“आजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचार-चळवळ” यावर एका संपादकीयात लिहीणे केवळ अशक्यच आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणात ज्या भूमिकांनी ’वंचित बहुजन समूह बाळसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र येवू लागला आहे; प्रस्थापितांच्या अनभिषिक्त तख्ताला हलवायला सुरुवात केली आहे” केवळ याच संदर्भात येथे लिहायचा प्रयत्न करणार आहे.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी १९८२-८३ पासून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. “सम्यक समाज आंदोलन, भारिप ते भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी” पर्यंत आज ३८ वर्षांपासून स्वतंत्र प्रज्ञा, सत्तेचे सामाजिक-राजकारण, लोकलढे करण्याचे धोरण व कार्यक्रम बाळासाहेब व सोबतचे सहकारी मिळून करत आले आहेत. त्यांचे समर्थपणे नेतृत्व करत आहेत. आंबेडकरोत्तर ’कॉंग्रेसवासी पारंपरिक रिपब्लिकन पक्षा” पेक्षा आपली मतपेटीतील मोठी ताकद दाखवित आहेत. त्याच वेळी फुले-आंबेडकरी मूलभूत तत्वांशी अजिबात तडजोड न करता या विचारधारेचा वर्तमानाच्या संदर्भात अन्वयार्थ लावत आहेत. प्रस्थापित सत्तेचे सामाजिक-राजकीय-आर्थिक चारित्र्य आणि त्यांच्या विचारसरणी, धोरण व कार्यक्रमांवर सडेतोड टीकाही करत आहेत.
यावेळी एका ऐतिहासिक प्रसंगाची आठवण येते. आजारी असतानाही दि. ३० सप्टेंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्लीतील घरी त्यांच्या अध्यक्षतेखाली “अखिल भारतीय शॆड्युल्ड कास्ट फेडरेशन’ च्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात एका ठरावाद्वारे ’अ. भा. रिपब्लिकन पार्टी’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा पाया हा भारतीय राज्यघटना असेल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्याचबरोबर आगामी निवडणुकांत ’कॉंग्रेस व्यतिरीक्त समान विचाराच्या पक्षांसोबत आघाडी” करण्याचा निर्णयही घेण्यात आला. नवीन पक्षाची उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी १९५५ पासूनच भारतीय राजकारणातील समविचारी काही प्रमुख व्यक्तिंशी बोलणी करायला सुरूवात केली होती.
प्रारंभी कॉंग्रेसला सक्षम विरोधी पक्ष उभा करण्याचा विचार होता. त्यासाठी प्रमुख सोशियालिस्ट पार्टीचे नेते डॉ. राममनोहर लोहिया, डि.व्ही. गोस्वामी, विमल मल्होत्रा, मधु लिमये, आदींशी पत्रव्यवहारही सुरू होता. त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळत होता.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर प्रथम पासूनच याच दिशेने प्रयत्न करत आहेत. जोतीराव ज्याला “स्त्रीशूद्रातिशूद्र ” म्हणतात; त्या सर्व वंचित बहुजन समूहाला सोबत घेवून बाबासाहेबांच्या स्वप्नातील ’राजकीय बहुसंख्या” उभारून सत्तेच्या दिशेने सावकाश का होईना; पण दमदार वाटचाल करताना दिसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य लढया दरम्यान आणि राज्यघटना स्वीकृतीनंतर पहिल्याच पाच वर्षांत सत्ताधारी कॉंग्रेसचे सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक आणि राजकीय चारित्र्य ओळखले होते. ऊच्चवर्णीय, जमीनदार, सरंजामदार, संस्थानिकांचे हितसंबंध जोपासणारी कॉंग्रेस होती. आज यांचेच वारसदार सत्तेचे सारे प्रमुख लाभ घेत, त्यासाठी वंचित बहुजन समूहाला गाजराची पुंगी देत; त्यांची एकी होवू नये व त्यांच्या सत्तेला कुणी आव्हान देवू नये म्हणून ’मरमर’ करीत आहेत. दोघे आजी-माजी सत्ताधारी कॉंग्रेस गट-संघ-भाजप वंचितांमध्ये जाती-धर्मावरून फूट पाडण्याचा कसोशिने प्रयत्न करत आहेत. पण, तुटपुंज्या का होईना राखीव जागांतून पुढे येणारी, अथक मेहनत आणि फुले आंबेडकरी शिक्षणाच्या जबरदस्त प्रेरणेमुळे वंचित बहुजनातील शिक्षीत पिढीचे मोठे आव्हान उभे राहत आहे. “व्यक्तिगत स्वार्थापेक्षा सा-या समाजाला सोबत घेवूनच हक्कांची, न्यायाची सत्ता” प्रस्थापनेचा अखंड ध्यास घेतलेले बाळासाहेब ’स्वबळावरच वंचित बहुजनांची पार ग्राम पंचायतीपासून पं.