पिण्याच्या पाण्यासाठी आणि शौचालयांसाठी अनुयायांची गैरसोय
भीमा कोरेगाव : १ जानेवारी विजयस्तंभ शौर्यदिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीमअनुयायी भीमा कोरेगाव येथे दाखल झाले होते. ऐतिहासिक आणि गौरवशाली असलेल्या या दिवसाला प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे मोठ्या प्रमाणात गालबोट लागल्याचे चित्र दिसून आले. सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी (BARTI) यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलेले होते, मात्र प्रत्यक्षात पूर्णपणे अपयशी ठरले. यामुळे भीम अनुयायांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. १५ कोटींचा निधी खर्च झाल्याचे सांगितले मात्र, सोई सुविधांच्या नावावर भीम अनुयायींची थट्टाच करण्यात आल्याचे चित्र पहायला मिळाले. (bhima koregaon shaurya din 2026)

शौर्यदिनासाठी नियोजन व्यवस्थेसाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि वाहतूक व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांचा कमतरता स्पष्टपणे जाणवला. विजयस्तंभ परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तसेच उभारण्यात आलेली तात्पुरती शौचालये अस्वच्छ, दुर्गंध पसरलेली असून त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले न्हवते. त्यामुळे ते वापरणे अनेकांनी टाळले.
कंधार नगरपालिका: वंचित बहुजन आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक दिलीप देशमुख यांची निवड
PMPML बससेवा पुरवण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात बसांची संख्या अत्यंत अपुरी असल्याने भाविकांना तासन्तास रस्त्यावर प्रतीक्षा करावी लागली. यावेळी भीमा कोरेगाव येथे लाखो भीम अनुयायायी वेगवेगळ्या राज्यातून आलेली होती. मात्र यावेळी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था विजयस्तंभापासून दूर असल्यामुळे तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. (bhima koregaon shaurya din 2026)

बार्टीकडून आयोजित ३०० स्टॉल्सच्या ‘संविधान बुक फेअर’बाबतही नियोजनाचा अभाव दिसून आला. यावेळी त्याठिकाणी जागेची कमतरता आणि व्यवस्थापन नसल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच सवलतीच्या पुस्तकांचा साठा काही तासांतच संपला आणि हजारो अनुयायी निराश होऊन रिकाम्या हाताने परतले.

भीमा कोरेगाव येथे संविधान कट्टा, भव्य कटआऊट्स, बॅनर्स आणि सेल्फी पॉईंटवर मोठा खर्च करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र पाण्याचे टँकर्स, सावलीची व्यवस्था, स्वच्छ शौचालये आणि सुरळीत वाहतूक यांसारख्या गरजेच्या बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा संताप अनुयायांनी व्यक्त केला.
“दिखावा नको, मूलभूत सुविधा हव्या,” अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली. (bhima koregaon shaurya din 2026)
औरंगाबाद महापालिका निवडणूक: प्रभाग ९ मध्ये शिवसेनेची (UBT) माघार; वंचितचे सतीश पटेकर यांना जाहीर पाठिंबा
प्रशासन, पोलिस आणि वाहतूक विभाग यांच्यात आवश्यक तो समन्वय नसल्याचेही स्पष्ट झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती उद्घाटन, फीत कापणे आणि छायाचित्रांपुरती मर्यादित राहिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाचे नियोजन हे फक्त फाईल्स, आकडे आणि फोटोपुरते मर्यादित राहिले. प्रत्यक्ष मैदानावर मात्र प्रशासनाचा निष्काळजीपणा, संवेदनाहीनता आणि अपयश ठळकपणे समोर आले. यावेळी सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी (BARTI) यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलेले होते. १५ कोटींचा निधी गेला कोठे असा प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहे. (bhima koregaon shaurya din 2026)






