सुशिक्षित उमेदवारांना महापालिकेत पाठवण्याचे आवाहन केले.

प्रभाग २० मधील वंचित-काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारामुळे मतदारसंघात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांविरुद्ध निर्माण झालेली लाट आणि सुजात आंबेडकरांच्या रॅलीला मिळालेला प्रतिसादाने चर्चांना उथान आलेला आहे.