स., जि.प. पासून विधानसभा, लोकसभेपर्यंत सर्व जागा निवडणुका लढवत आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जसे एका बाजूला ’वंचित बहुजनकेंद्रित’ इतिहासाची चिकित्सा करत; दुस-या बाजूला पूर्वास्पृश्य जातींना संघटित करून आपला सामाजिक-राजकारणाचा हुकमी पाया रचत होते. आणि कुणीही काहिही, कितीही, कोणत्याही स्वरूपाचे अगदी स्वजात-धर्मातील कुणीही आरोप करो; आपले ध्येयावरील लक्ष विचलित न करता; शांतपणे, निर्धाराने चालत होते. त्याच निर्धाराने, उद्दिष्ट-गती व दिशेने, सारे आरोप झेलत, अजिबात लक्ष्य विचलित न करता अॅड. बाळासाहेब आंबेडकर आज वाटचाल करत आहेत. सर्व जाती-जमाती-धर्मांतील कष्टकरी, फुले-आंबेडकरी विचार-राज्यघटना संपूर्ण मान्य असलेले मोजकेच का होईना ब्राह्मण सहकारी, या भांडवली व्यवस्थेने विशेषत: जागतिक बाजारू मॉल-अर्थव्यवस्थेने बेजार झालेले छोटे व्यापारी, कष्टकरी-कोरडवाहू शेतकरी-शेतमजूर, आदि सर्वांना सोबत घेत आहेत. त्यांच्या हेतूंविषयी प्रारंभी कोणतीही शंका न घेता विश्वासार्ह संवाद, समन्वय साधत आहेत; संघटित करत आहेत.
हे सारे करत असताना डॉ. बाबासाहेब यांनी कामगारांसमोर बोलताना जे महत्वाचे सूत्र सांगितले होते; त्याचे भान डोक्यात ठेवून वाटचाल करत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते; भारतातील कामगार-वंचित बहुजनांसमोर मुख्य दोन शत्रू आहेत; “ब्राह्मणशाही व भांडवलशाही.” आज २०२१ मध्ये जागतिक परिस्थिती कितीही वेगाने बदलत असली तरी ऊच्च शिक्षण, नोक-यांच्या निमित्ताने ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही ’ग्लोबल” रूपाने-अधिक ’नफेखोर बाजार” रुपाने विकसीत होत आहे. त्यामुळे शत्रू अधिकाधिक मजबूत होत; नव्या झगमगाटी चेह-याने समोर उभा राहत आहे. कुणीही कबूल करो ना करो; पण केवळ पारंपरिक, अगदी प्रामाणिक भूमिका घेवूनही रूळलेले ट्रेड युनियन्सचे मार्ग, भांडवलशाहीला नामोहरम करण्यास अयशस्वी ठरत आहेत. त्यामुळे ते हतबल झालेले दिसताहेत. परिणामी मुंबईतील गिरणी कामगार युनियन्स जशा विरून गेल्या व लाखो वंचित बहुजन कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्यासाठी फुले-आंबेडकरी विचारसूत्रांच्या आधारेच वर्तमान परिस्थितीला काबूत आणणारी आपली धोरणे, संघटनांची मॉडेल्स विकसित करूनच कार्यक्रम आखावे लागतील. जसजसा मध्यमवर्ग, तुलनात्मकदृष्ट्या आर्थिक सुस्थितीतील वर्ग तयार होत जाईल तस तशी येथील राज्यसंस्था त्याच्यातील ’सुरक्षिततेच्या’ खोट्या भावनेचा फायदा घेत त्यांच्यातील लढाऊपणाचे स्फुल्लींग ठेचून काढत राहील. त्यामुळे मार्क्स म्हणतो तसे हा वर्ग एकटाच समाज क्रांतीचे वैचारिकतेसह नेतृत्व करेल ही कल्पना धूसर होत जाते. हा समुह तर सोबत आला पाहिजे. मग, याचाही गांभिर्याने विचार व्हायला हवा. केवळ राखीव जागा, बदली, बढतीचे प्रश्न घेवून काहीच साधणार नाही. खुल्या आर्थिक व्यवस्थेत -खाजकीकरणात या निष्प्रभ ठरत आहेत. हा वर्ग सतत सत्तेच्या ऊबेखाली राहू मागतो. त्यासाठी कमालीची वैचारिक घुसगळ करावी लागेल. ही ऐतिहासिक जबाबदारी कॉंग्रेस-रा.स्व.संघाच्या पोटातून न जन्मलेल्या व कॉंग्रेस-भाजपच्या खिशात न बसलेल्या फुले-आंबेडकरी वंचित बहुजन आघाडीलाच, फुले-आंबेडकरी विद्वत सभेलाच स्वीकारावी लागेल.
