पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या म्हणजे शिवजयंती स्मरणार्थ १९ फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे.
शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले अशी आख्यायिका आहे. त्यानुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. शिवराय यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या.
शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.
शिवाजी महाराज हे भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी भोसले हे (१५५२-१५९७) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते, त्यांना “राजा” ही उपाधी सुद्धा देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे आणि देशमुखी हक्क देण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला होता. इ.स. १६३६ मध्ये विजापूरच्या आदिलशाही सल्तनतने दक्षिणेकडील राज्यांवर आक्रमण केले. ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे पश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशातील सरदार होते आणि आदिलशाहीला मदत करत होते. शहाजीराजे हे जिंकलेल्या प्रदेशातील जहागीरच्या बक्षिसाच्या संधी शोधत होते, ज्यावर ते वार्षिक कर वसूल करू शकत होते. शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलांविरुद्ध केलेल्या मोहिमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या आणि मुघल सैन्याने शहाजीराजांचा सतत पाठलाग केला म्हणून शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागले. १६३६ मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले, त्यांना पुण्याची जहागिरी मिळाली. शहाजीराजांनी पुढे तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला म्हणून लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या पुढे तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी आणि व्यंकोजी ह्या पुत्रांनी सध्याच्या तामिळनाडू मधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
शिवाजी महाराजांना घेऊन जिजाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोरला शहाजीराजांना तैनात केले होते. १६४७ नंतर जिजाईंनी संपूर्ण राज्याचा कारभार शिवरायांच्या हाती दिल्यानंतर शिवरायांनी पहिल्या मोहिमेद्वारा थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले.
जिजाई पुण्यात रहायला गेल्या, त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात.
विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठी साम्राज्याची स्थापना केली. आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंडाची कुतुबशाही, विजापूरची आदिल शाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्यानेसुद्धा बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र लढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची गरज व महत्व :
शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळविली होती. परंतु औपचारिक पदवी नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते मुघल जमीनदार किंवा विजापुरी जहागीरदाराचे पुत्र होते; ज्याला त्याच्या वास्तविक प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार व अधिकार नव्हता. कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते, त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे हे अशक्य होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते, आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. इतर मराठा राज्यांना, ज्यांच्याशी शिवाजी राजे हे तांत्रिकदृष्ट्या समान होते, त्यांच्या आव्हानांना देखील ही राजेशाही पदवी रोखू शकत होती. याबरोबरच राज्याभिषेकामुळे शिवराय हे हिंदू मराठ्यांना मुस्लिम शासित प्रदेशात एक सहकारी हिंदू सार्वभौम प्रदान करू शकत होते. सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती. असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या दृष्टीने अजूनही शिवाजीराजे भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश जाणे गरजेचे होते.
वरील सर्व कारणांमुळे शिवाजी महारजांनी रीतसर व कायदेशीर साम्राज्याचा राजा होण्यासाठी राज्याभिषेक विधी करून घेण्याचे ठरविले. यासाठी ब्राम्हण लोकांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्या साठी भरपूर अडचणी आणल्या, विधी करण्यासाठी भरपूर प्रमाणात पैसे शिवाजी महाराजांकडून घेतले असे असून सुद्धा काही ब्राम्हण वर्गाने शिवाजी महाराजांच्या ह्या राज्याभिषेकाला मान्यता दिली नाही किंवा शिवाजी महाराज हे राज्याचे अधिकृत राजे आहेत हे मान्य करण्यास नकार दर्शविला आणि चातुर्वर्णमध्ये ब्राम्हण वर्ण हा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. चातुर्वर्ण पद्धतीमुळे शिवाजी महाराजांना आपण आपल्या राज्याचे अधिकृत राजे आहोत हे सिद्ध करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, तर सामान्य जनतेचा संघर्ष काय व कसा असेल हे चित्र स्पष्ट होते?
शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक :
प्रस्तावित राज्याभिषेकाची तयारी ही १६७३ मध्ये सुरू झाली. तथापि, वादग्रस्त समस्यांमुळे राज्याभिषेकाला जवळपास एक वर्ष उशीर झाला. शिवाजी राजांच्या दरबारातील ब्राम्हणांमध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी वाद निर्माण झाला. त्यांनी शिवरायांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण, हा दर्जा हिंदू समाजातील क्षत्रीय (योद्धा) वर्णांसाठी ब्राम्हणांनी राखीव ठेवला होता. शिवराय हे शेती करणाऱ्या गावांच्या प्रमुखांच्या वंशातून आले होते आणि त्यानुसार ब्राह्मणांनी त्यांना शुद्र (शेती करणारा) वर्णाचे म्हणून वर्गीकृत केले. त्यांनी नमूद केले की शिवरायांनी पवित्र धाग्याचा समारंभ कधीच केला नव्हता आणि जो धागा क्षत्रिय घालतात, तो कधीच घातला नव्हता.
प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीलाच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती. शिवाजी महाराजांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच हिंदू शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता. शिवाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना ‘क्षत्रिय’ जाहीर करून झाला, तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली. शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव ‘गागाभट्ट’ असे होते आणि ते तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होते. गागाभट्ट यांच्यानुसार शिवाजी भोसले यांना क्षत्रिय दर्जा लागू करण्यासाठी, एक पवित्र धागा समारंभ करणे गरजेचे होते आणि क्षत्रियाकडून अपेक्षित वैदिक विधींनुसार त्यांच्या जोडीदाराशी पुनर्विवाह करणे महत्वाचे होते तरच हिंदू शास्त्रांनुसार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कारता येऊ शकत होता.
सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट हे शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले आणि महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्ट यांचे जंगी स्वागत केले व गागाभट्ट या ब्राम्हणाला मोठी दक्षिणाही दिली. २८ मे रोजी, शिवरायांनी क्षत्रिय संस्कारांचे पालन करण्यासाठी तपश्चर्या केली. मग त्यांना गागाभट्ट यांनी पवित्र धाग्याने गुंतवले. इतर ब्राह्मणांच्या आग्रहास्तव, गागा भट्ट यांनी वैदिक मंत्र सोडला आणि शिवाजीराजांना ब्राह्मणांच्या बरोबरीने ठेवण्याऐवजी दोनदा जन्मलेल्या जीवनाच्या सुधारित स्वरूपात दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी, शिवरायांना स्वतःच्या हयातीत जाणूनबुजून किंवा अपघाताने केलेल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी उपस्थित ब्राम्हन्नांकडून सांगण्यात आले. सोने, चांदी आणि तलम तागाचे कापड, कापूर, मीठ, साखर इत्यादी सात धातूंसह त्यांचे स्वतंत्रपणे वजन केले गेले. या सर्व धातू व वस्तूंसह एक लाख हून (सोन्याची नाणी) ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आले. पण यातूनही ब्राह्मणांचा लोभ भागला नाही. ब्राह्मणांच्या म्हणण्यानुसार, शिवाजीराजांनी छापे टाकताना, ब्राह्मण, गायी, स्त्रिया आणि मुले यांचा मृत्यू झाला, तसेच शहरे जाळली आणि त्यांना या पापातून ८,००० रुपये किंमत देऊन शुद्ध केले जाऊ शकते म्हणून शिवाजी महाराजांना ही रक्कम देण्यासाठी भाग पाडण्यात आले. शिवाजी महाराजांनी संमेलनाचे भोजन, सामान्य भिक्षा, सिंहासन आणि दागिने यासाठी केलेला एकूण खर्च १.५ दशलक्ष रुपयांपर्यंत पोहोचला.
Haa६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवाजी महाराजांचा मराठी साम्राज्याचे (हिंदवी स्वराज्याचे) राजे म्हणून राज्याभिषेक झाला. हिंदू कॅलेंडरमध्ये तो दिवस १५९६ मध्ये ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या १३ व्या दिवशी (त्रयोदशी) होता. गागा भट्ट यांनी यमुना , शिंधू, गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, आणि कावेरी या सात पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रातून शिवाजीराजांच्या डोक्यावर पाणी ओतले आणि वैदिक राज्याभिषेक मंत्रांचा उच्चार केला. शिवाजीराजांनी आई जिजाई यांना नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांना स्पर्श केला. सोहळ्यासाठी रायगडावर जवळपास पन्नास हजार लोक जमले होते. शिवाजी महाराजांना शककर्ता (“युगाचासंस्थापक”) आणि छत्रपती(“सार्वभौम”) असे नाव देण्यात आले. त्यांना हैंदव धर्मोद्धारक (हिंदू धर्माचे रक्षक) ही पदवी देखील देण्यात आली. राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले तसेच पंचांग शुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कडून ‘करणकौस्तुभ’ नामक ग्रंथही लिहवून घेतला.
शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक:
१८ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांची आई जिजाई यांचे निधन झाले. मराठ्यांनी निश्चल पुरी गोस्वामी या तांत्रिक पुजारीला बोलावले, ज्याने घोषित केले की, मूळ राज्याभिषेक अशुभ ताऱ्यांखाली झालेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका केलेल्या आहेत आणि विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत. त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ pp oooooबारा दिवसांनी राजमाता जिजाई यांचा मृत्यू इत्यादी घटना घडल्या. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की, वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये होते. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत होते आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला.
त्यानुसार २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दूसरा राज्याभिषेक करण्यात आला. गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी रोजी करून घेतला. झालेल्या या दुसऱ्या राज्याभिषेकाचा दुहेरी उपयोग त्या लोकांसाठी असा की, ज्यांचा अजूनही असा विश्वास होता की, शिवाजीराजे त्यांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या वैदिक विधींसाठी पात्र नव्हते, म्हणून त्यांनी कमी-प्रतिस्पर्धी अतिरिक्त सोहळा पार पाडून राज्याभिषेक केला. महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकामुळे अश्या लोकांचे जरी समाधान झाले असले, तरी चातुर्वर्ण व्यवस्था किंवा जाती व्यवस्था ही समाजातील सर्व घटकांसाठी कशी घातक आहे याची प्रचीती येते. अडीच हजार वर्षापूर्वी बौद्ध धम्म भारतामध्ये वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे बौद्ध धम्माने नाकारलेली वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्था, जे नाकारण्याची प्रत्येक शतकामध्ये गरज होती आणि ती आज सुद्धा आहे.f
शिवाजी महाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते ते अजिंक्य असा लढवैय्या पुरुष होते, राज्यकारभाराची कला त्यांना अवगत होती. स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल जाज्वल्य अभिमान यामुळे शिवाजी महाराज हे लोक कल्याणकारी राजा होते. शिवाजी महाराज म्हणजे भारतीय राष्ट्रीयत्वाचा अविष्कार होय. महाराजांनी बहुविध माणसे गोळा केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील याची पुरेपूर काळजी घेतली. धैर्य आणि साहस याचबरोबर अखंड सावधानता जोपासणे हेच शिवाजी महाराजांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. अश्या धाडशी आणि सह्शी शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मनाचा मुजरा.
मनोहर अ. बाविस्कर (८७६६९५०७९४)