बंगळुरु – भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी शोक व्यक्त केला आहे. राहुल यांनी या अपघाताला दुर्दैवी आणि दुःखद म्हटले आहे. राहुल म्हणाले- “हे खूप निराशाजनक आहे, खूप दुःखद आहे, माझ्या संवेदना त्या लोकांसोबत आहेत. बंगळुरूच्या क्रीडा संस्कृतीचा विचार करता हा अपघात आणखी वेदनादायक आहे. बंगळुरू हे खेळांचे चाहते असलेले शहर आहे. मी देखील याच शहरातील असल्याचे द्रविडने म्हटले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला तर ५६ जण जखमी झाले आहेत. आरसीबीने आयपीएल जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये उत्सवादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली होती. यावरून सतत वेगवेगळे वाद सुरू आहेत. याप्रकरणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप राजकीय पक्षांकडून सातत्याने होत आहे. या घटनेवर देशातील अनेक सेलिब्रिटींनीही दुःख व्यक्त केले आहे. राहुल द्रविडनेदेखील बंगळुरूमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत वक्तव्य केले आहे. त्याने ही अपघात दुर्देवी असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत कर्नाटक सरकार कारवाई करत आहे. आतापर्यंत सिद्धारम्मय्या सरकारने पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे यांच्यासह 4 जणांना अटकही करण्यात आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणात निखिल सोसाळे यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला असून, न्यायालयाने ११ जूनपर्यंत आपला आदेश राखून ठेवला आहे.