आदिवासी समाजाबाबत डॉ. गोविंद गारे व त्याचबरोबर इतर लेखकांनीही मोठ्या प्रमाणात लिखाण केलेले आहे. बरेच संशोधक त्यांच्या लिखाणाचा आधार घेऊन आपले काम करत असतात. आजही आदिवासी समाजावर विविध अंगाने लेखन चालू आहे. त्यातून नवनवीन माहिती ,त्यांचे प्रश्न समाजासमोर येत आहेत. मी ही खूप समाधानकारक गोष्ट मानतो. कारण जोपर्यंत आपल्याला प्रश्न नेमके माहीत होणार नाहीत तोपर्यंत आपण त्या प्रश्नावर योग्य ते उत्तर शोधू शकणार नाही.
असेच आदिवासींच्या साहित्य क्षेत्रावर एक नवीन पैलूवर प्रकाश टाकणारे पुस्तक माझ्या वाचनात आले ते म्हणजे डॉ.तुकाराम रोंगटे संपादित साहित्य गोंदण हे होय. सदर पुस्तकामध्ये गं.बा. सरदार, डॉ. गोविंद गारे, डॉ. ज्योती लांजेवार यांच्यासह एकूण आठ अभ्यासपूर्ण लेख या पुस्तकामध्ये आहेत. लिखाण करणारी सर्व मंडळी संशोधन वृत्तीची असल्यामुळे प्रत्येक लेख हा संशोधन पूर्ण आणि वाचनीय झालेला आहे. कुठेही अवास्तव किंवा काल्पनिक मांडणी झालेली नाही, हे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
गं.बा. सरदार यांनी आपल्या लेखांमध्ये आदिवासींच्या कलेवर लिहिलेले आहे .आदिवासी हे नृत्य आणि गायन करत असताना त्या ते पूर्णपणे रंगून जातात. आपणसुद्धा आपल्या धकाधकीच्या जीवनातून थोडे मोकळे होण्यासाठी ताण तणाव हलका करण्यासाठी कलेचा आधार घेतलाच पाहिजे. ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.
डॉ. गोविंद गारे यांनी आदिवासींच्या साहित्य संमेलना बाबत लिखाण केलेले आहे. दलित साहित्य, बाल साहित्य, ग्रामीण साहित्य या साहित्य संमेलना बरोबर ते आदिवासी साहित्य संमेलनाची तुलनात्मक मांडणी करताना दिसतात. आदिवासी ही लढाऊ जमात होती ;मग आता ती का दुर्लक्षित राहिली आहे ?असा प्रश्न ते लेखात उपस्थित करतात. ब्रिटिशांविरुद्ध आदिवासींनी लढा दिला होता त्यासोबतच आदिवासींनी ज्या काही चळवळी केल्या होत्या त्याचा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे. त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. त्यांच्यावर साहित्य निर्मिती झालीच पाहिजे ,अशी अपेक्षा या लेखात व्यक्त करण्यात आली आहे.
भुजंग मेश्राम आपल्या लेखामध्ये आदिवासी साहित्य बद्दल लिहिताना दिसतात ज्या कादंबऱ्यामुळे (साहित्यामुळे) आदिवासींच्या जीवनाची तोंड ओळख आपल्याला झाली त्याचा उल्लेख यात करण्यात आलेला आहे. त्यामुळे आदिवासींवर कोणते साहित्य प्रकाशित झाले आहे .त्या पुस्तकांची नावे या लेखामुळे माहीत होण्यास मदत होते. ज्यांना या विषयावर सविस्तर अभ्यास करायचा आहे ती व्यक्ती या लेखात जी काही पुस्तकांची यादी दिलेली आहे ती सर्व पुस्तके नक्कीच वाचून काढेल ,असा मला विश्वास वाटतो.
डॉ. तुकाराम रोंगटे यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्या लेखात स्पष्ट केला आहे .तो म्हणजे आदिवासींना मुद्दाम वनवासी म्हणून सध्या संबोधले जाते. रोंगटे यांनी वनवासी आणि आदिवासी यामधील फरक या लेखातून दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो फार गरजेचा होता. आदिवासी समाजात जे काही स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले त्यांची नावे या लेखात वाचायला मिळतात. सोबतच अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढणाऱ्या आदिवासींच्या ज्या संघटना आहेत त्याचीही माहिती या लेखाद्वारे करून देण्यात आलेली आहे.
सदर पुस्तक हे आदिवासींच्या साहित्यावर प्रामुख्याने प्रकाश टाकणारे आहे. पुस्तकातील लेख हे खूपच दुर्मिळ स्वरूपाचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाचनालयात हे पुस्तक अवश्य ठेवावे ,असेच मी सुचवेल.
पुस्तकाचे नाव :साहित्य गोंदण
संपादक: डॉ.तुकाराम रोंगटे
प्रकाशक: सुमेध प्रकाशन, पुणे
पाने:९२ किंमत:७५ रु मात्र
सुशील म्हसदे
मो ९९२१२४१०२४