सत्तेचा ऊर्जा स्त्रोत “अकोला पॅटर्न”…!

 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

भास्कर भोजने

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना संजिवनी संदेश देतांना,म्हटले होते की,”जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर कोरुन ठेवा ” मला शासनकर्ती जमात बनायचे आहे”.

हा संजिवनी संदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी आंबेडकरवादी समुह शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पक्ष ते बसपा या राजकीय पक्षांच्या प्लॅटफार्मवरुन सातत्याने प्रयत्नशील राहिला परंतु यशस्वी झाला नाही, तो शासनकर्ती जमात बनू शकला नाही हे वास्तव आहे.

उत्तरेत बसपाने आंबेडकरी समुहाला शासनकर्ती जमात बनविले असा प्रचार बसपा किंवा बामसेफ करीत असते मात्र ते पुर्णसत्य नाही, ते अर्धसत्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरवादी समुहाला शासनकर्ती जमात बनवायचे होते मात्र बसपाने आंबेडकरवादी माणूस टाळुन ” जयंत मल्होत्रा” या ब्राम्हणी व उद्योगपती माणसाला राज्यसभा खासदार बनविले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ ऊद्देशालाच बगल दिली. दुसरे असे की, राजकीय पक्षाची विचारधारा राबविताना निर्णय प्रक्रियेत वैचारिक प्रामाणिकता न राखता निर्णय प्रक्रिया ही आंबेडकरवादी माणसाच्या हातातून काढून बसपाने” सतिश मिश्रा” या ब्राम्हणी व्यक्तीच्या हातात देऊन आंबेडकरी सुत्रच प्रदुषित केले आहे. तिसरे असे की, बसपाच्या राजकीय प्लॅटफार्मवरुन” ब्राम्हण समाज संमेलने ” घेऊन बसपाने वैचारिक दिवाळखोरी केली आहे. म्हणून बसपाने आंबेडकरवादी समुहाला शासनकर्ती जमात बनविले आहे हा प्रचार खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

” मला शासनकर्ती जमात बनायचे आहे ” हा संजिवनी संदेश प्रत्यक्षात आणण्यासाठी वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कल्पकतेने आणि ऊदार अं:तकरणाने अकोला पॅटर्न हे मॉडेल विकसित केले आहे.सन १९८० पासुन सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने अकोला पॅटर्न साकार करण्यासाठी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्ट घेतले आहेत. २०२० च्या अकोला जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाने एक हाती पाचव्यांदा सत्ता काबीज केली आहे. लोकशाहीला ऊणेपुरे ७० वर्षे झाली आहेत.म्हणून भारतीय मतदार चोखंदळ झाला आहे.संपुर्ण देशातील मतदार सत्ताधारी पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून विरोधी पक्षाला संधी देतं असतो, असेच चित्र आहे.

संपूर्ण मिडिया आणि सर्वच प्रस्थापित पक्ष विरोधात असतांना आणि विरोधी पक्षांनी अभद्र युती करुनही अकोला जिल्हा परिषदेत पाचव्यांदा भारिप बहुजन महासंघाला कशी सत्ता राखता आली? हा खरा प्रश्न आहे. एकदा का सत्ता मिळाली की,मग सत्तेच्या माध्यमातून घराणेशाही कुटुंबशाही निर्माण केली जाते. सत्तेच्या आडून आर्थिक घोटाळेबाजी केली जाते. किंवा भ्रष्टाचाराला पाय फुटतात. आणि मग मतदार सत्ताधाऱ्यांच्या या मस्तवाल वागणूकीला लगाम घालण्यासाठी सत्ताधारी पक्षाला घरचा रस्ता दाखवितो आणि विरोधकांच्या हातात सत्तेची सूत्रे देतोय. भारिप बहुजन महासंघाच्या सलग २० वर्षाच्या सत्ता काळात नेते अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी कुणाचीही घराणेशाही ऊभी केली नाही. प्रत्येक निवडणुकीत उमेदवाराचा चेहरा नवा असतो. प्रत्येक वेळी नवा समाज समुह सत्तास्थानी बसविला जातो. तसेच सलग २० वर्षे सत्तेत असुनही अकोला जिल्हा परिषदेला भ्रष्टाचाराला साधा डाग सुद्धा लागला नाही. ही किमया अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्णय प्रक्रियेमुळे शक्य झाली आणि म्हणूनच मग पाचव्यांदा अकोला जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करता आली.

