आज असे एकही क्षेत्र नाही, ज्या क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली नसेल. सर्वच क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं योगदान देताना दिसतात. परंतु महिलांना या संधी मात्र सहजासहजी उपलब्ध झाल्या नाही. त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. एकोणीसाव्या शतकात महिलांनी आपल्या हक्कासाठी मोठा लढा उभारला. आपल्या काही मागण्या घेऊन त्या मान्य व्हाव्या यासाठी या कामगार महिलांनी संघर्ष केला. आपल्या हक्कासाठी उभारलेल्या या संघर्षाच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या लढ्यात स्त्री-पुरुष यांना समान हक्क अधिकार असावते ही प्रमुख मागणी होती. त्याचसोबत कामाचे तास कमी करावेत, स्त्री पुरुषांना समान वेतन असावे, कामाच्या जागी सुरक्षितता असावी तसेच पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही मतदानाचा हक्क देण्यात यावा, या मागण्या होत्या. याच मागण्यासाठी ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्क येथे हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून लढा पुकारला. अमेरिकन कामगार स्त्रियांनी पुकारलेल्या या लढ्याने क्लारा झेटकिन ही समाजवादी कार्यकर्ती प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक संघर्षाच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जावा असा प्रस्ताव क्लाराने मांडला, हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला आणि पुढे संयुक्त राष्ट्र संघाने १९७५ साली जागतिक महिला वर्ष घोषित केल्याने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
भारताबद्दल बोलायचं म्हटल तर मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. परंतु इतर देशांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानामुळे भारतीय महिलांना समान वेतन, कामाचे मर्यादित तास, मतदानाचा अधिकार हे पुरुषांच्या सोबतच मिळाले. हे सर्वस्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळेच. तसेच आपण भारतीय महिलांनी महिला दिन साजरा करत असताना काही गोष्टींचा बोध घेत आपली वाटचाल कशी असावी? यावर विचारविनिमय करणे गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे, या देशात वर्णव्यवस्था होती. या वर्णव्यवस्थेनुसार स्त्री ही अतिशूद्र मानली जाते. मग ती सवर्ण असो वा दलित. तिला हिन वागणूक, चूल मुल एवढ्यापर्यंत तिची मर्यादा, हा इतिहास आपण जाणून आहोत. स्त्री ही शोषणाच्या सर्वात शेवटचा घटक. आणि या शोषणाची पाळेमुळे धर्म, संस्कृती, परंपरा तसेच पुरुषप्रधान व्यवस्थेतून आलेली दिसतात. आजही संविधानाने महिलांना समान अधिकार दिलेले असले, तरी वास्तव नेमकं काय आहे? ते जाणून घेणं गरजेचं आहे. आज ही अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात महिलांना चुल मुल यातच गुंतून ठेवलेलं दिसत. तिने काय घालावं, इथपासून ते तिने कोणाशी प्रेम करावं, कोणाशी विवाह करावा, या वैयक्तिक स्वातंत्रावर ही तिच्या घरातील पुरुषांकडून बंधनं ठेवली जातात. आजही महिलांची लैंगिक शोषण, अत्याचार हे पूर्णतः बंद झालेले नाहीत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रमाण २०१७ साली ३१,९७९, २०१८ साली – ३५,४९७ आणि २०१९ साली ३७,१४४ असे आहे, हे फक्त पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचं. उर्वरीत देशभरात ह्याहून भयानक परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात दलित, आदिवासी महिला यांचे अत्याचाराचे प्रमाण त्याहून जास्त असल्याचं दिसून येतं. महिला दिन साजरा करत असताना महिलांनी हे बदलण्यासाठी पुढाकार घेण गरजचे आहे. तसेच या अत्याचारामागे असलेली जी ब्राम्हणी, पितृसत्ताक शोषणकरी व्यवस्था आहे, ती मुळासकट उखडून फेकणे हे आपल्या स्त्रियांचे आद्य कर्तव्य मानत त्या अनुषंगाने धोरणं आखली पाहिजेत. बाबासाहेब म्हणतात, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. महिलांना परंपरा संस्कृतीच्या नावाखाली गुलामीत ठेवण्याचं षडयंत्र पुरुषी सत्तेकडून होत असतं, त्याची जाणीव महिलांना करून देण्यासाठी पुरोगामी, महिला चळवळीने जबाबदारी घेतली पाहिजे असं मला वाटतं. त्याच सोबत बाबासाहेब असंही म्हणतात, एखाद्या वर्गाची परिस्थिती समजून घ्यावयाची असेल, तर मी त्या समाजातील स्त्रियांची शिक्षणप्रगती पाहिल. म्हणजे आजच्या काळात महिलांनी शिक्षित होणे अत्यंत महत्वाचं आहे. आज शहरी, निमशहरी भागात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण ठिकठाक असलं तरी ग्रामीण, आदिवासी अशा दुर्गम भागातील मुलींना उच्च शिक्षणासाठी चळवळींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासोबत महिलांनी शिक्षणासह सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात स्वावलंबी होणं यास प्राधान्य देत, त्यानुसर वाटचाल करायला हवी. महिलांचं सक्षमीकरण आणि समाजिक राजकीय चळवळीचे नेतृत्व घडेल तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिवस साजरा करायला आनंद वाटेल.
– स्नेहल सोहनी, मुंबई(लेखिका वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्ष आहेत)