जोतीबा फुले हे क्रांतिकारक होते. तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि इतिहासाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी समाजाला बदलविण्याचे प्रयत्न केले. समाज व्यवस्थेत त्यांनी घडवून आणलेले परिवर्तन चिरस्थायी ठरल्याने त्यांची ओळख क्रांतीच्या रूपाने जनमानसांच्या मनात आहे. सामाजिक, साहित्य, राजकीय क्षेत्रात त्यांचा वचक जाणवतो. स्पष्टवक्तेपणा आणि मानवी मूल्यांचे पाईक असल्याने त्यांच्या मनातील कारुण्य ही त्यांच्या चारित्र्याचे महत्त्वाचे पैलू आहे. प्रचंड अभ्यासू वृत्ती आणि तर्कसंगत चिकित्सा या स्वभावगुणांमुळे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रज्ञावंत महामानवाने त्यांना गुरुस्थानी बसविले आहे.
जोतीरावांनी या देशातील विषमतावादी व्यवस्थेला उदध्वस्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले दिसते. त्याचसोबत वंचित जात समूहांचे नायकत्व करत त्यांनी अस्पृश्य, स्त्रिया, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आदींचे लढे लढविले आहे. त्यांच्या समकालीन परिस्थितीत असलेली सनातनी व्यवस्था आणि उच्चवर्णीय पुरोगाम्यांचे (स्वतःला समाजसुधारक/सेवक म्हणवणारे) या सर्वांचे त्यांनी मुखवटे फाडले आहे. उपेक्षित – वंचितांच्या शोषणाचे स्वरूप जातीय, वर्गीय, स्त्रीदास्य आदी अनेक प्रकारचे असताना त्या शोषणाचा मूळ पाया ही वैदिक व्यवस्था असल्याच्या निष्कर्षावर आल्यामुळे त्यांनी तिचा तसा समाचार घेतला आहे.
आज त्यांचे विचार आंबेडकरी आणि इतर सर्व समविचारी चळवळींना प्रेरणा देण्याचे कार्य करत आहे. पर्यायी साहित्य प्रवाह, रंगमंच, राजकारण यांच्या उभारणीतून स्वत:सह सर्व उपेक्षितांना मुक्त करण्याचा हेतू बाळगून काम करणाऱ्यांना जोतीबाच आदर्श स्थान वाटत आहे. देशाच्या बदलत्या राजकीय तत्त्वप्रणालीमुळे प्रतिक्रांतीचे धोके उभे आहे. या दमनावर एकमेव हत्यार म्हणून सर्व बहुजनांना या लढ्याचे हत्यार जोतीबाच आहे, यात तिळमात्र शंका नाही.
त्यांच्या विचारांवर पादाक्रांत करीत असताना जोतीबांच्या तत्त्वांचा पडलेला विसर हा मानवी मनाला अनैतिकतेकडे घेऊन जाणारा ठरेल, असे माझे मत आहे. समकालीन परिस्थितीचा अभ्यास केला असता, देशात जात – जमातवादाचे राजकारण फोफावतांना दिसत आहे. स्त्री शोषणाच्या बाबतीत पुनश्च नवी धोरणे आखली जात आहे. शिक्षण व्यवस्थेला ब्राह्मणी विचारांचे प्रवाहकाचा दर्जा प्राप्त झाला असून, मानवी मेंदूला गुलामीकडे ढकलण्याचे प्रयोग केले जात आहे.
जोतीबांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविला आहे. स्त्री चळवळींना बळ देत पंडिता रमाबाईसारख्या स्त्रीवर ब्राम्हणांनी टीका केल्यावर त्यांच्यावर देखील वैचारिक हल्ला करण्याचे धाडस जोतीबांनी दाखवले होते. स्त्री मुक्तीचे मुख्य शत्रू असलेले आर्यभट्टांनी लिहिलेल्या धर्मग्रंथांना ‘हेकड पुरुषांनी’ लिहिलेले धर्मग्रंथ म्हणत. त्यांचा पाणउतारा केल्याचे आढळते त्याचप्रकारे त्यांच्या ‘सार्वजनिक सत्य धर्म’ पुस्तकात त्यांनी पुरुष व स्त्रियांच्या जीवनपद्धती, शोषण, मानसिकता यांचे ही सूक्ष्म निरीक्षण करून समतेचा वसा जोपासलेला दिसतो. डॉ. गेल ऑम्वेट म्हणतात ” जोतीबा फुले जातिव्यवस्थेचा जाच भोगणाऱ्या बहुजन समाजातून पुढे आले होते आणि जातिव्यवस्थेच्या शोषणाविरुद्ध, शेतकऱ्यांच्या लुटीविरुद्ध मुक्ती लढ्याची भूमिका हा त्यांचा विचार – व्यवहाराचा प्रमुख धागा होता. जुनी ब्राह्मणी परंपरा संपूर्ण फेकून देऊन, कष्ट करणाऱ्या जातींमध्ये असणारी बळीराजासारखी समतावादी परंपरा पुढे आणून नवीन लूटविरहित समताधारित, प्रेम व न्यायनिष्ठीत समाजव्यवस्था आणण्याचे त्यांनी समोर ठेवले होते”. यातून त्यांच्या १८७३ साली स्थापलेल्या ‘सत्यशोधक समाजाचे’ प्रयोजन समजते.