अकोला जिल्हा परिषदेत अध्यक्षस्थानी कोळी समाजाचे  डॉ दशरथ भांडे, तेली समाजाचे श्री बालमुकुंद भिरड, माळी समाजाचे श्री बळीराम सिरस्कार, बौद्ध समाजाचे श्री श्रावण इंगळे, सौ.पुष्पाताई इंगळे, श्री शरद गवई. मुस्लीम समाजातील सौ.साबिया अंजुम सौदागर, कुणबी समाजाच्या सौ.संध्याताई वाघोडे अशा अतिशय मायक्रो ओबीसी आणि अतिशय गरीब कुटुंबातील माणसं लाल दिव्याच्या गाडीत बसले आणि नेते झाले. सर्वसामान्य कुटुंबातील माणूस अॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय धोरणामुळे राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या लाल दिव्याच्या गाडीत बसतो, जिल्ह्यचा प्रमुख होतो, करोडो रुपयांच्या योजना राबवितो, आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी राबतो. शेतकरी बांधवांना बी बियाणे मोफत देतोय, गरजू गरीब कुटुंबाला टिनपत्रे देतोय, शाळकरी मुलींना सायकली वाटप करतो, कुटिरोद्योग करणा-या कुटूंबाला कुक्कुटपालन करण्यासाठी कोंबडी वाटप करतो, दुग्धव्यवसाय करणा-या कुटुंबाला म्हशींचे, शेळीचे वाटप करतो, अपंगांना मानधन देतो ही कृतीप्रवनता सर्वसामान्य माणसाला सत्ताधारी होण्याचं बळं देते. सर्वसामान्य माणसाला नेता होण्याचं स्वप्न पहायला ऊर्जा पुरविते , आणि सत्तेचे प्रयोग करायला शिकविते.

अकोला पॅटर्न मुळे बंजारा समाजाचे मखराम पवार हे दोन वेळा आमदार आणि एकदा कॅबिनेट मंत्री झाले, कोळी समाजाचे डॉ दशरथ भांडे हे जि.प.अध्यक्ष ,आमदार, आणि कॅबिनेट मंत्री झाले.

बारी समाजाचे श्री रामदास बोडखे हे आमदार आणि राज्यमंत्री झाले, धनगर समाजाचे श्री हरिदास भदे हे दोन वेळा आमदार झाले. माळी समाजाचे श्री बळीराम सिरस्कार हे जि.प.अध्यक्ष आणि दोन वेळा आमदार झाले. ही सर्वसामान्य कुटुंबातील आणि लहान लहान जातीतील माणसें जेव्हा महाराष्ट्रात नेते म्हणून उभे राहिले तेव्हा प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात नेता होण्याची ऊर्जा ओसंडून वाहू लागली. प्रत्येकाला वाटू लागले की,माझ्या सोबतचा व सहकारी जर राज्यपातळीवर नेतृत्व करु शकतो तर मग मी का नाही करु शकणारं? हा आत्मविश्वास अकोला पॅटर्न ने निर्माण केला. हा आत्मविश्वासच बहूजन समाजाला सत्तेच्या खुर्चीत बसविण्यासाठी कामी आला.  अकोला पॅटर्न मुळे आदिवासी समाजाचे श्री धोंडीराम खुळे हे जि.प.कृषी सभापती झाले. वडार समाजातील सौ.अनिताताई अव्वलवार या मुर्तीजापुर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा झाल्या. पाथरवट समाजाच्या सौ.कविताताई ढाळे या पातुर पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या. पारधी समाजाचे श्री विजयसिंह सोळंके हे जि.प.समाजकल्याण सभापती झाले. भोई समाजातील सौ.मिनाताई बावने या जि.प. महिला बालकल्याण सभापती झाल्या. गेल्या विस वर्षात असे अनेक पदाधिकारी झाले आहेत मात्र हे प्रातिनिधिक उदाहरणे दिली आहेत.

