बहुतेक आपण भविष्यात कधीतरी त्यांचे राजकीय भागीदारसुद्धा असू, किंवा असेल आपलाही प्रवास त्यांच्या सोबत कुठल्यातरी राजकीय अधिष्ठानाला पूर्णत्व देण्यासाठी केलेला संकल्प. म्हणून याचा अर्थ आपण आपल्या आजूबाजूच्या परिघांना तपासूनच पाहायचं नाही असा होत नाही. भारतभराचा लोकशाही इतिहास पाहता खूप सफाईने इथल्या प्रस्थापित राजकीय सत्ताधारी आणि विरोधी पक्ष बनवल्या गेलेल्या भाजप आणि काँग्रेसने नेहमीच सत्तेच्या सामाजिकरणांमध्ये लोकशाहीच्या सार्वत्रिकरणामध्ये अडथळे निर्माण करून आपापसात सत्ता विभाजन करून उपभोगली आहे. काही उदाहरणं द्यायची ठरल्यास बिहार मधील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उघड मोदी विरुद्ध लालूप्रसाद यादव असा सामना असताना काँग्रेसने स्वत:च्या राष्ट्रीय पार्टी असल्याचा टेंभा मिरवत मिळवलेल्या जागांवर स्वतःचे डिपॉझिट सुद्धा वाचवले नाही. ही एका अंगाने बीजेपीला केलेली मदतच नव्हे का? स्थानिक पातळीवरील स्वतःच्या राष्ट्रीयत्वच्या सो कॉल्ड मर्यादा न ओळखू शकलेलं काँग्रेस देशाच्या हिताचे निर्णय घेऊ शकते अशी आशा सामान्य माणसांनी का बाळगावी?
“जानव्याला जानवं” दाखवून कोणतं परिवर्तन…?
अभ्यासादाखल या पातळीवर इतर राज्यांचाही अभ्यास करावा म्हणजे किती प्रादेशिक पक्षांना काँग्रेसने हानी पोचवली याचा एक लेखाजोखा समोर येईल. महाराष्ट्रातच पाहायचं झालं, तर वंचित बहुजन आघाडीसाठी तयार झालेल्या राजकीय जमिनीची कल्पना असतानासुद्धा फक्त आपल्या राष्ट्रीयत्वाचा आव आणत काँग्रेसने शेवटच्या क्षणापर्यंत सन्मानपूर्वक युती न करता उलट वंचित बहुजन आघाडीलाच बी टीम म्हणण्याचे क्रौर्य दाखवले. बाळासाहेब आंबेडकर उभे असलेल्या अकोला आणि सोलापूर दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार होते. राज्यात एकही मुस्लीम सीट न देणाऱ्या काँग्रेसने मतांचे विभाजन होऊन वंचित बहुजन आघाडीचे नुकसान व्हावे या हेतूने अकोल्यात मात्र मुस्लीम कार्ड खेळल. काँग्रेसच्या हिदायत पटेल यांना तिकीट देत भाजपला सहाय्य केले. देशाचा नकार पचवू न शकलेले काँग्रेस स्वतःच्या हव्यासी वृत्तीमुळे देशातील सत्ता गमावून बसले. “जानव्याला जानवं” दाखवून कोणतं परिवर्तन आणणार आहे ? काँग्रेस ह्याचे तपशील फक्त काँग्रेसी सॉफ्ट फॅसिजमचे समर्थन करणारे बुद्धिजीवी महानुभावच देऊ शकतात. हे नाहीतर आम्ही असं वागून पर्यायी पर्यायांवर बंदी घालायची आणि आम्ही कसे निवडीचे स्वातंत्र्य देतोय म्हणून मिरवायच. बंगाल, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणखीही यादी करता येईल काँग्रेसच्या हट्टापायी प्रादेशिक पक्षांच्या नुकसानीची ज्यातून आज देश कट्टरतेच्या दारात उभा आहे. काँग्रेसची ही “भारत जोडो” यात्रा छत हिरावून छत्री देण्याचे नाटक करणारी आहे. खरं पाहायला गेलं, तर या देशाला कट्टरतेची कीड लागली आहे, ही आज आपली जी ओरड आहे, ह्या कट्टरतेची बीज आपल्या पिढ्यांमध्ये कोणी रोवली याचा विचार आपण करणार आहोत की नाही? शालेय शिक्षणाचे धार्मिकीकरण, धार्मिक दंगलींमध्ये बोटचेपी भूमिका घेणं ज्यांनी ही मानसिकता रुजवली, वाढवली त्याच विचारांवर कट्टरतावादाचं बांडगुळ पोसल्या जात आहे. ते त्याच्या अंतिम चरणाकडे जात असताना ‘लांडगा आला रे’ म्हणून ओरडण्यात काही अर्थ नाही.
काँग्रेस निर्दोष कशी?
मुळात या अगोदर लांडगा आला, लांडगा आला, म्हणून लोकांच्या मनातील दहशतीचा वापर करणारे खऱ्या अर्थाने दोषी आहेत, असं मला वाटतं. ही भीती जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेस त्यांच्या कार्यकाळात करत आली. ‘गरीबी हटाव’चा नारा देत देत राजकारण करणाऱ्यांनी गरिबांना हटवण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात केलं. स्वतःच्या काळात स्वपक्षातील घराणेशाही पुसून काढता न येणार काँग्रेस, सर्व सत्ता हातात असतानासुद्धा देशात प्रतिगाम्यांना स्वहितासाठी मोकळ राण देणारं काँग्रेस निर्दोष कसं काय असू शकतं? याचा विचार बुद्धिजींवीनी करायला हवा. फक्त आज फॅसीझमच्या नावाखाली आपण एकत्र येणे गरजेचं आहे म्हणत, त्याच फॅसीझमला पोसणाऱ्या काँग्रेसला लीडरशिप देऊन त्यांच्या हाताखाली स्वतःचे अस्तित्व संपवून घेण्यात अर्थ नाही. किंबहुना प्रतिगामी फॅसीझम संपवण्यासाठी लोकशाही आवरणातला सॉफ्ट फॅसीझम स्वीकारण्यात शहाणपण नाही. असं मला वाटतं.
