Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सामाजिक

यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

mosami kewat by mosami kewat
July 6, 2025
in सामाजिक
0
यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

       

पंढरपूरची आषाढी वारी म्हटलं की सर्वांना वेध लागतात ते दिंडीचे. वारकऱ्यांसाठी सर्वात मोठी आचार पद्धती म्हणजे वारी आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या सोबतच विविध संतांच्या, विविध विचारांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असतात. सर्वांच्या मनामध्ये एकच आस असते ते म्हणजे जीवाचा जिवलग असणारा पांडुरंग त्याला डोळे भरून पाहायचं आणि पुन्हा गावी परतल्यानंतर आपली जी कर्म आहेत ती प्रत्यक्ष ईश्वराची कर्म आहेत असं समजून मनोभावे करत राहायची.

वारीमध्ये विविध प्रकारच्या दिंड्या निघत असतात त्यापैकीच एक आगळीवेगळी दिंडी गेल्या सात वर्षांपासून सुरू झालेली आहे. या दिंडीचे नेतृत्व महाराष्ट्रातील विवेकी कीर्तनकार व गाजलेले पत्रकार ह.भ.प श्यामसुंदर महाराज सोन्नर हे करत असतात. त्यांच्या या उपक्रमाला महाराष्ट्रातील बऱ्याच मान्यवर वारकऱ्यांचा व वैचारिक लोकांचा पाठिंबा आहे. ही वारी समतेची गर्जना करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फुले वाड्यातून निघते व तिचे प्रस्थान पंढरपूरकडे होते. दिंडीचे नावच आहे.

संविधान समता दिंडी नावातच या दिंडीचा उद्देश आणि हेतू स्पष्ट होतो. तमाम भारतीयांना संविधानाची ओळख करून देणे आणि संविधानाच्या माध्यमातून जी समता सांगितली आहे ती समता समाजामध्ये प्रस्थापित करणे. तसं बघायला गेलं तर समतेने नांदणारा समाज हे स्वप्न सर्वप्रथम संतांनी पाहिलं होतं. म्हणूनच आपल्या अभंगांच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी समतेचाच उपदेश केला. ज्यावेळेस ज्ञानामुळेच मोक्ष मिळतो अशी हजारो वर्षांची परंपरा होती आणि हे ज्ञान समाजातल्या केवळ मोजक्याच लोकांकडे एकवटलेलं होतं. नव्हे या आधारावरच समाजातला बहुतांश वर्ग धर्मापासून, ज्ञानापासून पर्याय आणि मोक्षापासून वंचित ठेवण्यात आला होता त्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांनी शपथ घेतली की

इये मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी या मराठीच्या नगरामध्ये मी ब्रह्मविद्येचा सुकाळ करणार आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी विवेचनासाठी ग्रंथ निवडला तो ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांनी उपदेश केलेली गीता आणि भाषा निवडली ती सर्व सामान्यांची बोलीभाषा माय मराठी. ज्ञानेश्वर महाराजांच्या या कृतीमध्येच समतेचे मर्म लपलेले आहे. त्याच्यानंतर संत नामदेव महाराजांच्या प्रभावाखाली महाराष्ट्रामध्ये विविध जातीमध्ये संतांची प्रभावळ तयार झाली. हे सर्व संत एकच उपदेश करीत होते की भक्तीचा अधिकार सर्वांना आहे. नव्हे भक्ती हा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे.

म्हणून तुम्ही केवळ त्या पांडुरंग परमात्म्याचे नाव घ्या आणि आपली कर्म आनंदाने करत रहा. तुमच्या जीवनाचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या सकलसंतांनी तमाम वारकऱ्यांच्या हातामध्ये एक सोपं धर्मसाधन आणून दिलं आणि ते साधन म्हणजे *नामसंकीर्तन साधन पै सोपे | जळतील पापे जन्मांतरीची. खऱ्या संताना सामान्य लोकांच्या जीवनाचे कल्याण करण्याची ओढच लागलेली असते. याच वारकरी संप्रदायावर कळस चढवण्याचे कार्य केले ते जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. तत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात वाढलेल्या कुरीतींवर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी *नाही भिड भार | तुका म्हणे साना थोर || असे म्हणत शब्दांचे प्रचंड आसूड ओढण्याचे काम केले.