“सत्ताधारी जमात बना” असे सांगतानाच “निवडणूक जिंकणे वा न जिंकणे व सत्ता संपादन करणे” याबाबतीत डॉ. बाबासाहेबांची अत्यंत स्पष्ट भूमिका होती. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या निवडणुकीतील पराभवानंतर निराश कार्यकर्त्यांसमोर १९५४ ला ते बोलते होते. ते म्हणतात, “राजकारण हे पायरी पायरीने चढ घेत जाते. मी तर अपयशाची कधीच पर्वा केली नाही. केवळ निवडणुकीत जागा मिळविणे हे फेडरेशनचे ध्येय नव्हे. निवडणुकीद्वारे जागा मिळविणे हे एक साधन आहे. साध्य नव्हे. फेडरेशनचे साध्य-ध्येय नव्हे.” यानंतर त्यांनी शेवटी एक अत्यंत महत्वाचे विधान केले आहे, “फेडरेशनला अपयश येणे हे वा-याने झोडपलेल्या झाडासारखे आहे. त्यामुळे त्या फेडरेशनरुपी झाडाचे मूळच मरून गेले, असा अर्थ लावणे चुकीचे ठरेल.” आणि हे पचायला कितीही महाकठीण असले, तरी ते अत्यंत महत्वाचे आहे. प्रथमपासून नेमके बाळासाहेब असाच विचार करत आहेत. तसेच वागत आहेत. अत्यंत रोखठोक बोलत आहेत. त्यामुळे अनेकांना ते “हटवादी-अडवणुकखोर” वाटतात. ज्यांना वंचितच्या महाप्रवाहात “सत्तेचे हात धुवून घ्यायचे आहेत; त्यांनी खुशाल यावे. पण एकदा का ते आजी-माजी लबाड सत्ताधा-यांच्या पिशवीत जावून बसले की, संपतातच हाही इतिहास आहे. त्यांचा चोळा-मोळा करून फेकले जाते हा इतिहास आहे. मग ते कितीही मोठे ओबिसी वा अन्य कोणत्याही समाजातील स्त्री-पुरूष असोत. कारण आजी-माजी सत्ताधा-यांचे उद्दिष्ट बाळासाहेबांचे नेतृत्व नामोहरम करायचे आहे. म्हणून सम्यक-भारिप बहुजन महासंघ-वंचितपर्यंतच्या निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्त्यांवर खूपच मोठी जबाबदारी आहे. फुले- आंबेडकर यांची वैचारिक भुमिका, धोरण, कार्यक्रम आणि बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका-धोरण व कार्यक्रम निट समजून घेवून गाव-वाडी-तांड्यापर्यंत समजून सांगावे लागतील. तेथे भावनातिरेक अजिबात कामाचा नाही. कार्यक्रमांबरोबरच निरंतर वाचन, अभ्यास, शक्य असेल तर लेखन आणि निरंतर जनसंपर्क-संवाद-संघटनात्मक काम हवे. म्हणजे अशा “शिमग्या नंतरच्या पडझडी” चे काहीही परिणाम होणार नाहीत. कारण “शिमग्यानंतरच झाडांच्या पतझडीनंतर नवी, ताजी पालवी फुटत असते! त्यामुळे ज्यांना “वंचितमध्ये येवून, सभासद होवून, निवडणूक लढवून जिंकून यायचे व आजी-माजी सताधा-यांच्या बगलेत जायचेय; त्यांनी सावध राहायला हवे!
