कोणतेही काम मग ते एखाद्या विषयावरील संशोधन असो किंवा चळवळ असो ते सुरू करण्यापूर्वी आपल्याला संबंधित विषयाचा संपूर्ण इतिहास माहीत असणे गरजेचे असते. खरी माहिती समाजासमोर आणावी लागते ती आणण्यासाठी त्या काळातील दुर्मिळ कागदपत्रे, अहवाल, फोटोग्राफ ,हस्तलिखिते यांचा आधार घ्यावा लागतो. ती मिळवावी लागतात; अर्थात हे सर्व साहित्य मिळविणे वाटते तेवढे सोपं काम नाही. हे सर्व संदर्भ एकत्र करून मगच तो इतिहास लिहिला जातो. वरील सर्व गोष्टी टाळून केवळ ऐकीव माहितीवर आधारित जर आपण संशोधन करत गेलो, तर चुकीची माहिती समोर येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात ,हे सर्व टाळण्यासाठी संदर्भासह माहिती, संशोधन या रूपाने पुस्तक प्रकाशित होणे फार गरजेचे असते. कारण अशी संशोधनात्मक पुस्तके म्हणजे एक प्रकारचा दस्तऐवज असतो असे म्हटले, तर अतिशयोक्ती होणार नाही.
याच संशोधन पठडीत बसणारे एक पुस्तक नुकतेच माझ्या वाचण्यात आले ते म्हणजे डॉ. यशवंत चावरे लिखित, महाडचा मुक्तिसंग्राम ऐतिहासिक चवदार तळे दिवाणी प्रकरण न्यायालयीन अभिलेख व कामकाज हे होय.
महाडचा मुक्ती संग्राम हा आपल्या सर्वांचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण मोठ्या गर्वाने म्हणतो की, बाबासाहेबांनी महाडचा मुक्ती संग्राम करून पाण्यालाच आग लावली होती; पण असे भावनिक बोलत असताना महाडचा मुक्तिसंग्राम का सुरू करावा लागला होता? त्यासोबतच महाड शहराची माहिती, संग्रामाची पार्श्वभूमी, न्यायालयीन निवाडे, अपील, बाबासाहेबांची भूमिका हे सर्व समजून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण कोणताही संग्राम हा काही एका दिवसात सुरू होत नसतो. या वरील सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे हे पुस्तक आहे.
लेखक स्वतः न्यायाधीश या पदावर कार्यरत होते म्हणून त्यांना कोर्टाच्या कामाची जाण होती. शिवाय मुळातच त्यांच्या अंगी संशोधनाची वृत्तीदेखील होती. याचा सर्व फायदा त्यांना पुस्तक लिखाण करताना झाला. अपील दावे प्रति दावे यांचे महत्त्व ते जाणून होते. त्यामुळे हाच कोर्टाचा धागा पकडून त्यांनी सदर पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. या पुस्तकातील नुसत्या अनुक्रमणिकेवर जरी नजर टाकली, तरी आपल्याला या पुस्तकाचा आवाका लक्षात येईल. महाडचा मुक्ती संग्रामाचा लढा लढत असताना जे काही न्यायालयीन खटले लढले गेले होते, वाद प्रतिवाद झाले होते, ते सारे व त्याचबरोबर दिवानी अपील क्रमांकासह कोर्टाचे काम हे सर्व पुस्तकात वाचायला मिळते. हे सर्व लिखाण क्रमाक्रमाने झाल्यामुळे त्यामध्ये सलगता जाणवते. तुकड्या तुकड्यात लेखन जाणवत नसल्यामुळे सगळे संदर्भ लक्षात येतात. म्हणून कोर्टाची भाषा असली तरी पुस्तक वाचनीय झाले आहे. हे लेखकाचे कौशल्यच म्हणावे लागेल. कारण काही पुस्तकांमध्ये संदर्भ दिलेले असतात; पण क्रम व्यवस्थित न लावल्यामुळे ते समजणे अवघड जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मुक्तिसंग्रामात जे युक्तिवाद कोर्टात केलेले होते. त्याचा समावेश पुस्तकात करण्यात आलेला आहे. बाबासाहेब उच्च शिक्षणाला एवढे महत्त्व का देतात याचे उत्तर या या पुस्तकातील त्यांनी केलेल्या युक्तिवादावरून जाणवते. ते वाचत असताना आपल्याला प्रेरणा आणि काम करण्याची ऊर्जा मिळत जाते.