खरा पंडित कोण आहे तो माणसा माणसांमध्ये भेद न करता प्रत्येकामध्ये समब्रह्म पाहतो तोच खरा पंडित आहे अशी समतेची व्याख्या जगतगुरु तुकोबाराय द्यायला लागले. खरा सोवळा कोण आहे जो परधनापासून आणि परस्त्री पासून दूर राहतो तो खरा सोवळा आहे. वैराग्य कशाला म्हणतात संसारामध्ये राहून सुद्धा विधीने संसाराचे जो सेवन करतो नव्हे संसाराला जिंकतो त्यालाच खरा वैरागी म्हणतात असं तुकोबाराय सांगतात. त्याच्याही पुढे जाऊन समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून केलं. यातायाती धर्म नाही विष्णू दासा, अंत्यजादी योनी तरल्या हरीभजने | तयाची पुराणे भाट झाली, वंदिन मी भुते | आता अवघीच समस्ते | गाळूनिया भेद प्रमाण तो वेद, तुका म्हणे एका देहाचे अवयव | सुखदुःख जीव भोगपावे, अशा शब्दांमध्ये समतेचे महत्व जगद्गुरु तुकाराम महाराज समाजाला पटवून देत होते. आणि समाज सुद्धा यातून प्रेरणा घेत खडबडून जागा होत ताठ मानेने उभा राहत होता. स्वाभिमानाने उभा राहत होता. म्हणूनच त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यक्रांती केली. हा समतेचा विचार पुढे जाऊन भारतरत्न डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामध्ये अंतर्भूत केला. तोच विचार लोकांना समजावा म्हणून संविधान समता दिंडीचा अट्टाहास आहे. परंतु या दिंडीला लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून काही जातीयवादी, वर्णवर्चस्ववादी, एका विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधल्या गेलेल्या लोकांच्या पोटात पोटसुळ उठायला लागला. त्यांनी या संविधान समता दिंडीबद्दल वेगवेगळ्या वावड्या उठवायला सुरुवात केली. आणि यावर्षी तर एका सामाजिक कार्यकर्त्याच्या पत्राचा आधार घेत वारीतल्या जुन्या लोकांनी पत्रकार परिषद घेत या दिंडीवर आक्षेप घेण्याचं काम केलं. त्याचाच संदर्भ घेत शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला.

परंतु गंमत अशी की पत्रकारांनी जेव्हा मनीषा कायदे यांना विचारलं की तुमची अडचण संविधान आहे की समता त्या वेळेस मात्र कायदेतज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या आमदाराची सुद्धा बोबडी वळली. त्यांना नीटसं उत्तरही देता यायला नाही. टीव्हीवरील चर्चेत एका सामाजिक कार्यकर्त्याने दिंडी चालक हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांना प्रश्न विचारला की बाबासाहेबांनी, मी रामकृष्णला मानणार नाही अशी शपथ घेतली होती त्याचं काय करणार? खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी ही शपथ सर्व भारतीयांना दिलेली नव्हती तर जे अस्पृश्य बांधव होते आणि ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता त्या बौद्ध धर्माचं आचरण सांगत असताना त्यांनी काही प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्यातली ही एक प्रतिज्ञा आहे. आणि ती प्रतिज्ञा ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्यासाठीच लागू आहे.

