१४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतावादी बौद्ध धम्माचा स्विकार केला. या धर्मांतरावर तेव्हा देशातल्या हिंदुत्वाद्यांनी प्रचंड टीका केली होती, सावरकारांसारख्या हिंदुत्वाद्यांनी तर धर्मांतराची खिल्ली ऊडवण्याचा प्रयत्न केला होता. सावरकर व त्यांच्यासारख्या टीकाकारांना बाबासाहेबांनी जाहीरपणे खुल्या चर्चेचे आव्हान दिले होते. पण, सोबतच या धर्मांतरावर स्वत;ला पुरोगामी घोषित करणा-या डाव्यांनी सुद्धा अनेकदा टीका केली आहे, प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
४ वर्षांपुर्वीचा मार्क्सवादी समर्थकाने लिहिलेले लेख १४ ऑक्टोबर धर्मांतर दिनाचे औचित्य साधून काही जणांनी समाजमाध्यमात नुकताच व्हायरल केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची स्ट्रॅटजी चुकली, बाबासाहेब जिवंत असते तर त्यांनी ती चूक सुधारली असती पण आंबेडकरवादी ती चूक सुधारत नाहीत असा दावा करुन आंबेडकरवादी पोथीनिष्ठ असल्याचा आरोप सदर लेखात करण्यात आला आहे. धर्मांतरावर कम्युनिष्ट छावणीतुन टिका होणे ही गोष्ट काही नवी नाही. डाव्यांचा धर्माबद्दल असलेल्या मतांचा उगम ख्रिस्ती धर्माच्या अनुभवावर बेतलेला आहेत यावर “बुद्ध कि कार्ल मार्क्स” निबंधात बाबासाहेबांनी चर्चा केली आहे.
कम्युनिष्ट विचारवंत धर्मांतरामागच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश्याविषयी जाणिवपुर्वक संभ्रम निर्माण करतात. अस्पृश्यांवरील अत्याचार दुर करण्यासाठी बौद्धराष्ट्रांनी मदत करावी ही अपेक्षा खरी न ठरल्याचा सांगत धर्मातराची स्ट्रॅटजी चुकली असा दावा करतात. पण धर्मांतरामागच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भुमिकेच आकलन केले तर असे दिसुन येते कि सवर्ण हिंदूंकडून केल्या जाण-या अन्याय-अत्याचाराविरोधात बौद्धराष्ट्रांकडून मदत मिळवणे हे धर्मांतराचे अनेक उद्दीष्टांपैकी एक तात्कालिक ऊद्दीष्ट असले तरी ते धर्मांतराचे एकमेव उद्दीष्ट मात्र कधीच नव्हते. मुक्ती कोण पथे? भाषणाचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर अत्त: दिप भव: या भगवान बुद्धांच्या संदेशाने करतात आणि अस्पृश्यांना स्वत:च स्वत:चा आधार व्हा असे आवाहन करतात. धर्मांतराचा तात्कालिक प्रमुख ऊद्देश हा अस्पृश्यांची मानसिक गुलामी दुर करुन आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना मानसिकदृष्ट्या बलवान करणे, एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वत:च्या गुणांची, विकासाची संधी प्राप्त करणे हा होता. धर्मांतर करताना बाबासाहेबांना अस्पृश्य समाजाला दैववादी बनवायचे नव्हते तर त्यांना अस्पृश्यांमधे बुद्धीप्रामाण्यवाद, विज्ञानवाद आणि लोकशाहीवाद पेरायचा होता. बाबासाहेब धम्माकडे समाज संगठन करण्याची नैतिक शक्ती म्हणून पाहातात, धर्मांतराकडे साध्य नाही तर समतावादी, विज्ञानवादी, लोकशाहीवादी नीतीमान समाज निर्मितीचे साधन म्हणून पाहतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा साम्यवादी ऊद्दीष्टांना विरोध नव्हता तर विरोध हा कम्युनिष्टांच्या साम्यवाद प्रस्थापित करण्याच्या साधनांना होता. कारण जगातील दु:ख, दैन्य, शोषण दुर करणे याबाबत धम्म आणि साम्यवाद याच्यात एकमत आहे. ईतकेच नव्हे तर भिक्खुंना केवळ ७ वस्तुं बाळगण्याची परवानगी देणा-या भगवान बुद्धांना बाबासाहेब अधिक कठोर साम्यवादी ठरवतात. तेव्हा प्रश्न साध्याचा नसुन साधनांचा आहे. साम्यवादी त्यांचे ऊद्दीष्ट साध्य करण्यासाठी हिंसा आणि कामगारांची हुकूमशाही यांचा साधन म्हणुन वापर करतात तर भगवान बुद्ध मानसिक परिवर्तनावर भर देतात. बळाच्या जोरावर झालेले बदल हे जो पर्यंत बाहेरुन बळ लावले जात आहे, जोर-जबरदस्ती केली जात आहे केवळ तो पर्यंतच टिकून राहतात. हे बळ कमी पडले, समाप्त झाले कि परिस्थिती पुर्ववत होते. हे बदल बळाच्या वापरावीना दिर्घकाळ टिकून राहावेत, शाश्वत असावेत असे वाटत असेल तर ते बदल समुहाच्या मानसिक परिवर्तनातुन घडणे आवश्यक असते पण केवळ मानसिक परिवर्तनातुन घडलेले बदल शाश्वत नसतात. ते बदल जोपर्यंत व्यक्ती आणि समुहाच्या जाणिव आणि नेणिवेचा भाग बनत नाहीत तोपर्यंत बदल शाश्वत नसतात. जाणिव-नेणिवेच्या पातळीवरचे बदल हे सभ्यतेतुन(culture) निर्माण होतात आणि धर्माचा सभ्यतेवर(culture) प्रचंड प्रभाव असतो. धार्मिक क्रांतीनंतर सांस्कृतिक क्रांती व मग राजकीय क्रांती घडत असते असा जगभरचा अनुभव आहे. भारतात शाश्वत क्रांती घडवण्याची क्षमता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केवळ बौद्ध धम्मात दिसली. त्या शाश्वत क्रांतीसमोर बौद्ध राष्ट्रांकडून मदत मिळवणे हा मुद्दा गौण ठरतो.
