धर्मांतरानंतर थोड्याच अवधित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निर्वाण झाल्यामुळे देशातल्या तमाम शोषित, वंचित समुहांना धम्मदीक्षा देण्याचे त्यांचे स्वप्न अपुर्ण राहीले. धर्मांतरानंतर आपले उर्वरित आयुष्य भारतात बौद्धधम्माच्या प्रसारासाठी वेचण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केले होते. या देशातील खरा संघर्ष हा बौद्धधम्म विरुद्ध ब्राम्हणधर्म असा आहे हे बाबासाहेबांनी क्रांती-प्रतिक्रांतीसारख्या ग्रंथातुन स्पष्ट केले आहे. त्यामुळे धर्मांतरामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भुमिका काय होती याचा शोध वारंवार घेणे आवश्यक आहे. भारत बौद्धमय करण्याच्या निर्धारातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नेमक काय साध्य करायचं होत याच ऊत्तर बाबासाहेबांच्या लिखाण आणि भाषणात अनेक ठिकाणी सापडते.
धर्मांतराच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना या देशात एका प्रबुद्ध समाजाचा निर्मिती करायची होती. समाजाच्या धारणेसाठी धर्माची आवश्यकता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मान्य होती पण समाज संगठनेचा मुख्य व्यक्तीवर निर्बंध लादणे नसुन मुख्य हेतू हा व्यक्तीला त्या गुणांचा, कौशल्यांचा विकास करण्याची संधी देणे हेच असल्याचे त्यांचे मत होते. बाबासाहेबांना जो प्रबुद्ध समाज घडवायचा होता त्याच्यशी देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लोकशाहीचे भवितव्य निगडीत होते. त्यासाठी हा समाज समता, स्वातंत्र्य आणि मैत्री या मूल्यांवर आधारित जीवन जगणारा असणे आवश्यक होते पण, असा नवा समाज घडवण्यासाठी सर्वप्रथम अस्पृश्यांच्या मनात हिंदुधर्माने पिढ्यानपिढ्या लादलेली मानसिक गुलामी दुर करणे आवश्यक होते. भगवान बुद्धांच्या बुद्धिप्रामाण्यवादी तत्वज्ञानाशिवाय ते शक्य नव्हते.
“बुद्धजयंती आणि तीचे राजकीय महत्व”य़ा १७ मे १९४१ रोजी जनता मधे प्रसिद्ध झालेल्या लेखात डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “आमच्या हिंदूमात्राचा कोठा साफ नाही. त्यात ब्राम्हणी धर्माचा कैक दिवसांचा मळ घर करुन बसला आहे. जो वैदू हा मळ धुऊन काढील तोच या देशाला लोकशाहीच्या प्रस्थापनेत मदत करु शकेल. तो वैद्य म्हणजे गौतम बुद्ध हाच एक होय.” यातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर कश्याप्रकारे भगवान बुद्धाला भारताच्या लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण मानत होते ते सिद्ध होते.
गोखले लॉ लायब्ररी मध्ये केलेल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या ७ पूर्वअटींवर विस्तृत भाष्य केले आहे. त्या पूर्वअटी पुढील प्रमाणे १)समाजात विषमता नसली पाहीजे. २)विरोधी पक्षाचे अस्तित्व. ३) वैधानिक व कारभार विषयक क्षेत्रात पाळावयाची समता. ४) संविधानात्मक नीतीचे पालन होय. ५) लोकशाहीच्या नावाखाली अल्पमतवाल्यांची बहुमतवाल्यांकडून गळचेपी होऊ नये. ६) नीतीमान समाजाची आवश्यकता. ७) विवेकी लोकमत. या पुर्वअटी पुर्ण केवळ एक नीतीमान समाजाच पुर्ण करु शकतो. धम्मात ईश्वराऐवजी नीतिमत्तेला सर्वश्रेष्ठ स्थान देण्यात आल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म लोकशाहीशी अधिक सुसंगत वाटला. बौद्ध धम्मात नीतीमत्ता म्हणजे दु:ख, वर्गकलह, शोषण दुर करुन समता, स्वातंत्र्य आणि मैत्री भावनेवर आधारीत समजनिर्मीतीसाठी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर व्यक्तीचे वर्तन आणि व्यवहार कसे असावा याचे नियम. संघाच्या माध्यमातुन भगवान बुद्धांनी अश्या नीतीमान समाजाचे प्रारुप निर्माण केले होते.