वंचित बहुजनांमध्ये जितक्या प्रमाणात सामाजिक-राजकीय जागृती होत जाईल; एकी-संघटन होत जाईल; त्यामुळे खालची सत्ता स्वबळावर जिंकत राहतील; तसतसे आजवर सोकावलेले, मस्तवाल आजी-माजी सत्ताधारी त्यांच्या पोतडीतील अधिकाधिक क्रूर अस्त्रे-शस्त्रे बाहेर काढत जातील. ते विविध मार्गांनी खोटा-नाटा प्रचार करतील. त्यात ’कॉंग्रेसप्रेमी पुरोगामी” समूह, मीडिया, साहित्यिक सहभागी होतील. यामागे त्यांचा हेतू आपणाला नामोहरम करण्याचा असतो. त्यामुळे आपण अजिबात डगमगता कामा नये. जसजसे तंत्रज्ञान विकसित होतेय; तसतसे त्यांचे हे मार्ग अधिक प्रभावी झाल्यासारखे वाटतील. पण, आपण शांतपणे, संयमाने, आपल्या सुनियोजित ध्येयापासून तसूभरही न ढळता कार्य करत राहणे हाच त्यांचा पहिला मोठा पराभव असणार आहे. त्यांच्याच मैदानात वंचित बहुजनांना त्यांना नामोहरम करायचे आहे.
आजचे राजकारण समजून घेवून वंचित बहुजनकेंद्रित सामाजिक-राजकारण करत असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार-चळवळ म्हणजे केवळ “सामाजिकता, जातीचाच विचार, केवळ बौध्द धम्म” असे सा-यांनी गृहीत धरूनच स्वत:ची समज, भाषण, लिखाण करीत असतात. हे साफ चुकीचे आहे. या पलीकडे व्यापक असे त्यांचे विचारविश्व आहे. बाबासाहेब जेव्हा एखादा विचार मांडतात; कृती करतात; तेव्हा त्यांची दृष्टी स्थानिकबरोबरच वैश्विक असते. ही परंपरा त्यांचे गुरू जोतीरावांचीच आहे. त्यांच्या “गुलामगिरी” ग्रंथात ब्रिटिशांना आपल्या ’ऐकण्यात” ठेवलेल्या येथील वर्चस्ववादी ब्राह्मण वर्ण-जातीची सर्व क्षेत्रांत चिरफाड केली आहे. किंबहुना त्यांचे प्रत्येक लिखाण हे या वर्ण-जातीला स्पर्श केल्याशिवाय पुढे जातच नाही. इतके त्यांनी ब्रिटिशांना आपल्या मुठीत ठेवून सत्तेचे पुरे फायदे घेतले. येथील ’स्त्रीशूद्रातिशूद्र’ यांवर त्यांचे वर्ण-जाती वर्चस्व अबाधित ठेवले. त्यांचा “गुलामगिरी” ग्रंथ जोतीरावांच्याच शब्दात सांगायचे तर ’In the civilised British Goverment UNDER the cloak of BRAHMANISM” यांना उघडे पाडणारे जोतीराव गोविंदराव फुले यांची अर्पणपत्रिकाही अशीच वैश्विक संदर्भ असलेली आहे. “युनैटेड स्टेट्स मधील सदाचारी लोकांनी गुलामांस दस्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात औदार्य, निरपेक्षता, व परोपकार बुद्धी दाखविली यास्तव त्यांच्या सन्मानार्थ हे लहानसें पुस्तक“ अर्पण केले आहे. ’जगातील कामगारांनो एक व्हा’ ही कार्ल मार्क्स ची प्रसिध्द घोषणा आणि १४८ वर्षांपूर्वी जोतीराव भारतातील ब्राह्मणशाही विरुध्दचा लढा जगातील गुलागिरीविरुध्दच्या लढ्याशी आपले नाते स्पष्टपणे सांगतात. याचे महत्व खूपच आहे.
जेव्हा बाबासाहेब “गांवकीची कामं सोडा, गांव सोडा आणि शहराकडे चला” असं म्हणतात; तेव्हा प्रथमदर्शनी जे दिसते, तसे नाही. त्यामागे तत्कालीन जागतिक भांडवलशाहीचा विकासाचा वेग, दिशा कशी आहे. त्यातील शक्ती आणि त्याचबरोबर तिच्या मर्यादा यांची एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून पुरेपूर जाण बाबासाहेबांना होती. मुंबईसारखी औद्योगिक शहरे जन्माला येत होती. हळूहळू मुंबईत १३० कापड गिरण्या उभ्या राहिल्या. ब्रिटीश देशभर रेल्वेचे जाळे उभारत होते. पोस्ट, गोदी, नगरपालिका, आदी उभ्या राहत होत्या. अधिक कष्टाची कामं जी अन्य कुणीही करणार नाहीत; ती “माझी” माणसं करतील. यात आपला हा अस्पृश्य माणूस सामावून घेतला जाईल. व त्यांना हुकमी रोजगाराचे साधन उपलब्ध होईल हे त्यांना पक्के माहीत होते. आज शंभरावर वर्षानंतर हे १००% खरे असल्याचे दिसतेय. किंबहुना एकेकाळचा हा कामगार अनेक ठिकाणी अपरिहार्य ठरला आहे. ताठ मानेने उभा आहे. डॉ. बाबासाहेबांची ही अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रतिमा सर्वांनी दाबून ठेवली. बाबासाहेबांची ही घोषणा व पुढे आजही परिणाम घडविणारी ऐतिहासिक घोषणा “greek renaissance” च्या तोडीची एक ऐतिहासिक प्रक्रिया आहे.
१ एप्रिल, १९३५ रोजी ’रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया’ चा ’फाऊंडेशन दिवस’ मानला जातो. ब्रिटीश भारतात आल्यावर भांडवलशाहीचा विकास होत असतानाच, भारतासारख्या विखुरलेल्या देशात ’पारंपरिक निष्ठूर सावकारशाही दुबळी होत जाणार’ हे त्यांना माहीत होते. अशावेळी ज्या विविध संस्था उभारायला हव्यात; त्यात विविध बॅंकांची सर्वोच्च धोरण, नियंत्रण करणारी ’आरबीआय’ ही संकल्पना करणारे अर्थशास्त्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरच. पण, या स्वरुपाचा साधा धडा पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रम आखणा-या मंडळींनी समावेश केला नाही. कारण सारे वर्चस्व प्रथमपासूनच संघीयांचे. पण, त्याचवेळी “दलीतांचे बाबा” हा धडा मात्र न विसरता समाविष्ट केला गेला! बाबासाहेबांसह सा-या ब्राह्मणी शक्तींच्या विरोधी समतावादी प्रेरणादात्यांना त्यांच्या त्यांच्या जाती-जमाती पोटजातीत बदिस्त करायचा मोठा प्लान या शक्तिंचा होता. आजही आहे. याला जबाबदार उघडपणे सत्ताधारी कॉंग्रेस आणि त्यांच्या पदराखाली झाकून ठेवलेले ब्राह्मणी संघीय! सारे पुरोगामी!
यामागेही जोतीरावांच्या ’गुलामगिरी’ तीलच वृत्ती काम करीत आहे. त्यांना साथ मिळाली आहे; आजच्या ’क्षत्रिय वृत्तीच्या” सत्ताधा-यांची. जोतीराव फुले यांनी प्रथम १५२ वर्षांपूर्वी “छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा” लिहीला. खर तर ’कुणबी’ शिवाजी सा-या जगाला सांगितला आणि “गोब्राह्मण प्रतीपालक” ही खोटी-ब्राह्मणी प्रतिमा पुसून काढली. तरिही स्वातंत्र्यानंतरच्या राजकर्त्यांनी एक महत्वाचे धोरण अवलंबले आहे. शासनात ’क्षत्रीयवृत्तीची मूठभर मराठा घराणी आणि प्रशासनात त्यांनी सुरक्षितताप्रदान केलेली मनुस्मृतीसमर्थक ब्राह्मण वर्ण-जात’. याच “ब्राह्मो-क्षत्रिय” युतीने आजवर जोतीरावांच्या शिवाजीविरोधात जाणीवपूर्वक ब. मो.पुरंदरेंसारख्या ब्राह्मणी इतिहासकारांना पोसले-मोठे केले. आमच्या ओबिसींसह सा-यांच्या माथी मारले. राखीव जागांची घटनात्मक तरतूद असतानाही अनुसूचित जाती-जमाती-ओबिसी समूहांतील लायक उमेदवारांना तेथे डावलून मोठ्या प्रमाणावर संघ-जनसंघ-भाजपची माणसे प्रशासनात नेमायची मुख्य जबाबदारी माजी सत्ताधारी “धर्मनिरपेक्ष कॉंग्रेस” चीच आहे हे आपण विशेषत: ओबीसींनी डोक्यात घेतले पाहिजे. यामागचे सत्य राजकारण समजण्यासाठी फुले-आंबेडकरांशिवाय पर्यायच नाही. ती विचारपध्दती समजून घ्यावी लागेल. किंबहुना विकसित करावी लागेल. कारण यातील धोका आहे; क्षत्रियवृत्ती बाजूला करुन सरसकट ब्राह्मण वा मराठा वा एखाद्या धर्म-जातींना टार्गेट केले जातेय. फुले-आंबेडकरी विचारधारेत कधीही, कोणत्याही एका जाती-धर्माला विरोध नाही. विरोध आहे तो “ब्राह्मणी धर्माला-मनुस्मृतीला”. “सम्यक, समतावादी दृष्टिकोण ही फुले-आंबेडकरी विचारधारेची खासियत आहे.” हा समतोल कधिच ढळता कामा नये. त्यासाठी खास आयोजित प्रशिक्षण शिबीरातून सर्वांना जावेच लागेल. फुले-आंबेडकरवादी पक्ष-संघटना विशेषत: बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्ष-संघटनांच्या भुमिकेनुसार समाजवादी-साम्यवादी आपले नैसर्गिक मित्र नक्कीच आहेत. पण मार्क्सवादी इव्वळ वर्गीय दृष्टिकोणातुन आताच्या राजकारणातील “ब्रा्ह्मो-क्षत्रिय” युतीची गुंतागुंत उलगडताच येणार नाही. एका बाजुला “सिव्हीलाइझ्ड ब्रिटीश” असे म्हणणारे जोतीराव फुले, त्याचवेळी ब्रिटीशांच्या शेतकरी-शेतमजुर, आदिवासी-धनगरादी समूहांच्याविरोधी कृषी व वन धोरणांना त्यांच्या “शेतक-याचा असूड” या महत्वाच्या ग्रंथात सडेतोड विरोध करतात. किंबहुन ’फॉरेस्ट खते’ जाळून टाका असे म्हणतात. वरकरणी हा अंतर्विरोध फुले-आंबेडकरी दृष्टिकोणाशिवाय समजून येतच नाही. डॉ. बाबासाहेब, त्यांचे ज्येष्ठ सहकारी दादासाहेब गायकवाड आणि आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील जमीन हक्कांच्या विविध आंदोलनांविषयी असेच पूर्वग्रहदूषित दृष्टिकोणातूनच पाहिले गेले. किंबहुना त्यांचा चुकूनही उल्लेख ना अन्य राजकीय पक्ष-संघटना करत ना ’एनजिओ’ करत, ना अभ्यासक करत! वास्तविक ही सर्व यशस्वी लोकआंदोलनं “नैसर्गिक संसाधनांवरील” स्त्रीशूद्रातिशूद्रांच्या समान हक्कांची आंदोलनं होती. पण कमालीचा आदर ठेवून म्हणेन काही “पॉकेट्स” मधील मर्यादीत हिंसाचारी आंदोलनकारींनाचे जेवढे कौतुक केले जातेय; दखल घेतली जातेय; त्याची तुलना करता गावागावांतील या व्यापक-विस्तृत फुले-आंबेडकरी या आंदोलनांना ब्राह्मणी इतिहासकार-अभ्यासक या सा-यांनी मुद्दाम डावलले. हे पण ’त्यांचे’ एक राजकारणच आहे. म्हणून आपण फुले-आंबेडकरवाद्यांनाच आपला चळवळींचा इतिहास नव्याने लिहायला हवा. एकूणच भारतीय इतिहासाचा नव्याने अर्थ-अन्वयार्थ लावावा लागेल.
