काल विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती जगभर साजरी झाली.संघाच्या मुशीतून आलेल्यानी अर्थातच राष्ट्रपती पदावर असलेल्या कोविंद ह्यांनी जयंतीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा “मूर्खपणा” ट्विटरवर कायम ठेवला आणि प्रधानमंत्री मोदींनी मागील वर्षी केलेल्या मूर्खपणा मध्ये काहीसा बदल करीत ह्या वर्षी “शत शत नमन” असा उल्लेख केला. हे नमन देखील नाटकी आहे, मूर्खपणा इतकेच ते बेगडी आहे. कारण राज्यघटनेत असलेल्या लोककल्याणकारी संकल्पना संकुचित करीत जात आणि धार्मिक उन्मादात देशाला ढकलण्याचे पातक भाजपवाले करताहेत. त्यात मोदी शहा अग्रस्थानी आहेत.ट्विटर कोविंद, मोदी आणि शहा ह्यांच्या ट्विट मधील मजकूर समान आहे. एकही अक्षर वेगळं नाही, म्हणजे अकाउंट ऑपरेट करणारी यंत्रणा एकच असली तरी त्यातून त्यांनी राष्ट्रपतींच्या दलित कार्डाला पुढे करून अवमानकारक मजकूर कायम ठेवला.
मोदी आणि शहा ह्यांनी कोरोना देखील ह्यांनी जात आणि धर्मात विभागला आहे.बौद्ध, मुस्लिम आणि ख्रिश्चन ह्यांच्या धार्मिक आस्था आणि सण असले की ह्या सरकारला देशाचे हित दिसते. मात्र निवडणूक आणि कुंभमेळा मध्ये होणाऱ्या गर्दीत कोरोना हा इश्यू नसतो. अशा सिलेक्टिव्ह मानसिकते मुळे देशाला अजूनही आपल्या प्राथमिकता कशात हे ठरवता आलेलं नाही. धार्मिक स्थळे, आस्था ह्या जगण्यासाठी आवश्यक आहेत की शाळा, कॉलेज आणि आरोग्य सुविधा ह्यावर अजूनही भारतीय समाज मन धर्माच्या जोखडातून बाहेर पडायला मागत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.अडाणी, अशिक्षित माणसापेक्षा शिकलेल्या माणसात असलेले हे धर्मवेड, उन्माद हा अधिक धोकादायक असतो, त्याला कुठलाही धर्म अपवाद नाहीय. नेमक्या ह्याच धोक्याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप पूर्वी करून दिली होती. ह्या प्रवृत्तीचा निषेध करतो.
दुसरी कडे आंबेडकरी समूहाने ह्या वर्षी देखील अत्यंत समंजसपणा दाखवून दिला. रक्तदान शिबीर, ऑनलाईन प्रबोधन, चर्चा, मांडणीतून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर घातला गेला. नाही म्हणायला काही मोजक्या अतिउत्साही मंडळींनी जयंतीला रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार, हे खूळ घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि भीमरावजी आंबेडकर ह्यांचे आवाहनामूळे राज्यात विधायक जयंती साजरी झाली. कुठेही नाव ठेवायला संधी दिली नाही, त्याकरिता आंबेडकरी समूह आणि बौद्ध अनुयायांचे अभिनंदन केलेच पाहिजे. राजकीय, सामाजिक दृष्टीने अत्यंत सजग आणि प्रगल्भ असलेल्या समूहाने सलग दुसऱ्या वर्षी दाखवलेला समजूतदार वाखाणण्याजोगा आहे.
राजेंद्र पातोडे