Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सांस्कृतिक

झुंड : सांस्कृतिक क्रांतीचे ऐलान – सचिन माळी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 20, 2022
in सांस्कृतिक
0
झुंड : सांस्कृतिक क्रांतीचे ऐलान  – सचिन माळी
0
SHARES
352
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

‘झुंड’चा ‘पहिला दिवस, पहिला खेळ’ पहिला. नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या, फँड्री, सैराट आणि आता झुंडच्या माध्यमातून जनरंजन करता करता जनमुक्तीच्या प्रबोधनाची लडच लावलेली आहे. प्रत्येक चित्रपटात आशय आणि अभिव्यक्तीच्या पातळीवर सातत्य जपलेले आहे. खरंतर नागराजच्या चित्रपटांची ही मालिका म्हणजे त्याच्या प्रत्येक सिनेमाला स्वप्नांच्या धाग्यांशी गुंफत आणि अवगत करत निघालेला एक महासिनेमाच आहे. नागराजचा प्रत्येक सिनेमा म्हणजे जणू एक प्रसंगच आहे! ‘पिस्तुल्या’ हा पहिला प्रसंग होता, ‘फँड्री’ दुसरा प्रसंग होता, ‘सैराट’ तिसरा प्रसंग होता तर ‘झुंड’ हा चौथा प्रसंग आहे. त्यामुळे या सर्व प्रसंगातील म्हणजेच चित्रपटातील कलाकारांचीसुद्धा Continuity नागराजने ठेवलेली आहे. हा सुद्धा सिनेमाच्या प्रांतात एक नवा प्रयोगच ठरणार आहे. जसे की राज कपूरच्या एका सिनेमाचे बॅकग्राऊंड म्युझिक हे त्याच्या पुढील सिनेमाचे प्रमुख संगीत असायचे. त्याप्रमाणे पिस्तुल्यापासून सोबत असणारे हे सर्व कलाकार नागराज अण्णा सोबत एका मोठ्या प्रवासाला निघालेले आहेत, असेच वाटते.

प्रत्येक चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे यांनी जीवनातील खूप छोट्या छोट्या गोष्टीतून खूप मोठे जीवनाचे तत्त्वज्ञान उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हजारो वर्षांची घुसमट, आक्रोश, जीवन जगण्याची आस आणि शोषण मुक्तीची प्रेरणा हाच नागराजच्या प्रत्येक कलाकृतीचा गाभा आहे. “अंधाराच्या गुहेशी पिसाळलेला जाळ, मी शिलगावत जाणार आहे यापुढचा काळ” हाच विद्रोही बाणा नागराजच्या प्रत्येक चित्रपटात खोलवर उतरलेला दिसून येतो.

“झुंड”चे वैशिष्ट्य हे आहे की, त्याची प्रत्येक फ्रेम प्रचंड काही बोलून जाते. या देशात झुंड ठरलेला किंवा अस्तित्व नाकारलेला प्रत्येक माणूस हा एक महाकाव्य आहे; पण ते वाचण्याची प्रतिभा दिग्दर्शक म्हणून नागराजने अवगत केलेली आहे. तो झोपडपट्टीतीलच नव्हे तर समग्र व्यवस्थेतील दुःखाचे अनेक पदर उलगडून दाखवतो. तो शोषणाचे सूक्ष्म अतिसूक्ष्म आयाम हेरून ते उचकटून दाखवतो. महत्त्वाचे म्हणजे हे करताना तो कुठेही रडगाणे गात बसत नाही. कुठेही शब्दबंबाळपणा येऊ देत नाही. कॅमेरा लेन्सची भाषा बनवून जुने सिम्बॉल काम करीत नसतील, तर नवे सिम्बॉल तयार करून वास्तवावर निर्भीडपणे झोत टाकतो. झुंड सिनेमामध्ये नागराज ‘देव’ ही संकल्पना जेव्हा पेट्रोलच्या टाकीच्या सिम्बॉलमध्ये आणतो तेव्हा तो मंदिर-मशिदीच्या वादात ‘देव’ आणि ‘धर्म’ किती स्फोटक बनले आणि त्याची किंमत देशाला कशी आजही चुकती करावी लागते आहे; याची दाहक जाणीव करून देत असतो. या देशातील शोषित पीडितांच्या दुःखात दैववाद त्यांना समतीचे गुलाम म्हणून घडवण्यात निर्णायक भूमिका पार पाडणार असेल, तर तो “भंगारात टाका” हे सांगणारा नागराज किती महत्त्वाचे सांस्कृतिक राजकारण (Cultural Politics) उभे करीत आहे, हे ध्यानात येईल. या चित्रपटातील सांस्कृतिक राजकारणाच्या इतर ही महत्त्वाच्या जागा सांगता येतील; पण इथे विस्तार भयास्तव ती चर्चा लांबवत नाही.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा की, आज आपल्या देशात राष्ट्रवादाची एवढी सवंग चर्चा होत असताना झोपडपट्टीतील एक मूलं भारत म्हणजे काय? हा निरागस सवाल जेव्हा उपस्थित करतो तेव्हा राष्ट्रवादाच्या आणि राष्ट्राच्या सगळ्या तथाकथित व्याख्या प्रश्नांकित होऊन जातात.

भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर आधुनिक भारताच्या निर्मिती प्रक्रियेत प्रस्थापितांनी मांडलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेतून दलित, आदिवासी आणि इतर मार्जिनल जाती कायम स्वरुपी हद्दपार करण्यात आलेल्या आहेत. I have no mother land म्हणणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनातील शोकनाट्य हे आजवर कोणत्याही सिनेमाला मांडता आलेले नव्हते. ते मात्र झुंडमध्ये फुटबॉल सामना जिंकल्यावर झोपडपट्टीतील लेकरं स्वतःची ओळख सांगताना उलगडत जातात. देशात तुम्ही उभ्या केलेल्या भिंतीच्या पल्याडही एक मोठा देश आहे आणि तो आमचा शोषित पीडितांचा आहे, याची जळजळीत जाणीव नागराज करून देतो. तो इथेच थांबत नाही तर त्या भिंती ओलांडण्यासाठी स्वतःला घडवण्याची, प्रिपेअर करण्याची आवश्यकताही अधोरेखित करतो.

या चित्रपटात “सारे जहाँ से…” हे गाणे बुलबुलवर ज्या पद्धतीने वाजवलेले ते कुणाला बोबडे किंवा हार्ष वाटू शकेल. पण, ती नुसती धून नाही तर महात्मा फुलेंनी “एकमय लोक म्हणजे राष्ट्र” अशी आम्हां भारतीयांना घातलेली आर्त साद आहे एवढं मात्र नक्की! हा जातीअंतक राष्ट्रवाद आहे जो भारतीय सिनेमात इतक्या ताकदीने कधी आल्याचे दिसलेले नाही. माणूस जिंवत आहे का नाही महत्त्वाचे नाही, तर त्याच्याकडे तसा कागद असणे महत्त्वाचे आहे. हे विदारक वास्तव जेव्हा झुंड मांडतो, तेव्हा पुढील काळात एनआरसीवरून नागरिकत्व सिद्ध करू न शकणारे आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी सर्वात आधी डिटेन्शन कॅम्पमध्ये कैद होतील, ही जाणीव झुंड सिनेमा करून देतो. तेव्हा पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही.

ही माणसं जगण्याचाच किंवा जिवंत राहण्याचाच गुन्हा करीत आहेत का? हा सवाल भारतीय चित्रपट सृष्टीला किती झेपेल माहिती नाही. परंतु, यातून आत्मजाणिवेचे आणि आत्मभानाचे जे वारे वाहायला सुरू होईल ते कोणत्याही चिन्मय, तन्मय, शर्वरी गँगच्या पुढील हजार पिढ्यांना रोखता येणार नाही.

नागराजचा सिनेमा हा एका सांस्कृतिक क्रांतीचे ऐलान आहे, असे मला ठामपणे वाटते. नागराजचा प्रत्येक चित्रपट हा एक सत्याग्रह आहे. नागराजने कोथरूडमध्ये वाजवलेली हलगी ही नुसती हलगी नव्हती, तर ती सांस्कृतिक क्रांतीची रणहलगी होती हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे त्याची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाईल; परंतु जनता नागराजच्या सोबत उभी राहील हेही तितकेच स्वाभाविकपणे घडणार आहे. म्हणूनच नागराजचा चित्रपट हा आता नुसता चित्रपट राहिलेला नाही, तर तो एक लढा म्हणून पुढे येत आहे.

नागराजला उजवे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत असताना, पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी अवास्तव कसोट्या लावून उजव्या छावणीच्या पथ्यावर पडतील अशा भूमिका वठवणे, शेरेबाजी करणे आश्चर्यकारक आहे. नागराजने कलाकृती निर्माण केलेली आहे त्यातून तो वास्तव मांडून दुःख मुक्ती, शोषण मुक्तीची ज्योत प्रत्येक हृदयात प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने जणू एखादा क्रांतिकारी पक्षच काढलेला आहे असा समज करून घेऊन त्याच्याकडे डावपेच, व्युहरचना, कृतिकार्यक्रम आणि शोषणमुक्तीचा जाहीरनामा मागणे हे एक तर भाबडेपणाचे आहे किंवा मूर्खपणाचे आहे. पुस्तक वाचून बोलणाऱ्यांना स्क्रीन किती वाचता येते? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहेच शेवटी!