बाबासाहेबांच्या मते जरी लोकशाही व्यवस्था परिपुर्ण नसली तरी भारतातील शोषित आणि वंचित समूहाला न्याय मिळवण्याची सर्वाधिक संधी लोकशाहीत आहे असे. पण जो पर्यंत देशात सामाजिक लोकशाही निर्माण होणार नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीवर टांगती तलवार कायम असणार आहे. सामाजिक लोकशाहीच्या अभावी पिळवणूक झालेल लोक बंड करुन लोकशाहीचा नाश करु शकतात. त्यामुळे देशात सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी कार्यरत लोकांचा समुह असणे आवश्यक होते. तसेच जोपर्यंत लोकांच्या मनात कायद्याच पालन करण्याची नीतीमत्ता आहे तोपर्यंतच देशात लोकशाही जिवंत राहील असे सुद्धा बाबासाहेबांचे मत होते. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्धधम्माकडे देशात नीतीमान समाज निर्माण करण्यासाठीचे साधन म्हणून पाहतात.
बुद्ध कि कार्ल मार्क्स या ग्रंथात समता, स्वातंत्र्य, मैत्री भावनेवर आधारीत शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी साधन म्हणून बुद्धीस्ट गॉस्पलचे प्रतिपादन करतात. या बुद्धीस्ट गॉस्पेल मधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्माच्या मुलभुत तत्वांचा समावेश करतात. ती मुलभुत तत्व म्हणजे पंचशिल, अष्टशील, निब्बाण सिद्धांत आणि दस पारमिता. यातील पंचशील हे व्यक्तीने वैयक्तीक पातळीवर आणि अष्टशील हे सामाजिक पातळीवर स्व:ताचे वर्तन योग्य कि अयोग्य आहेत याचा शोध घेऊन त्याप्रमाणे आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक वर्तन-व्यवजारात सुधारणा घडऊन आणण्यासाठी आवश्यक आहेत. निब्बाण सिद्धांत हा अष्टशीलांचे पालन करण्यात येणा-या अडचणींची चर्चा करते तर दस पारमिता मनुष्याला पुर्णत्व प्राप्त करण्यासाठी ज्या दहा गुणांची साधना करणे आवश्यक आहे त्या दहा गुणांची चर्चा करते. बुद्ध कि कार्ल मार्क्स व भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात या मुलभूत धर्मोपदेशावर विस्तृत चर्चा केली आहे. ती आपण सर्वांनी पुन्हा पुन्हा वाचणे, समजाऊन घेणे आणि त्याप्रमाणे वर्तन-व्यवहार करणे नीतीमान समाजाच्या निर्मितीसाठी आणि देशात सामाजिक लोकशाहीची स्थापना करुन राजकीय लोकशाहीचे घटनेत नमुद केलेले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक आहे कारण तीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली धर्मांतराची निष्पत्ती असेल.
बुद्धं सरणं गच्छामी।
धम्मं सरणं गच्छामी।
संघं सरणं गच्छामी।
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपणा सर्वांना खुप खुप सदीच्छा.
संदर्भ – १) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म.
२) मुक्ती कोण पथे
३) बुद्ध कि कार्ल मार्क्स
४) बुद्धजयंती आणि तीचे राजकीय महत्व.
५) क्रांती-प्रतीक्रांती.
लेखक – डॉ.बाबासाहेब आंबेडकर