औरंगाबाद : आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाच्या शहरातील कार्यालयात ही प्रक्रिया सुरू असून, या मुलाखतींना प्रस्थापित पक्षांतील अनेक माजी नगरसेवकांनी हजेरी लावल्याचे चित्र दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची मोठी गर्दी आज पक्षाच्या कार्यालयात दिसून आली. विशेष म्हणजे, या गर्दीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या प्रमुख राजकीय पक्षांतील माजी नगरसेवक आणि आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीने शहरात ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या माजी नगरसेवकांकडे त्यांच्या वॉर्डातील जनसंपर्क आणि निवडणुकीचा अनुभव असल्याने, वंचित बहुजन आघाडीची औरंगाबाद मनपा निवडणुकीतील ताकद वाढण्याची शक्यता आहे. या मुलाखतीनंतर वंचित बहुजन आघाडी कोणाकोणाला संधी देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