परंतु संविधान मात्र केवळ बौद्धांसाठी नसून ते सर्व भारतीयांसाठी आहे. आणि म्हणून संविधान देशाला अर्पण करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ते जनतेच्या नावाने सुरुवात करून जनतेलाच अर्पण केलेले आहे. म्हणजे या संविधानावर प्रत्येक भारतीयाचा समान प्रमाणात हक्क आहे. आणि म्हणूनच विषमतेचे वाहक असणाऱ्या लोकांनी या दिंडीला मोठ्या प्रमाणात विरोध करायला सुरुवात केली. कारण ही दिंडी खऱ्या अर्थाने *यारे यारे लहानथोर | याती भलत्या नारीनर अशा पद्धतीचा समतेचा डांगोरा पिटत सर्वांना सामावून घेते.

विशेष बाब म्हणजे काही वर्षांपासून याच दिंडीमध्ये संतांपेक्षा म्हणजे ज्ञानोबा, तुकोबांपेक्षा मनू हा श्रेष्ठ होता असं सांगणारे संभाजी भिडे व त्यांचे धारकरी सामील होत आहेत त्यावेळी मात्र संविधान समता दिंडीच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेणाऱ्या महाराजांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा साध्या शब्दानेही निषेध केला नाही. वारकऱ्यांचे पंचप्राण असणारे संत ज्ञानोबाराय, संत तुकोबाराय यांचा अपमान झाला तेव्हाही मंडळी मूग गळून गप्प बसली होती. इतकेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप सिद्ध केले व ज्यांना शिक्षा सुनावली त्यांच्या नावाने सुद्धा काही वर्षांपासून दिंडी निघत आहे.

त्यालाही कोणी विरोध केल्याचे आजपर्यंत कुणी पाहिले नाही. परंतु संतांच्या विचारांचा जागर करणारी संविधान समता दिंडी मात्र यांच्या डोळ्यांमध्ये खूप लागली. याचं कारण एकच आणि ते म्हणजे संतांनी समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, एकमय लोक निर्माण करण्याचे स्वप्न पाहिलं होतं ते अशा दिंड्यांच्या माध्यमातून पूर्णत्वास जाऊ शकते. मग काय करायचं? तर या दिंडीला बदनाम करून त्यांच्या पाठीमागे वाढणारा जो जनसमूह आहे त्याला त्यापासून प्रवृत्त करायचं.

परंतु तुकोबाराय सांगतात अठरा पगड याती सकळही वैष्णव | दुजा नाही भाव पंढरीस अठरापगड जाती धर्माचे लोक सगळ्यांनाच वैष्णव मानणारा हा संप्रदाय आहे. आणि म्हणूनच खट-नट यारे शुद्ध होऊन जारे असा डांगोरा संतांनी पीटला. ज्याच्या मनामध्ये पांडुरंगा बद्दल भाव नाही तो सुद्धा इथे येऊन पवित्र होतो अशी ग्वाही संतांनी दिली. तुका म्हणे असो अथवा नसो भाव | दर्शने पंढरीराव मोक्ष देतो असा संतांचा अस्सल बावनकशी विचार समाजामध्ये पेरणाऱ्या संविधान समता दिंडी व त्याचे चालक असणारे हभप श्यामसुंदर महाराज सुंदर आणि त्यांची संपूर्ण मार्गदर्शक टीम याच्यासोबत संतांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.


       
Tags: Ashadhi Ekadashi 2025equalityjourneypandharpursamtasamvidhan
Previous Post

Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

Next Post

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

Next Post
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार
बातमी

Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार

by mosami kewat
July 6, 2025
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित जनता दरबार नुकताच पार पडला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल...

Read moreDetails
मुख्याध्यापकांशिवाय तब्बल 200 शाळा! मुंबई महानगर पालिकेच्या शाळांची स्थिती

BMC School Staff Shortage : मुख्याध्यापकांशिवाय तब्बल 200 शाळा! मुंबई महानगर पालिकेच्या शाळांची स्थिती

July 6, 2025
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

July 6, 2025
यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

July 6, 2025
Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

July 6, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क