विषमतावादी प्रवाहाच्या विरोधात परखडपणे एक भूमिका घेऊन व्यक्त होणारे फार बोटावर मोजण्याइतके कवी आपल्याला देशात दिसून येतात. कुण्या एका विद्वानाने म्हटलं होत, ‘जर आपल्याला त्या देशाचं भविष्य काय असेल हे पाहायचं असेल तर, तिथले साहित्यिक, कवी काय लिहतात ते पाहावं लागत.’ देशभरात तुमच्या आमच्या जीवावर उठलेली व्यवस्था, आमचं अस्तित्व नाकारणारी व्यवस्था, सगळी संसाधने आपल्याच मालकीत राहावी असे मानणारी व्यवस्था आणि यांचे समर्थक याच्या विरोधात संविधानची कविता इथल्या वंचितांची, शोषितांची, कार्यकर्त्यांची बाजू मांडते. तर व्यवस्थेवर विद्रोही आसूड ओढत बुद्धाचा सम्यक मार्ग मांडते. शरद कुमार लिंबाळे म्हणतात, ‘आपण आधी कार्यकर्ता असतो, नंतर साहित्यिक होतो.’ असाच आमचा मार्गदर्शक कार्यकर्ता मित्र -बंधू संविधानने गांगुर्डे ‘आरंभाच्या दारात’ काव्यसंग्रहाच्या माध्यमातून साहित्य विश्वात पदार्पण केलं आहे.
पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर कधी ते हाती लागतं, आणि वाचून काढते अशी उत्सुकता होतीच! अर्थात त्याला कारण ही तसेच आहे, कारण त्याच्या कविता आम्ही कधी समजमध्यामात तर कधी प्रत्यक्षात ऐकल्या होत्याच. त्यामुळे त्याच्या या प्रवासाचे आम्ही साक्षीदार आहोत. अखेर आरंभाच्या दारात हा काव्यसंग्रह हाती आला आणि लगेचच तो वाचून पूर्ण केला.
‘आरंभाच्या दारात’ची सुरुवातच ‘या डिजिटल युगात आपण कोण?’ असा परखड सवाल करत आपला लढा लढण्याचं कारण सांगते, तर ‘पाणी, भूक, धर्म, देश आणि मी, हाथरसच्या निमित्ताने, भिरकवलेल्या दगडाची’ गोष्ट या कवितेच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेचं, विषमता अन् आमचं संघर्ष याच चपखल वर्णन करते. कवी त्याच्या भाषणात म्हणतो ‘आमची कविता, आमचं साहित्य हेच खरं आहे रे वर्गाचं मुख्य प्रवाहाचं साहित्य आहे, कारण आमचं साहित्य हे वास्तववादी, प्रेरणादायी आणि सकारात्मक साहित्य आहे.’ आणि या कविता संग्रहातून असच काही वाचकांना वाचायला मिळतं.
भारतासारख्या देशात जेव्हा आपण एका रिसोर्सेसलेस समूहातून येतो, तेव्हा या कठीण परिस्थितीतही टिकून राहणं गरजेचं असतं. ‘दगडफुल’ प्रकाशनाच्या मध्यमातून हाही फार महत्त्वाचा संदेश इथे आपल्याला मिळतो.
‘आरंभाच्या दारात’ कवितेत कवी म्हणतो, ”कवितेला आता सृजनशील काव्याची गरज आहे.. तिला आता क्रांतिकारकांची गरज आहे.” कवीच्या लिखाणातून सृजनशील काव्य घडेल आणि क्रांतिकारक लिखाण घडेल असा विश्वास आहे. तसेच या काव्यसंग्रहातून आदर्श, भूमिका, घेऊन नवे चेहरे नक्कीच येतील अशी आशा आहे.
या देशाच्या विषमतावादी व्यवस्थेविरोधात अनेकजण आप आपल्यापरीने, आपला विचार घेऊन लढत आहेत. देशात अनेक वादाचा (इझम) पर्याय असताना आमच्या क्रांतीचा मार्ग हा ‘सम्यक क्रांती’चाच असेल हा अत्यंत महत्वाचा संदेश या संग्रहातून आपल्यापर्यंत पोहचतो. आणि ही क्रांती घडवून आणायची असेल तर आपल्या बापाने सांगितलेलं, “सिस्टिम बदलने के लिये सिस्टिम बनाना पडता है” एवढी साधी क्रांतीची व्याख्या आपल्याला न समजलेली व्याखा समजून घेत, “राजगृह ची दिशा धरून आगेकूच व्हायला हवं”. म्हणत कवी आपल्याला मार्गदर्शक दिशा दाखवतो. कवी संविधान गांगुर्डे यास ‘आरंभाच्या दारात’मधून साहित्य क्षेत्रात झालेलं पदार्पण, या साहित्याच्या रोपट्याचा महावृक्ष होवो या मंगल सदिच्छा!
-स्नेहल सोहनी
(लेखिका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आहेत)