बुलढाणा : बुलढाणा येथे वंचित बहुजन आघाडी आयोजित धम्म मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी संबोधित करताना म्हटले की, बीड, उस्मानाबादमधील ऊसतोड मजूर इतरत्र कामासाठी जातात. यातील हजारो महिलांनी पोटातील गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्या आहेत. मासिक पाळीत कपडे बदलायची अडचण होते. मासिक पाळीत त्रास झाल्यास दोन तीन दिवसांचा रोजगार बुडतो. ते नको म्हणून महिला आपली पिशवी काढून टाकतात. हे कायमस्वरूपी घडत आहे. या दुष्काळात मोठा फटका स्त्रियांना बसणार
प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, आपल्यासाठी 2026-27 हे वर्ष आंबेडकरी चळवळीसाठी फार महत्त्वाचे आहे. म.जोतिबा फुले यांच्या जयंतीचे हे द्विशताब्दी वर्ष आहे. 2027 मध्ये महाड चवदार तळे सत्याग्रह आणि मनुस्मृती दहनाला 100 वर्षे पूर्ण होताय. महाड चवदार तळे सत्याग्रह हा खूप महत्त्वाचा होता. पाणी ही नैसर्गिक देन आहे, त्यावर कोणीची मक्तेदारी असू शकत नाही त्यावर सर्वांचा समान हक्क आहे, हे सांगणारा तो लढा होता.

आज ज्यांच्याकडे जमीन आहे, ते शेतीवर कर्ज घेऊ शकतात. मात्र, ज्यांच्याकडे जमीनच नाही. त्यांना कर्जमाफीच्या घोषणांचा काही उपयोग नसतो. राज्यात काही दुष्काळी जिल्ह्यात खरीप हंगामानंतर मोठ्या प्रमाणावर शेतमजूर हे ऊस तोडणीसाठी, वीज भट्टीवर कामगार म्हणून जातात. यावेळी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालंय. हे सर्व एससी, एसटी, ओबीसी,भटके विमुक्त समुदायातील लोकं आहेत. यांची परिस्थिती पुढील काळात अजून बिकट होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी म्हटले की, सरकारने स्वस्त धान्य दुकाने ही कधीच बंद करून टाकली आहेत. पिवळ्या कार्ड धारकांना फक्त थोडीफार साखर, तांदूळ सरकार देतंय. रेशनिंगच्या मार्फत अन्न, धान्याची सोय नाही. अशावेळी या लोकांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहत नाही. हे सर्व समूह वंचित घटकातील आहेत






