शनिशिंगणापूर – श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारनिमित्त शनिशिंगणापूर मंदिरात शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली.
पहाटेपासूनच विविध भागातून आलेल्या भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी विशेष महत्त्व असते. यंदा शनिवार आणि अमावस्येचा संयोग झाल्याने या दिवशी शनिदेवाच्या कृपेसाठी मोठ्या प्रमाणावर भक्तांनी नित्य पूजा, अभिषेक, तेल अर्पण, व्रतवैकल्ये यांचा संकल्प घेतला.
मंदिर प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था केली असून, सीसीटीव्ही, स्वयंसेवक आणि वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. वाहतुकीसाठी पार्किंगची स्वतंत्र सोय आणि पाणी व प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमुळे परिसरात यात्रेचे वातावरण निर्माण झाले आहे.