नाशिक: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने श्रीराम कलश पूजनाचे आयोजन केले होते.विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते हा धार्मिक विधी पार पडणार होता, कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच वंचित बहुजन युवा आघाडीने विद्यापीठात जाऊन घोषणाबाजी करून कुलगुरूच्या विरोधात आंदोलन केले. आंदोलकांची भेट कुलगुरू टाळत असल्याचे लक्षात येताच आम्ही कुलगुरूंना भेटल्या शिवाय जाणार नाही असा पवित्रा वंचित बहुजन युवा आघाडीने घेतला आणि कुलगुरूंची भेट घेऊन वंचित बहुजन युवा आघाडीने कुलगुरूंची कानउघाडणी करून कलश पुजनाचा कार्यक्रम हाणून पाडला.
भारतीय संविधानानुसार शैक्षणिक संस्थेच्या आवारात धार्मिक कार्यक्रम करणे निषिद्ध असताना हा कार्यक्रम होत असल्या कारणाने आणि भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष या तत्वाला काळिमा फासणारा प्रकार असल्याने या कार्यक्रमाला वंचित बहुजन युवा आघाडीने विरोध केला.
सदरील आंदोलन राज्यसदस्य चेतन गांगुर्डे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पार पडले. ह्या वेळी वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक महानगरप्रमुख रवी पगारे, उपाध्यक्ष युवराज मनेरे ,ज्ञानेश्वर वाहुळे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख कोमल पगारे, तालुकाप्रमुख विकि वाकळे, महासचिव संतोष वाघ, संघटक मंगेश पवार , सम्यक विद्यार्थी आंदोलन नाशिक जिल्हाध्यक्ष मिहिर गजबे यांसह संभाजी ब्रिगेडचे संतोष गायधनी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.