त्यांच्या जन्माच्या केवळ दहा वर्षे आधी मराठेशाहीचा अस्त होऊन इंग्रजी राजवटीला सुरुवात झालेली दिसते. त्यामुळे सामाजिक, राजकीय बदलत्या वातावरणाचा आढावा घेणे त्यांना सहज शक्य होते. त्याच पद्धतीने त्यांचे वावर ही ब्राह्मणी विचारांच्या पुणे शहरात झाल्याने त्यांना ब्राम्हणशाहीच्या रोगाचे मार्ग उमजले. स्त्री शोषणाबरोबर शेतकरी उपेक्षित जाती समूहांचेदेखील शोषण होत असल्याचे त्यांना जाणवल्यावर त्यांनी शेटजी भटजीसह प्रसंगी इंग्रज सरकारचा ही समाचार घेतला.
१८८९ साली झालेल्या ‘ऑल इंडिया कॉंग्रेस’ अधिवेशनात सहकारी लोखंडे आणि भालेकर यांच्या समवेत प्रवेशद्वारावर शेतकऱ्याचा पुतळा उभारून, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधित्वाशिवाय तिला राष्ट्रीय सभा म्हणता येणार नाही, असे सुनावले. तर ओतुर येथे १८८४ मध्ये भरलेल्या सभेत शेतकऱ्यांचे दैन्य, विद्येच्या क्षेत्रातील मागासलेपणा आणि त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक गुलामगिरी व समाजावरील ब्राम्हणी संस्कृतीचा प्रभाव यावर भाष्य करून, १८८५ मध्ये शेतकऱ्यांचा बहिष्कार घडवून आणण्याचे कारण ठरले. ‘शेतकऱ्यांचा आसुड’ हा ग्रंथ बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांना वाचून दाखवला. तसेच ‘दीनबंधु सार्वजनिक सभेची’ स्थापन केली. मुख्य म्हणजे ड्युक ऑफ कॅनॉटला हरी चिपळूणकरांनी मेजवानीसाठी आमंत्रित केले असता, त्या समारंभात उपस्थित असताना जोतीबा स्वतः शेतकऱ्यांच्या वेशात उभे राहून शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्या व शोषणाच्या दैन्यावस्थेची माहिती देण्याचे काम त्यांनी केले. त्याच विपरीत आम्ही शेतकऱ्यांचे मुक्तीदाते असल्याचा आव आणणारे न्यायमुर्ती रानडे व सार्वजनिक सभेवर त्यांचा विशेष रोष दिसतो. त्याचे कारण ही त्यांची वरवर असलेली चिकित्सक वृत्ती आणि प्रतिनिधित्वाचा अभाव होता. जोतीबांच्या मते, या सभेत मांग, महार, शेतकरी, बलुतेदार, आदींचा समावेश नाही. पाच पन्नास ब्राम्हणांनी सर्वांचे नाव घेऊन ब्राम्हणांना सरकारी जागा मिळवून देण्यासाठी उभे केलेले ते एक सोंग आहे. त्यामुळे या सभेला सार्वजनिक हे नावच केवळ नावापुरते आहे अशी टीका त्यांनी केलेली दिसते.