आणखी एक मुद्दा म्हणजे शोषणाविरुद्ध लढताना एजन्सीचा आहे. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पण, मग प्रश्न हा आहे की नागराज कुठून आलेला आहे? नागराज कोणत्या जात-वर्गातून आला आहे? मग, त्याचे नेतृत्व आम्हाला का मान्य होत नाही? महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या, आता इथे एजन्सी मुद्दा करून त्यांना निकालात काढणार आहोत काय आपण? झुंड सिनेमात ही विजय बोरसे हा प्रशिक्षक प्रत्यक्षात दलित ख्रिश्चन आहे. तो ही आपल्याला मान्य होत नाही, याचे आश्चर्य वाटते.

नागराजला निकालात काढण्यासाठी हुकमी एक्का म्हणून वापरला जाणारा मुद्दा आहे मार्केटचा, व्यावसायिकतेचा. पण, या महाभागांनी हे लक्षात घ्यावे की, मनोरंजन इंडस्ट्रीचे व्यवहारिक भांडवली गणित हे सोडवावेच लागेल. अन्यथा, तुम्ही तुमचा एक ही सिनेमा कधीच काढू शकणार नाही. आज जागतिक आर्थिक व्यवस्थेचा विस्तार असा आहे की, पृथ्वीचा प्रत्येक हिस्सा आता मार्केटच्या सावलीखाली आलेला आहे. मार्केटच्या कक्षेबाहेर कुणालाच राहता येणार नाही. नाही म्हणजे कुणालाच नाही. छातीवर कितीही इझमचे, क्रांतीचे बिल्ले लावले तरी त्यांनाही आज याच वित्तीय भांडवली व्यवस्थेत जगावे लागते, हे आधी शांतपणे समजून घ्यावे लागेल. शुद्धतेच्या कसोट्या लावून फेसबुकवर नागराजला नावे ठेवता येतीलही; पण या महाभागांना त्यांच्या दृष्टीने वाटत असलेला “परफेक्ट” सिनेमा तयार करता येईल का? बांधावर बसून हे असे चूक आहे ते तसे चूक आहे सांगणे लय सोपे आहे. मोबाईल स्क्रीनवर नुसती बोटं घासली की ते करता येते. पण, प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन या महाभागांनी एखादी चित्रपट निर्मिती करून पहिली, तर त्यांना ते किती पाण्यात आहेत याची जाणीव होईल असे वाटते. “सर्वज्ञ” मोड हा हिटलरचा मोड असतो!

असो! या महाभागांना एवढं मात्र जरूर सांगतो की, आज जी वित्तीय भांडवली व्यवस्था आपल्याला ज्यापद्धतीने विळखा मारून बसलेली आहे; ते पाहता मार्केटच्या पलीकडे जाऊन तुम्हाला चित्रपट निर्मिती करायचीच असेल, तर त्यासाठी एकतर तुम्हाला चंद्रावर किंवा मंगळावर जाऊन चित्रपट बनवावा लागेल आणि तिथेच तो रिलीज करायला लागेल! बरंच लिहिण्यासारखे आहे; पण शेवटी आज घडीला तरी एवढं मात्र सांगावे वाटते आहे की, भारतीय सिनेमाचा आंबेडकर नागराज अण्णाच्या रूपात जन्माला आलेला आहे. तो भारतीय सिनेमाचे लोकशाही संविधान लिहू पाहतो आहे, त्याला साथ देता आली नाही, तरी चालेल किमान त्याला नाउमेद करू नका!

– सचिन माळी

शाहीर, नवयान महाजलसा


       
Tags: JhundSachin Mali
Previous Post

“आगामी काळात कल्पक लढे उभारावे लागतील” – प्रकाश आंबेडकर

Next Post

शिर्डीत वंचितच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण !

Next Post
शिर्डीत वंचितच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण !

शिर्डीत वंचितच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण !

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
विशेष

सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे ...

February 15, 2025
शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!
विशेष

शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!

- आकाश मनिषा संतराम संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण ...

February 14, 2025
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म
सामाजिक

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली ...

February 14, 2025
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? ...

February 11, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क