चवदार तळ्याच्या सत्याग्रहात ज्यांनी ज्यांनी भाग घेतला होता अशांचे दुर्मिळ फोटो पुस्तकात पाहायला मिळतात. त्यासोबतच महाड मुक्तिसंग्राम चवदार तळे सत्याग्रह आणि दिवाणी दावा या संबंधित फोटोही छापलेले आहेत. त्याचा स्त्रोत पुस्तकात दिलेला आहे. पुस्तकातील रोजनामा हे प्रकरण माझ्या माहितीप्रमाणे कोर्टाचे कामकाज कसे चालते त्यावर आधारित आहे. चवदार तळ्याचा दावा हे प्रकरण वाचताना लेखकाने जी मेहनत घेतलेली आहे ,ती दिसून येते. यामध्ये डाव्या बाजूला मोडी लिपी मध्ये जशाचा तसा मजकूर छापलेला आहे आणि उजव्या बाजूला त्याचे रूपांतर आजच्या वापरातील मराठी लिपीमध्ये केलेले आहे. हे काम वाटते तेवढे सोपे नाही. कारण मोडी लिपीचे जाणकार फार कमी आहेत, तरीपण ही दुर्मिळ माहिती आपल्या सर्वांसमोर यावी म्हणून लेखकाने प्रचंड मेहनत घेतली आहे. ती वाचत असताना मलाही खूप नवीन माहिती मिळाली. पुस्तकात काही दस्तऐवज मूळ हस्तलिखित स्वरूपातच छापलेले आहे. पण तो मजकूर वाचण्यासाठी सोपा जावा म्हणून तो नव्याने टाईप करून परत छापलेला आहे एवढा बारीक विचारसुद्धा लेखकाने या ठिकाणी केलेला दिसून येतो.
महाड म्युन्सिपलिटीच्या जनरल कमिटीचे प्रोसिडिंग बुक सन १९२७_२८ सालचे ठराव नंबर सह पुरता उतारे पुस्तकात पाहायला मिळतात. महाड कोर्टाचा निर्णय जशाचा तसा पुस्तकात दिलेला आहे. पुस्तकातील विषयाच्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी इंग्रजी मॅटर आलेला आहे तो मुळातून आपण सर्वांनी समजून घेतलाच पाहिजे. पुस्तकात दुर्मिळ साहित्य पुराभिलेख संचालनालय ,मुंबई यांच्याकडून मिळाले आहे तसा उल्लेख पुस्तकात लेखकाने केलेला आहे. हे साहित्य आपल्याला या पुस्तकाच्या निमित्ताने पाहायला ,वाचायला सहज मिळाले आहे. कारण हे साहित्य मिळवणे अवघड आणि खर्चिक बाब आहे .हे सर्व साहित्य स्कॅन करणे, साठवून ठेवणे आणि त्याचा संदर्भासह योग्य ठिकाणी वापर करणे हे कौशल्याचे काम आहे ,त्यात लेखक यशस्वी झाले आहेत. त्यांनी कुठेही या कामाबाबत तडजोड केलेली नाही, असे मी मानतो.
संशोधनात्मक लिखाण कसे करावे याचा उत्तम नमुना म्हणून मी या पुस्तकाकडे पाहतो. प्रत्येक प्रकरणांमध्ये संदर्भ देण्यात आलेले आहेत त्यामुळे पुस्तकाचे संशोधन मूल्य वाढले आहे. वाचकांना, संशोधकांना हे पुस्तक वाचत असताना संदर्भ शोधणे सोपे जावे यासाठी शेवटी व्यक्ती नाम ,स्थळ ,धर्मग्रंथ, जाती वर्ग धर्म यांची सूची दिलेली आहे. त्यामुळे पुस्तक हाताळणे अजूनच सोपे झाले आहे. व्यक्ती ही निवृत्त झाल्यानंतर आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा समाजासाठी कसा सकारात्मक उपयोग करून देऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून मी या पुस्तकाचे लेखक डॉ. यशवंत चावरे यांच्याकडे पाहतो. आपल्या संपूर्ण ज्ञानाचा अनुभवाचा कस पणाला लावून हे पुस्तक त्यांनी तयार केलेले आहे. मी तर या पुस्तकाबाबत एक पाऊल पुढे जाऊन असे म्हणेन की, या विषयावर काम करताना प्रत्येकाला या पुस्तकावरील सविस्तर अभ्यास केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही .एवढे मौलिक काम झालेले आहे. त्यासाठी मी लेखकाला धन्यवाद देतो. आज जे लोक निवृत्त होत आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत त्या सर्वांनी या पुस्तकाची प्रेरणा घेऊन बाबासाहेबांच्या विविध पैलूवर संशोधन करून अशाच प्रकारचे संशोधक पुस्तक, दस्तऐवज प्रकाशित करावा. जो समाजासाठी उपयुक्त ठरेल, मार्गदर्शक ठरेल. प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असलेच पाहिजे.
पुस्तकाचे नाव: महाडचा मुक्तिसंग्राम
लेखक: डॉ. यशवंत चावरे
प्रकाशक: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रकाशन संस्था ,नवी मुंबई.
किंमत: २००० रु मात्र.
पाने:४५५
सुशील शिवाजी म्हसदे
मो.९९२१२४१०२४