जोतीरावांचा ब्राह्मण विधवा स्त्रियांच्या केशवपनाविरुध्दचा न्हाव्यांचा ऐतिहासिक संप, डॉ. बाबासाहेब यांचा खोतीविरुध्दचा लढा, वा कामगारांचे लढे आणि पूर्वास्पृश्य समूहांचे उघड-उघड ब्राह्मणशाहीविरोधातील सारे लढे एका व्यापक सामाजिक-राजकीय नितीचा भाग होते. भारतीय ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही विरोधात वर्ण-जातीयपातळीवर ’स्त्रीशूद्रातिशूद्र’ म्हणजे आताच्या भाषेत अनुसूचित जाती-जमाती-ओबिसी यांच्या भक्कम एकजुटिचेच व्यापक-दीर्घकालीन धोरण होते. हीच राजकीय एकजुट येथील प्रस्थापीताला भक्कमपणे रोखून सत्तेवर जावू शकते हे बाबासाहेबांना पुरेपूर माहीत होते. ते केवळ राज्य-अर्थशास्त्राचे अभ्यासकच नव्हते तर ते क्रियाशील विचारवंतही होते. म्हणून congress आणि रा.स्व. संघाला एकमेकांची भिती कधीच नव्हती. आताही नाही. आणि आता (औपचारिकरित्या) सत्तेवर आल्यावर तर अजिबात भिती वाटत नाही. दोघांनाही खरी भिती वरील चार समूहांच्या सामाजिक-राजकीय शक्तींची वाटतेय. बाबासाहेबांच्या फुले-आंबेडकरांच्या विचारविश्वातील स्फोटक शक्तिची-विचारांची. राजकीयदृष्ट्या ही ओबिसी-बारा बलुतेदार-कारागीर समूहांची शक्ती बाळासाहेबांसोबतच्या सामाजिक शक्तीला मिळू नये व तिचे एका बहुसंख्य राजकीय शक्तीत रुपांतर होवू नये यासाठी सारी हयात आजी-माजी सत्ताधारी घालवत आहेत. आणि ही शक्ती मिळू लागताच वा एखाद-दुसरा निवडून येताच; त्याला आपल्या खिशात कसे घालायचे याचे सारे नियोजन कॉंग्रेस गट-भाजप कसोशीने खबरदारी घेत आहे.
बाबासाहेब यांच्या विचार, विचार पद्धती, चळवळीचे प्रश्न आणि लढ्याचे मार्ग यात प्रस्थापित शोषणकारी विचारसरणीला उखडून टाकायची तत्वे दिसतात. याचाच अर्थ अधिक विषद करून सांगायचे तर वांशिक, वर्ण-जात-वर्ग-पुरुषी ब्राह्मणी-भांडवली विस्तारवादी, साम्राज्यवादी शोषक समूहातील काही माणसे सुटीसुटी अशा व्यवस्थेच्याविरोधात उभी राहू शकतील, पण या वर्चस्ववादी समूहातील व्यक्ती या चळवळीचे नेतृत्व करू शकत नाही. कारण अशा ब्राह्मणी शोषणकारी व्यवस्थेला उखडणे म्हणजे “त्या” व्यक्ती व समूहाला त्याचे पारंपारिक सर्व अधिकार, लाभ सोडावेच लागतील. आणि नव्या न्यायी व्यवस्थेची उभारणी करावी लागेल. यात उलथापालथी प्रचंड असतील. त्याची तुलना वादळ, महापूर, त्सुनामी यांच्याशीही करता येणार नाही. कारण खरा प्रश्न आहे; बाबासाहेब ‘Annihilation of Castes’ या न झालेल्या भाषणात म्हणतात “ती वर्चस्ववादी, अवैज्ञानिक, ब्राह्मणत्वाची “NOTION” कशी नष्ट करणार हे महत्वाचे. वर्गीय क्रांती, भौतिक बदल झाले; तरिही “ती” कायम राहते. तिच्या भौतिक शक्ती म्हणजे “ब्राह्मणी वर्चस्ववादाची सारी मोक्याची ठिकाणे ब्राह्मण समुहानेच नाकारणे आणि तेच आजवर पुरोगाम्यांना जमलेले नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजनांनी यावे ही भावना जोपर्यंत शिल्लक आहे. तोपर्यंत हे शक्य होईल असे वाटत नाही. ती ’नोशन’ जायला लागली हे म्हणता येणार नाही. भारतियांसाठी ती ’लिटमस’ टेस्ट आहे.
“आजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचारधारा” यावर अधिक तपशिलात लिहावे लागेल. शेवटी समतेचे प्रेरणादाते जोतीराव-सावित्री फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करुन येथेच थांबतो. जयभिम!
शांताराम पंदेरे