ह्या “भारत जोडो” यात्रेचा नागपूर, गुजरातसारख्या राज्यात काय रोल आहे? नोटबंदी, जीएसटी, सीएए, एनआरसी, शेतकरी काळे कायदे, किंवा आर्थिक निकषावरील आरक्षण, सगळ्यात मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका ही बोटचीपी राहिलेली आहे. तरी आमच्या बुद्धिजीवींना काँग्रेस उद्धार करती वाटते. कारण, दगडापेक्षा इट मऊ म्हणत कुणाचा तरी मार खाण्याची मात्र त्यांची सवय सुटत नाही. स्थानिक पातळीवर प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे काम आज जसे बीजेपी करत आहे, तसे काँग्रेसने केले नाही असं म्हणायचं आहे का इथल्या काही बुद्धिजीविना ? आणि हीच भारत जोडो यात्रा मायावतीजीनी किंवा ममता बॅनर्जी यांनी काढली असती तर याच बुद्धिजीवींनी त्यांना असा मदतीचा हात पुढे केला असता का?
… असं काही होताना दिसत नाही
स्थानिक पक्षांना ए.बी.सी.डी टीम घोषित करून त्यांचा लोकशाही मार्गाने टाकलेल्या पावलांना मागे खेचण्याचे काम करणाऱ्या पांढरपेशा बुद्धिजिवींना नेहमीच काँग्रेसच्या सॉफ्ट फॅसिझमला शरणागती पत्करलेली आहे आणि तीच काँग्रेस जेव्हा प्रादेशिक पक्षांची मतं खाऊन बीजेपीला हातभार लावत होती, त्यावेळेस तिच्या सार्वभौमत्वाचा उदोउदो करता करता यांचे नरडे कोरडे पडत होते. यांच्या दृष्टीने निवडणूक लढवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त काँग्रेस विरुद्ध बीजेपी आणि बीजेपी विरुद्ध काँग्रेस यांनाच आहे. बाकी प्रादेशिक पक्षांनी एकतर यांच्या अटींवर या पक्षांशी हितसंबंध ठेवायचे किंवा हुजरेगिरी करत मालकानं ताटात टाकलेल्या तुकड्यांवर समाधान मानत जगायचे. स्वतंत्र लोकशाहीच्या सामाजिकरणाची गोष्ट सांगणारे यांच्या लेखी फॅसिस्ट बीजेपीपेक्षाही जास्त घातक आहे. असंच नेहमी यांच्या बोलण्यातून दिसत आलेलं आहे. देशभरातील वंचित, अल्पसंख्याक प्रतिनिधित्वाच्या प्रश्नावर काँग्रेसला जाब विचारण्याचे धारिष्ट का करत नसतील ह्या व्यक्ती? घराणेशाही, प्रादेशिक काँग्रेसला मिळणारे निर्णय स्वातंत्र्य ह्या सगळ्यांनी निराश झालेले नेते आणि विखुरलेला उदासीन कार्यकर्ता जोडण्यासाठीचा हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सोबतच काँग्रेस नेत्यांच्या पुढच्या पिढ्यांना आयतेच लॉन्चिंग स्टेज मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीने भीमा कोरेगावनंतर महाराष्ट्रात नवं नेतृवांची निर्मिती केली. भटके, आदिवासी, लैंगिक अल्पसंख्यांक, वंचित घटकांना राजकीय हस्तक्षेपाची संधी दिली, त्यांना राजकीय स्वप्न दिले. या भारत जोडोतून असं काही करताना दिसत नाहीये.
लोकशाहीच्या सबलीकरणासाठी काँग्रेसने कुठल्याही स्थानिक पक्षांना सन्मानपूर्वक “भारत जोडो”मध्ये जोडून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. जे काही जोडले गेलेत ते बळंबळंच हातात लाल झेंडा घेऊन स्वतःची लाल करायला गेलेत. आत्मप्रतिष्ठा जपलेल्या स्वाभिमानी नेतृत्वाने आणि पक्षाने मग ते कुठल्याही राज्यातले का असेना बळच भारत जोडोला समर्थन दिलेले नाही. खऱ्या अर्थाने जर काँग्रेसला “भारत जोडो” करायचाच होता तर त्यांनी सर्व राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलावून या यात्रेशी जोडून घेतले असते. पण त्यांना तसं करायचं नाही हे स्पष्ट दिसत आहे. “अहंम ब्रह्मास्मि”चा भ्रम लोकशाहीत टिकू शकत नाही. आता वेळ देशातील जनतेची आहे. भारावून हरखुन जाऊन ह्या फॅसिझमला पोसणाऱ्या आणि आता परत फॅसिझम काढू म्हणत ”भारत जोडो” करणाऱ्या सोबत उभे राहायचं, की.आत्मसन्मानाने, स्वाभिमानाने भारतीय लोकशाहीच्या सामाजिकीकरणासाठी झटणाऱ्या प्रादेशिक पक्षांच्या बळकटीकरणाच्या पाठीमागे उभे रहायचं
दिशा पिंकी शेख