बौद्ध राष्ठ्रांमधे सगळचं काही आलबेल आहे अश्यातला भाग नाही नाही. एक आदर्श नैतिक समाज निर्माण करण्यात ही राष्ट्रे अपयशी ठरली आहेत कारण या राष्ट्रांमधे प्रचलित धम्मात दैववाद, अंधश्रद्धा बोकाळल्या आहेत. त्यामुळे जपान, थायलंड या देशांचे ऊदाहरण देऊन धर्मांतरला चुकिचे ठरवता येत नाही. धम्मात बोकाळलेल्या अंधश्रद्धा, दैववाद दुर करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची सद्यकाळाशी सुसंगत अशी विज्ञानवादी, लोकशाहीवादी पुनर्मांडणी “Buddha and his Dhamma” ग्रंथात केलेली आहे. ज्या प्रमाणे भारतिय घटनेत मुलभुत तत्वांना धक्का न लावता काळानुसार बदल करण्याची तरतुद घटनाकारांनी संविधानात केली आहे तशीच तरतुद २५०० वर्षांपुर्वी भगवान बुद्धांनी धम्मात काळानुसार आवश्यक ते बदल करण्याची तरतुद केली आहे. त्यामुळेच धम्म हा सनातन म्हणजेच नित्य नुतन आहे. भविष्यात या बौद्धराष्ट्रांना व तेथील जनतेला जेव्हा हे कळून चुकेल की ते आचरणात आणत असलेला दैववादी, अंधश्रद्धायुक्त धम्म काळाच्या कसोटीवर कुठेतरी कमी पडतोय, जेव्हा त्यांना धम्माचा पुनर्शोध घ्यावासा वाटेल तेव्हा त्यांना त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी लिहीलेल्या “Buddha and his Dhamma” या ग्रंथाकडे वळावेच लागेल.
मार्क्सवादी विचारवंत, कार्यकर्ते आणि समर्थक आंबेडकरवाद्यांवर पोथिनिष्ट असल्याचा जो आरोप करतात तो अत्यंत हास्यास्पद आहे. मुळात आंबेडकरवादाची दास कॅपिटल प्रमाणे एक विशिष्ट अशी कोणतीही पोथी नाही. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणातुन समतावादी, लोकशाहीवादी मूल्ये, तत्व(principles) वारंवार पुढे येत असतात. आंबेडकरवादी स्वत:च्या आकलनानुसार या तत्वांचा (Principles) शोध घेत असतात. त्यातल्या अनेक मुद्दयांवर एकमत होउन आंबेडकरवाद, आंबेडकरवादी आणि आंबेडकरवादी चळवळ पुढे सरकत असते. त्यामुळे ही चळवळ पोथिनिष्ठ नसून उलट अधिक diverse आणि vibrant झाली आहे. त्यामुळे डाव्या विचारवंतांकडून बौद्ध राष्ट्रांनी भारतातील बौद्धांना मदत न करणे, आणि दुस-या महायुद्धात जापानने केलेली हिंसा व थायलंड मधे हजारो मुलींना वेश्या-व्यवसायात ढकलून देण्याचे उदाहरण देत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची स्ट्रॅटजी चुकली हा दावा आणि आंबेडकरवाद्यावर केलेले पोथीनीष्ठतेचे आरोप,बिनबुडाचे आणि केवळ आकलनाच्या अभावातुन केलेले आहेत हे स्पष्ट होते. अश्या प्रकारच्या आरोपांनी विचलीत न होता बौद्धांनी आपले लक्ष भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नीतीमान समाजाच्या स्थापनेच्या दिशेने कार्यरत राहणे हेच या आरोपांना खरे ऊत्तर असणार आहे.