आजी-माजी पालकमंत्र्यांचा दगडधोंड्याचा विकासामुळे आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे- राजू झोडे
आरोग्याच्या सोयी सुविधा अभावी कोविड रुग्णांची होत असलेली हेळसांड व चंद्रपूर जिल्ह्यातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेला घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात जिल्हा सामान्य रूग्णालयासमोर प्रशासन व या मुक्या बहिऱ्या सरकार विरोधात मूक आंदोलन करण्यात आले.
कोरोना महामारीची दुसरी लाट महाराष्ट्रात भयंकर वास्तव घेऊन आली. चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण वाढत असून कोविड रुग्णांना आरोग्याच्या सोयीसुविधा अभावी नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे तसेच आपला जीवसुद्धा गमवावा लागत आहे. ही परिस्थिती फार भयंकर असून रुग्णांना आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची सोयीसुविधा मिळताना दिसत नाही. मागील सरकारने व आत्ताच्या सरकारने आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलले नाही त्याचाच परिणाम म्हणून जनतेला या कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे.
आरोग्याच्या दृष्टीने व रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड रुग्णांना उपलब्ध करून देण्यात यावे. तालुकास्तरावर आधुनिक कोविड सेंटर उभारण्यात यावे. जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर तात्काळ तयार करावे. सर्व खाजगी रुग्णालये सरकारने ताब्यात घेऊन रुग्णांचे मोफत उपचार करण्यात यावे. अशा महत्त्वाच्या मागण्यांना घेऊन या मुक्या बहिऱ्या सरकार व प्रशासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. शासनाने वरील मागण्या तात्काळ पूर्ण केल्या नाहीतर वंचित बहुजन आघाडीद्वारा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित चे नेते राजू झोडे यांनी शासन व प्रशासनाला दिला.
मूक आंदोलनात सहभागी वंचितचे नेते राजू झोडे, जयदीप खोबरागडे, संपत कोरडे, बंडू ठेंगरे, नितीन रामटेके, कृष्णा पेरकावार, सुभाष थोरात, अशोक पेरकावार, अक्षय लोहकरे, विष्णू चापडे, गुरु कामटे, विशेष निमगडे तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.