जोतीबा ज्या प्रमाणे स्त्रिया – शेतकरी यांच्या तत्त्वज्ञानावर बोलता, त्याच पद्धतीने त्यांना पाण्याचे तत्त्वज्ञान ही गरजेचे वाटले. पाण्याशिवाय मानवी सृष्टीचा विकास अपूर्ण राहील याची जाण ठेवत बहुजनांच्या कृषी सामर्थ्याचा बळ देण्यासाठी त्यांनी उपाययोजना ही कल्पिल्या होत्या. त्यांच्या दृष्टीने पाण्याची निष्क्रिय नासधूस न केल्यास, त्यास जमिनीत मुरवल्यास आणि त्याचा अपव्यव रोखल्यास दुष्काळग्रस्तेवर मात करता येणे शक्य आहे. यास्तव त्यांनी त्यांच्या जबरदस्त निरीक्षणे, कल्पनाशक्ती आणि अभ्यास यांच्या जोरावर संबंधित मार्ग ही शोधून काढले.
जोतीबा जसे सामाजिक भूमिकांना गांभीर्याने घ्यायचे, तसेच दैनंदिन जीवनाबाबत ही ते जागरूक होते. बाबासाहेबांचे गुरू असलेले जोतीबा स्वतः योग्य आणि तोडीचा वेष परिधान करत. शूद्र – शूद्रादींनी स्वच्छ राहवे, सुव्यवस्थित गणवेश परिधान करावा याबाबत ने नेहमी शिकवत देत असतं. ते म्हणतात,
“वस्त्रे धुतल्यास जास्त ती टिकती।।
संतोषी ठेवीती।। वापरणाऱ्या।।
धुळीस घाम वस्त्रे कुजवती।।
दुर्गंधी सोडीती।। घ्राणेंद्रिया।।
दुर्गंध येताच किळस करती।।
दुरुनी वागती।। त्याच्या संगे।।
वस्त्रांची स्वच्छता ठेऊ न जाणती।।
रोगग्रस्त होती।। जोती म्हणे।।”
जोतीबांचे कार्य स्त्री मुक्ती, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातीअंत या चळवळीत ही प्रामुख्याने घेतले जात असले, तरी त्यांचा साहित्यिक कल ही अभ्यासण्याची गरज आहे. त्यांचा इतिहास लेखनाचा नमुना हा अत्यंत दर्जेदार चिकित्सक असल्याचे जाणवते. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असुड, ब्राम्हणांचा कसब ते काव्यांच्या प्रतिभेची ओळख करून देणारे आहे. स्वतःची साहित्यिक भूमिका किती ठाम असावी, याबाबत आजच्या साहित्यिकांना निदर्शनास आणून देण्यासारखे एक मराठी ग्रंथकाराला लिहिलेलं पत्र अभ्यासण्याची गरज आहे. त्यामध्ये जोतीराव नमूद करतात की,
“यांच्यात मिसळल्याने आम्हा शुद्रातिशूद्रांचा काही फायदा होणे नाही.” याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे.” एकंदरीत त्यांच्या ‘इशारा’ या पुस्तकाच्या सुरुवातीला उद्धृत केलेले “जिस तन लागे वहि तन जाने ! बीजी क्या जाने गव्हारा रे !!” या कबीराच्या वचनाची रिघ ओढल्याने जाणवते.
वर्तमानात वंचित जात समूह, शेतकरी – शेतमजूर, स्त्रिया, आदिवासी, ओबिसी आदी सर्वांना व्यवस्थेने जोखडून ठेवलेले दिसते. संविधान मूल्य पायदळी तुडविली जात आहे. EWS च्या नावे प्रतिनिधित्व /आरक्षण यांचा चुकीचा बागुलबुवा करत सांविधानिक भूमिकांवर पूर्णतः वर्चस्व लादण्याचा प्रयत्न होत आहे . मुख्य म्हणजे प्राथमिक शाळा बंद करून वर्तमान स्थितीत धाडसाने द्रोणाचार्याच्या वृत्तीच समर्थन केले जात आहे. या सर्वांना रोखण्यासाठी बुद्धीजिवी आणि कार्यकर्त्यांनी सक्षम होण्याची गरज आहे. जोतीरावांचा विचार कालसापेक्ष अद्यापही बाद झाला नाही. यावर चिंतन करून नव्या लढ्याला सुरुवात करण्याची गरज आहे. प्रश्नांचे बदलते स्वरूप आणि फुले नीतीचा गौरव केल्यास क्रांतीला अवकाश लागणार नाही हेच वास्तव आहे. ते स्वीकारून आपण तयारीला लागणे इतकेच त्यांचे प्रति अभिवादन असेल. अन्यथा सर्व फेल ठरेल !
– संविधान गांगुर्डे