उपेक्षित, आदिवासी,भटका विमुक्त समाजाचा माणूस,ज्याच्या मतालाही किंमत नाही आणि जातीनांही प्रतिष्ठा नाही तो सत्ताधारी होऊ शकतो हा ऐतिहासिक बदल अकोला पॅटर्न मुळे निर्माण झाला. आणि अकोला जिल्ह्यातील माणसांच्या मना मनात “मला शासनकर्ती जमात बनायचे आहे “हा मंत्र रुंजी घालू लागला.म्हणून इथला फाटक्या कपड्यातील माणूस सत्तेच्या खुर्चीसाठी सज्ज झाला. हा आत्मविश्वास अधिक दृढ होत गेला आणि म्हणूनच मग जिल्ह्यातील सत्ता पाचव्यांदा काबीज करता आली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात अॅड बाळासाहेब आंबेडकर हे १९८४ पासुन सलग ९ वेळा उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. त्यापैकी दोन वेळा विजयी झाले आहेत मात्र ७ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सात वेळा पराभव पचवला मात्र कुणाबद्दलही मनात आकस बाळगला नाही, अनेक जाती समुहांना सत्ताधारी बनविले, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, आदिवासी अशा सर्वच धर्माच्या माणसांना सत्तेची खुर्ची बहाल केली तरीही मला लोकसभेत मतें का मिळतं नाहीत.? म्हणून फेरआढावा घेतं आकसाने वागले नाहीत. अतिशय खिलाडूवृत्तीने पराभव पचवला आणि उपेक्षितांच्या हितासाठी कष्ट ऊपसतं राहिले, तोच पायंडा आजही सुरू आहे.

जसा अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी धिरोदात्तपणा दाखविला तसाच बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा संयम अंगिकारत जातीय अहंकार किंवा जातीय झगडा केला नाही. मोठ्या भावाची भूमिका घेऊन सत्तेचे प्रयोग करीतच आहेत. म्हणून सामाजिक सामंजस्य निर्माण करता आले. अशाप्रकारे अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी ऊदार अंत:करणाने अकोला पॅटर्न सिंचन केला आहे.  महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनो सत्ताधारी व्हायचे असेल तर, अकोला पॅटर्न समजून घ्या.

अकोला पॅटर्न कसा उभा राहिला? अकोला पॅटर्न मध्ये कोणते प्रयोग केल्या गेले? अकोला जिल्ह्यात मतदार कसा तयार झाला? माझ्या गांवात, तालुक्यात, जिल्ह्यत ,मला सत्तेसाठी कोणता प्रयोग करायचा आहे? मला ओबीसी समाजाला सोबत घेतांना काय करावे लागेल? माझा सत्तेतील वाटेकरी कोण? माझा सहयोगी म्हणून मी कुणाला निवडले पाहिजे? या सगळ्या प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी अकोला पॅटर्न हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. एकदा अकोला पॅटर्न हे पुस्तक वाचा, अभ्यास करा. आणि आपल्या गावापासून तर जिल्ह्यातील सत्तेसाठी नियोजन करा. नियोजनाशिवाय सत्ता मिळतं नाही.

नियोजनाशिवाय अत्यल्पसंख्याक समाजाचे जसे की, कलाल, वडार, धोबी, पारधी, बेलदार, सुतार, न्हावी, लोकप्रतिनिधी होऊ शकतं नाही. मतांच्या देवाणघेवाणी शिवाय, कैकाडी, पारधी, भटके विमुक्त आणि अलूतेदार बलूतेदार यांना सत्ताधारी बनविता येतं नाही. वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी “अकोला पॅटर्न” हे अभिनव मॉडेल तमाम आंबेडकरवादी माणसाच्या समोर ऊभे करुन यशस्वी करुन दाखविले आहे. आता हे मॉडेल राज्यस्तरावर राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. आपल्या जिल्ह्यचे नियोजन केले पाहिजे. एखादा राजकीय प्रयोग साकार करण्यासाठी प्रकल्प तयार करुन नेत्या समोर सादर केला पाहिजे. आणि गावपातळीवरील सत्ता हस्तगत करीत करीत शासनकर्ती जमात झाले पाहिजे. या सर्व प्रक्रियेत आंबेडकरी समुहाला मोठ्या भावाची भूमिका साकार करायची आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.

जर तुम्ही अकोला पॅटर्न समजून घेतला आणि आपल्या जिल्ह्यात राबविला तर सत्ता दुर नाही हे वास्तव जाणा… जयभीम.

भास्कर भोजने

9960241375

(लेखक हे अकोला पॅटर्न पुस्तकाचे लेखक आहेत)


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

One thought on “सत्तेचा ऊर्जा स्त्रोत “अकोला पॅटर्न”…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *