सध्या काश्मीर फाईल्स सिनेमातून काश्मिरी पंडितांचा मुस्लिमांनी अमानुष छळ व कत्तली केल्याच्या कहाण्या सांगण्यात येत आहेत. नि:शस्त्र गांधींना गोळ्या घालणारा नथुराम गोडसे आणि त्यानंतर जणूकाही तमाम ब्राह्मणांचे मुडदे पाडले गेले अशाही अतिरंजित पोस्ट्स फिरवल्या जात आहेत. मुस्लीम समूहाविषयीचा वाढता द्वेष, त्यांचा अधिकच संताप यावा, म्हणून खोटी मुस्लीम नावं घेत, खोट्या, विकृत पोस्ट्स, फिरवल्या जात आहेत. आता तर भारताकडे ५०० किलोचा बॉंब असून तो पाकिस्तानवर पडला, तर सारे पाक उदध्वस्त होईल अशाही बातम्या सोडल्या आहेत. तरीही हिंदू-मुस्लीम दंगली उसळत नाहीत, हे पाहून गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरावर “अल्ला हू अकबर” घोषणा देत काही दाढीवाले तरुण तलवारीने हल्ला करतानाचे संशयित व्हिडिओ व्हायरल केले आहेत. कर्नाटकमधून आधी हिजाब, हलाल, अजान आणि आताच दुकान बाबत बातमी आलीय! ही साखळी संपेल, असे वाटत नाही!!
मार्चमधील युक्रेन-रशिया युध्दादरम्यान सर्वत्र महागाईने कहर केला आहे. विशेषत: पाकिस्तानात तर कडेलोट झाला आहे. श्रीलंकेत अन्नधान्य – वैद्यकीय टंचाई निर्माण झालीय. तेथे आर्थिक आणीबाणी लागू झाल्यावर राजकीय संकट उभे राहिले आहे. भारतातही वाढती महागाई व अन्य प्रश्नांमुळे अशीच स्थिती निर्माण होत आहे. आधीची वाढणारी बेरोजगारी, यात ही भर. बड्या राष्ट्रांच्या सत्ता-आर्थिक साम्राज्यवादाच्या वादात गरीब-विकसित राष्ट्रांतील कष्टकरी जनता त्यांच्या मूलभूत प्रश्न सोडवता सोडवता हैराण झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये पाचपैकी चार राज्यांत संघ-भाजप सरकारे परत आली. या धक्क्यातून कॉंग्रेससह अनेक विरोधी पक्ष अजूनही सावरले नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि केंद्रातील संघ-भाजप सरकारमधील नेते, पदाधिकारी एकमेकांना तुरुंगात टाकून राजकीय सामने रंगात आणले आहेत. नेहमीप्रमाणेच त्यांना वरील प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही! ब्रेकींग न्यूज – टिआरपीच फक्त ध्यानात घेणारा सत्ताधा-यांचा गुलाम मीडिया यात त्यांनाच साथ देताना दिसत आहे.
त्याचवेळी भारताच्या उत्तर – पश्चिमेकडील शेजारी पाकिस्तानमध्ये लोकनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारला अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले आणि त्यानंतरच्या राजकीय घटनांमुळे त्यांनी संसद बरखास्त करायचा प्रस्ताव दिला आणि ती बरखास्तही झाली. काही दिवसांत आणखीही अनेक घडामोडी घडतील. घडविल्या जातील. आपल्या दक्षिणेकडील श्रीलंकेतील परिस्थिती अधिकाधिक चिघळत आहे. तर पूर्वेकडील म्यानमारमध्ये २०२१ लाच निवडणुकीनंतर लष्करी राजवट लागू झाली.
उत्तरेकडील सीमेवरील शेजारी मोठ्या राष्ट्राच्या घुसखोरीच्या बातम्या येतच आहेत. याचा अर्थ शेजारी राष्ट्रांमध्ये लोकशाहीविरोधी, अस्थिर वातावरण निर्माण केलं जात आहे आणि भारतातही २०१४ ला संघ-भाजप सत्तेवर आल्यापासून लोकशाही समर्थक राज्यघटनाच गुंडाळून ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर व खूनी नथुराम गोडसे हेच ज्यांचे आदर्श आहेत; ते निरंतर अशा हालचाली करत आहेत. भारताच्या चहूकडील या घडामोडी येथील वंचित समूह व लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने खूपच गंभीर आणि महत्त्वाच्या आहेत.
याच बरोबर लष्कर हस्तक्षेपाच्या घटनाही वाढताना दिसताहेत. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये प्रथम दर्शनी समाधान वाटावे अशा युक्रेन-रशिया युध्द थांबून रशियन सैन्य माघारी परतू लागल्याच्या बातम्या येत आहेत. पण, त्याचवेळी समोर येणारी भीषण दृश्य, जागतिक भांडवलशाही, लुटारू, निर्दयी बाजारू अर्थव्यवस्था आणि डोळे दिपवणा-या, विकृतपणे विकसित होणा-या तंत्रज्ञानाचा नंगानाचही आपण पाहत, वाचत, ऐकत आहोत. विज्ञान-तंत्रज्ञान नुसते विकसित होवून उपयोग दिसत नाही. तर वंचित घटकांना केंद्रित ठेवून त्यांच्या सर्वंकष मानवीय विकासाची सामाजिक दृष्टी असल्याशिवाय याचा असाच मानवी विध्वंसकारी उपयोग होत जाणार आहे. शुध्द वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या या मर्यादा आहेत!
नुकतीच १४ वी जिनीव्हा शिखर परिषद झाली. युक्रेन-रशिया युध्दातील रशियाच्या भूमिका संदर्भात तेथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून (युएनएचआरसी) रशिया, चीन, पाकिस्तानला बाहेर काढा ,अशी मागणी पुढे आली. लोकशाही, मानवी अधिकार, क्रूरता, आदी मुद्द्यांवर अमेरिका, आदी देश रशियाविरोधी म्हणून युक्रेनच्या बाजूने भूमिका घेत आहेत. हे सारे बाळबोध समिकरण आहे!
व्हिएतनाम (१९५५ ते ७५), क्युबा (१९६२), आदी छोट्या राष्ट्रांतील भांडवलशाहीप्रधान अमेरिकेच्या भूमिका, साम्यवादप्रधान चीनमधील तिएनान चौकातील आंदोलनकारी विद्यार्थ्यांची हत्या (१९८९), आणि भारतातील कायम सत्ताधा-यांनी शीख, मुस्लीम, वंचित बहुजन स्री-पुरुष समूहांच्या कत्तलखोर-निर्दयी भूमिका-कृत्यांना (१९७२ ते २०२०) वंचित बहुजनकेंद्री, लोकशाहीवादी फुले-आंबेडकरी शक्ती कधीच माफ करणार नाहीत. या पार्श्वभूमीवर आंतर्राष्ट्रीय महाशक्ती व राष्ट्रीय शक्ती मधील संघर्ष लवकर निवळतील याची शक्यता नाही.
भौतिक शास्त्रज्ञ, सापेक्षतेचा सिध्दांत मांडून अल्बर्ट आईनस्टाईन जगप्रसिध्द स्थानावर पोचले. वस्तुमान आणि ऊर्जा यासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचे सूत्र त्यांनी मांडले. याच आधारावर अमेरिकेने विध्वंसकारी अणुबॉंब बनविला. त्याचा पहिला प्रयोग ६ आणि ९ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा व नागासकी शहरांवर तो अणुबॉंब टाकून प्रचंड विध्वंस केला. यावेळी मानवी विकृत बुध्दिमतेचा हिंस्त्र चेहरा दिसला. जपानमधील या विध्वंसाने सारे जग हादरले. वरील शोधामागील आईनस्टाईन यांची दृष्टी आणि उद्देश संपूर्णत: भिन्न होती. ती सामाजिक, मानवीय विकास व नैतिकतेची होती. या संकल्पना, मूल्यांना निव्वळ कोरडी, अर्थशास्त्रीय वैश्विक दृष्टी असणा-यांना काडीचेही महत्त्व नाही. आता तर वंचित समूह -पशू-पक्षी-सारी जीवसृष्टी भांडवली वैश्विक बाजारातील सोंगट्या-मृत वस्तु आहेत.
बुध्द-कबीर-संत परंपरा-महात्मा फुले उभयता-बाबासाहेब, महात्मा गांधी, डॉ. लोहिया, अगदी सामाजिक-अर्थतज्ञ मार्क्ससुध्दा मानवी समाजाकडे या दृष्टीने कधीच पाहत नव्हते. दोष आहे माणसाच्या गोठलेल्या बुध्दीचा-दृष्टीचा. दोष आहे निव्वळ नफ्यावर आधारित निरंतर वाढत जाणा-या शोषणकारी भांडवलाचा. या पार्श्वभूमीवर जेव्हा रशिया-युक्रेन युध्द, त्यात वापरलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त युध्द सामग्री आणि बेचिराख झालेला युक्रेन पाहताना राज्यघटना मान्य नसणा-या हिंसावाद्यांकडील मोजक्या तलवारी, मूठभर काडतूसे व भूसुरुंग म्हणजे “दर्या में खसखस आहे”, असेच वाटते! सारे जागतिक चित्रच बदलले आहे. भांडवलशाही आणि तिने विकसित केलेले तंत्रज्ञान जगाच्या कानाकोप-यात अगदी परग्रहांवरही अधिराज्य गाजवीत आहे. अशावेळी जगातील सर्वधर्म-जात-वर्गीय सर्वाधिक वंचित जनता आणि लोकशाही कशी वाचेल, अशीच वैश्विक दृष्टी बाळगायची गरज आहे. भारतात तर ही भांडवलशाही, तिच्या हातात हात घालून तंत्रज्ञानावर आरूढ ब्राह्मणशाही, वंचित बहुजनांचे अज्ञान-असंघटितपणा – राजकीय जागृतीहीनतेचा गैरफायदा घेऊन उभी राहिलेली सत्ताधारी मूठभरांची क्षत्रियशाही आणि त्याचबरोबर त्यांच्या स्री समूहांविरोधी व्यवस्थेशी निरंतर संघर्ष करतच राहवे लागणार आहे. वंचितांच्या हक्काच्या सत्तेचा हा राजकीय संघर्ष जगातील सर्वाधिक महाकठीण असा हा संघर्ष आहे. आजतरी या सामाजिक घटकांतील काही नेतृत्व दीर्घकाळ टिकताना दिसत नाही. पण, हेही निर्विवाद सत्य आहे की, अधिकाधिक वंचित समूह सच्च्या फुले-आंबेडकरवादी, प्रगल्भ, राजकीय नेतृत्वाच्या मागे हळूहळू का होईना टिकतानाही दिसत आहेत.
पाकिस्तान, भारत, श्रीलंका, म्यानमारादी छोट्या राष्ट्रांत महागाईच्या प्रश्नाने आकाशाला स्पर्श केला आहे, असे वाटते. काही राष्ट्रांत अन्नधान्य टंचाई आणि पिण्याचा पाण्याच्या प्रश्नांनी भीषण स्वरूप घेतले आहे. एकूण मानव समूहाच्या समोर निसर्गातील ग्लोबल वॉर्मिंग, आदी वातावरणातील बदलाच्या गंभीर समस्याही आहेत! आता युध्दात शस्त्रे, लढाऊ विमाने पुरविणारी बडी राष्ट्रे हे प्रश्न संपुष्टात आणायला कधीच मदत करणार नाहीत हे सूर्यसत्य आहे. बड्यांना त्यांच्या सैनिक छावण्या, त्यांची शस्त्रे साठविण्याची गोडावून्स उभी करायला त्यांना ही राष्ट्रे हवीत. त्यांचा भूभाग, समुद्र भाग युध्दभूमी करायचा आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीत अधिक समृध्द असलेली राष्ट्रे ताब्यात घेवून ती बेछुटपणे लुटायची आहेत आणि या राष्ट्रांच्या राजकीय-आर्थिक शोषणातून त्यांच्या अर्थव्यवस्था पोसायच्या आहेत. येथील वंचित बहुजनांच्या भीषण समस्या वाढत असताना, संघ-भाजप भारताला कसे काय सुपर पॉवर करणार आहे? सामान्य हिंदू वंचित समूहाला गंडवायला हे ब्राह्मणी संमोहन तंत्र वापरले जात आहे. त्यांना वर्ण-जाती-वर्ग वर्चस्ववादी, शोषणकारी आणि दमनकारी सत्ताधीश व्हायचे आहे. पावले तर तशीच दिसताहेत!
७० च्या दशकांत मुंबईत गल्लीबोळात अचानक संतोषी मातेची मंदिरे उभारण्यात आली. आताची शिवसेनाही यात सामील होती. आताही अचानक गणपती, नंदी दूध पिण्याची विकृत, अवैज्ञानिक थोतांडं पसरवण्याचे काम एक षडयंत्रकारी टिम अत्यंत सुनी यांत्रिकपणे करीत आहे. त्यासाठी सोशल व टिव्ही चॅनल्ससारखा मीडिया वापरत आहे. काही छोट्या राष्ट्रांतील लाखो मुले-जनता अन्नावाचून तडफडत आहेत. पिण्याच्या पाण्यावरून संघर्ष सुरू आहेत. भारतात अशी वेळ लवकर येवू शकते. अशा घटनांतून काही शिकून दीर्घकालीन व ताबडतोबीची धोरणे आखून तात्काळ पावले उचलण्याऐवजी भारत व महाराष्ट्रातील सरकारे एकमेकांच्या तंगडी पकडायच्या हुतुतूच्या राजकीय खेळात गुंतली आहेत! कोरोनातही ते काहीच शिकले नाहीत. आता तर सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने चौथ्या लाटेविषयी बोलायला सुरुवात केली आहे!
शिक्षण, आरोग्य, रोजगारासारख्या मूलभूत गरजा न भागवता मुस्लीम-हिंदू वंचितसमूहांची लोकसंख्या कमी केली पाहिजे, अशाही पोस्ट्स फिरवत आहेत. वंचित समूहांच्या लोकसंख्येला किमान मानवीय जीवन जगायला न मिळणे याला जागतिक व भारतीय स्तरावरील सामाजिक-राजकीय-आर्थिक धोरणे जबाबदार आहेत, हे मात्र सांगितले जात नाही. या विनाशकारी धोरणांना कॉंग्रेससह संघ-भाजप पक्ष-सरकारं आणि त्यांच्या भोवती कायम पिंगा घालणारे प्रादेशिक पक्षच जबाबदार आहेत.
अशा स्थितीमध्ये छोट्या खास करून दक्षिण आशियातील राष्ट्रांनी बड्या राष्ट्रांच्या कर्ज-दारूगोळ्याच्या फासात आपल्या माना अडकवण्यापेक्षा डॉ. आंबेडकर-लोहियादी नेत्यांच्या परराष्ट्रविषयक काही सूत्रे व प्रस्तावांचा आताच्या संदर्भात विचार करायला हवा. डॉ. लोहिया यांनी तर दक्षिण आशियातील राष्ट्रांच्या पर्यायी विचारपीठाची गरज सांगितली होती. याचा विचार करण्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खूप दशकांपूर्वीची काही विधाने चुकीच्या पध्दतीने फिरवली जात आहेत. तत्कालीन त्यांचे लोकसंख्याबाबतचे लिखाण-भाषण आता खूप दशकं उलटून गेल्यावर, आर्थिक क्षेत्र विश्वव्यापी बनले असताना परत सांगण्यामागे कोणता राजकीय हेतू आहे? कुणाला काय साध्य करायचे आहे? सच्च्या आंबेडकरवाद्यांनी हेरले पाहिजे. याचा नेमका रोख कुणाकुणावर आहे हेही ओळखले पाहिजे. काही शतकांपूर्वीचे जोतीराव फुले आणि मागील शतकातील बाबासाहेब यांचे विचार आताचे वास्तव समजण्यासाठी कसे लावायचे; अर्थ-अन्वयार्थ कसा लावायचा याची जबाबदारी वंचितांच्या हक्काच्या सत्तेचे राजकारण करणा-यांना, त्यांच्या अभ्यासक-विचारवंतांना स्वीकारावी लागेल. आल्या पोस्ट्स, दिसले बाबासाहेब, फुले फोटो की, करा फॉरर्वर्ड. या खतरनाक जाळ्यात अडकता कामा नये. दिसले शिवाजी, दिसले बुध्द की त्या ग्रुपमध्ये डोळे झाकून व्हा सामिल. या संदर्भात आपल्या भावनांना आवर घातलाच पाहिजे. सोशल मीडियाची शक्ती-मर्यादा आपल्या पध्दतीने कशी वापरायची याचा गांभीर्याने विचार हवा. कारण, बोगस नावाने नुसते परदेशातील हॅकर्स धुमाकूळ घालत नाहीत; तर वंचितविरोधी काही सामाजिक-राजकीय शक्तीही या पेक्षा अधिक धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
युक्रेन-रशिया युध्दादरम्यान निष्पाप, मोठी जनसंख्या शेजारी राष्ट्रांत स्थलांतर झाली आहे. आता काही दिवसांपूर्वी श्रीलंकेतील गंभीर परिस्थितीमुळे तेथील तमिळ निर्वासित भारतात येवू लागल्याच्या बातम्या येत आहेत. याचा संदर्भ घेऊन काही विकृत संस्था-संघटना अशी भारतावर परिस्थिती आली तर आपल्या शेजारी कोणती राष्ट्रे (म्हणजे मुस्लीम) आहेत हे पहा. आपल्याला म्हणजे हिंदूंना (खरं म्हणजे त्यांना म्हणायचे आहे संघीय ब्राह्मणांना) कुठे थारा मिळणार? अशाही विषारी-विकृत-भावनिक पोस्ट्स फिरवत आहेत. अशा सर्व विध्वंसकारी चक्रातून बाहेर पडण्याचा संकल्प करायला हवा. संकल्प हवा युध्द नको. संकल्प हवा शांती, मैत्रीभावाचा. छोट्या छोट्यां राष्ट्रांनी कुणाचीही गुलामी न स्वीकारण्याचा संकल्प हवा. बोटा एवढ्या व्हिएतनाममधील नि:शत्र बुध्द भिक्षु भर चौकात येत, स्व:ला जाळून घेत होते. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला बलाढ्य, शस्त्रसंपन्न, साम्राज्यवादी अमेरिकाविरुध्द लढण्याची प्रेरणा, शक्ती मिळत होती. शेवटी व्हिएतनामने २० वर्षांनी अमेरिकेला नमवलेच! ही नैतिकतेची अंतिम जनशक्ती आहे!
शांताराम पंदेरे
मोबा.: ९४२१६६१८५७